शून्याचा शोध भारताचा नाही?🤭

*शून्याचा शोध फक्त भारताचा नाही? पण 'शून्याचं गणित ' मात्र भारतीयांचंच योगदान! असं का?*
_History Of Zero Discovery India search intent explainer._

*_संकलन साहेबराव माने._*
_पुणे - 9028261973_
*साभार -देवदत्त पटनाईक. कला, संस्कृती आणि वारसा या विषयांवर लेखन करणारे प्रसिद्ध पुराणकथांचे अभ्यासक.*
(लोकसत्ता मिडिया) 


*_विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट इतरांना फॉरवर्ड करा._* 👇

https://chat.whatsapp.com/G7axRwFSXiH3FocvSYrKys

*History Of Zero Discovery India search intent explainer: शून्य हे गणिताच्या इतिहासातील सर्वांत क्रांतिकारी संकल्पनांपैकी एक आहे.*
 
*शून्याशिवाय आधुनिक विज्ञान, संगणकशास्त्र, अभियांत्रिकी किंवा वित्तव्यवस्था आजच्या स्वरूपात अस्तित्वात आलीच नसती.* 

शून्याच्या या इतिहासात भारताचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे “शून्याचा शोध कोणी लावला?” असं एखाद्या भारतीय शाळकरी मुलाला विचारलं, तर मोस्टली उत्तर मिळतं, भारताने! या उत्तरात अर्थातच कल्पनेमागचा अभिमान आहे. मात्र, या संपूर्ण संकल्पनेचा शोध एकाच संस्कृतीने लावला, इतकी ही कथा साधीसरळ आहे का?

*शून्याचा इतिहास काय सांगतो?*
मुळात, शून्याचा इतिहास समजून घेण्यासाठी आधी तीन वेगवेगळ्या संकल्पना स्वतंत्रपणे समजावून घ्याव्या लागतात. त्या म्हणजे, दशमान पद्धतीने मोजणी (Decimal Counting), स्थानमूल्य पद्धती (Place-value Notation) आणि शून्य (Zero). या तिन्ही संकल्पना परस्परांशी जोडलेल्या असल्या, तरी त्यांचा विकास वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये झालेला आहे.

*दशमान मोजणीची पद्धत म्हणजे काय ?*
याचा साधा अर्थ, दहाच्या गटांमध्ये मोजणी करणं असा आहे. माणसांच्या हातांना दहा बोटं असल्यामुळे व्यवहाराला प्रारंभ झाल्यापासूनच दहाच्या आधारावर मोजणीची पद्धत विकसित झाली असावी, असं मानलं जातं. ऋग्वेद आणि यजुर्वेदासारख्या प्राचीन भारतीय ग्रंथांतून तर असं दिसतं की, भारतात विकसित दशमान मोजणीपद्धती अस्तित्वात होतीच. इतकंच नव्हे, अत्यंत मोठ्या संख्यांसाठीही स्वतंत्र नामसंज्ञा वापरल्या जात होत्या.

*दशमान मोजणी पद्धतीचं श्रेय कोणाचं?*
आता प्रश्न असा येतो की, दशमान पद्धती केवळ भारतातच विकसित झाली होती का? तर साधारण इ.स.पूर्व ५५० च्या आसपासच्या ग्रीक अभिलेखांमध्येही दशमान मोजणी दिसते. त्याहून आधी, साधारण इ.स.पूर्व १५०० च्या आसपासच्या चिनी नोंदींमध्येही अशाच प्रकारची पद्धती आढळते. मोठ्या संख्यांची मोजणी करण्यासाठी दशमान पद्धत व्यावहारिक असल्यामुळे अनेक संस्कृतींनी ती स्वतंत्रपणे विकसित केली, असंही त्यातून दिसतं. त्यामुळे या पद्धतीच्या शोधाचं श्रेय कुण्या एका देशालाच देता येत नाही.

*स्थानमूल्य पद्धती म्हणजे काय?*
शून्यापर्यंत पोहोचण्याआधीची दुसरी महत्त्वाची संकल्पना म्हणजे, स्थानमूल्य पद्धती (Place-value Notation). या पद्धतीत एखाद्या अंकाचं मूल्य तो अंक संख्येमध्ये कुठल्या स्थानावर आहे, यावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ, ‘१’ हा अंक १, १० किंवा १०० दर्शवू शकतो. तो कोणत्या स्थानी आहे, यावर त्याचं मूल्य ठरतं. पुढे जाऊन ही पद्धती वापरूनच अगदी मोजक्या चिन्हांसह अत्यंत मोठ्या संख्या लिहिणं शक्य झालं.

*ब्राह्मी अंकांची खासियत काय?*
भारतातले सुरुवातीचे अंक, ज्यांना आपण ब्राह्मी अंक म्हणतो, ते स्थानमूल्य पद्धतीवर आधारित नव्हते. १०, २० किंवा १०० यांसारख्या संख्यांसाठी स्वतंत्र चिन्हे वापरली जात. ही पद्धत काही प्रमाणात रोमन अंकांशी जुळणारी होती. उपलब्ध पुराव्यांनुसार भारतात लिखित स्वरूपातला स्थानमूल्य पद्धतीचा वापर साधारण इ.स.च्या तिसऱ्या शतकाच्या आसपास स्पष्टपणे दिसू लागतो.

*भारतीय बौद्धिक परंपरेचं शक्तिशाली वैशिष्ट्य काय ?*
मर्यादित घटकांच्या साहाय्याने अमर्याद संकल्पना निर्माण करण्याची विचारपद्धती भारतात अत्यंत पुरातन आहे. संस्कृत व्याकरणकार पाणिनींनी मर्यादित ध्वनी आणि नियमांच्या आधारानं असंख्य शब्दरचना कशा निर्माण होऊ शकतात, हे दाखवून दिलं. याचप्रमाणे दहा अंकांच्या साहाय्याने अनंत संख्या व्यक्त करता येतात. मर्यादित चिन्हांचा संच वापरून अमर्याद संकल्पना व्यक्त करण्याची ही कल्पना भारतीय बौद्धिक परंपरेतील एक शक्तिशाली वैशिष्ट्य म्हणून पाहता येते. ‘अनंत’ या संकल्पनेबद्दलची भारतीय विचारपरंपरेतील सहजता याच्याशीही तिचा संबंध जोडला जातो.

*स्थानमूल्य कल्पनेत चीनचं योगदान काय?*
एकीकडे भारतीय विद्वानांची घोडदौड सुरु असताना तिकडे, चिनी गणितज्ञांनीही अत्यंत प्रगत स्थानमूल्य पद्धती विकसित केली होती. साधारण इ.स.पूर्व ४०० पर्यंत चीनमध्ये counting rods, म्हणजे मोजणीसाठीच्या काड्यांचा वापर केला जात होता. या काड्या विशिष्ट क्रमाने मांडून एकक, दशक, शतक आणि सहस्र अशा स्थानांचं मूल्य दाखवलं जात असे. ही पद्धत आज आपण वापरत असलेल्या लिखित अंकपद्धतीसारखी नव्हती. मात्र एखाद्या चिन्हाचं मूल्य त्याच्या स्थानावरून बदलतं, ही मूलभूत संकल्पना चीनमध्ये भारतापेक्षा बऱ्याच आधी अस्तित्वात होती. म्हणूनच स्थानमूल्य पद्धतीचा शोध केवळ भारतातच लागला, अशी मांडणी इतिहासिक पुराव्यांशी पूर्णपणे जुळत नाही.

*‘शून्य’ आलं कसं?*
या ज्ञानपरंपरेतली तिसरी आणि सर्वात महत्त्वाची संकल्पना म्हणजेच, शून्य. स्थानमूल्य पद्धतीत एखादं स्थान रिकामं असल्याचं दाखवण्यासाठी स्वतंत्र संकेताची गरज निर्माण होते. उदाहरणार्थ, २०४ आणि २४ या दोन संख्या वेगळ्या दाखवण्यासाठी मधलं ‘दशकाचं स्थान’ रिकामं असल्याचं दाखवणं आवश्यक आहे. याच गरजेतून placeholder, म्हणजे रिक्तस्थान दर्शक म्हणून शून्याची कल्पना विकसित झाली.

*शून्याचा शोध भारतात लागला का?*
याचं एक उत्तर असं आहे की, शून्याचं चिन्ह स्पष्टपणे दाखवणारा सर्वांत जुना शिलालेख अद्याप तरी भारतात आढलेला नाही. कंबोडियातल्या इ.स. ६८३ च्या एका शिलालेखात शून्यासाठी बिंदूसारखं चिन्ह वापरलेलं आढळतं. साधारण त्याच कालखंडातले अशाच प्रकारचे पुरावे इंडोनेशियातही आढळले आहेत. भारतात वापरात असलेल्या शून्याच्या चिन्हाचा निर्विवाद अभिलेखीय पुरावा ग्वाल्हेरमधील चतुर्भुज मंदिराच्या इ.स. ८७६ च्या शिलालेखात दिसतो. या शिवाय बख्शाली हस्तलिखितही मोलाचं आहे. त्यामध्येही रिकाम्या स्थानासाठी बिंदूचा वापर केलेला आहे. मात्र, या हस्तलिखिताच्या कालमापनाबाबत अभ्यासकांमध्ये आजही मतभेद आहेत. त्याचे काही भाग साधारण सातव्या शतकाच्या आसपासचे मानले जातात.
*वैज्ञानिक दृष्टिकोन 9028261973*

*शून्य चिन्हाचा आग्नेय आशियाशी संबंध काय?*
जोसेफ नीडहॅम (Joseph Needham) आणि लॅम ले-यॉन्ग (Lam Lay-Yong) या सारख्या अभ्यासकांनी असं सुचवलंय की, लिखित शून्याचं चिन्ह आग्नेय आशियात विकसित झालं असावं. हा असा प्रदेश होता, जिथे भारतीय संस्कृती आणि चिनी गणितीय परंपरा व्यापार सांस्कृतिक संपर्कातून एकमेकांना भेटत होत्या. या मतानुसार, भारतीय तत्त्वज्ञानातील ‘शून्य’ किंवा रिक्ततेची संकल्पना आणि चिनी स्थानमूल्य पद्धतीची व्यावहारिक गणितीय गरज यांचा संगम अशा प्रदेशात झाला असण्याची अभ्यासकांना दाट शक्यता वाटते आहे. अर्थात, हा सिद्धांत अंतिम किंवा सर्वमान्य आहे, असं नाही. उद्या आणखी काही वेगळंच तथ्य समोर येईल. मात्र यातून एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे, ज्ञानाचा विकास अनेकदा एखाद्या एकाच संस्कृतीत पूर्णपणे स्वतंत्रपणे होत नाही; विविध समाजांमधील संपर्क, व्यापार आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून नवनव्या संकल्पना आकार घेत जातात.

*यांनी ओळखलं शून्याचं मोल*
*शून्य ही संकल्पना केवळ रिकामं स्थान दर्शवणारी नाही, हे सगळ्यात आधी ओळणारं कोण होतं, ते भारतीय गणितज्ज्ञ होते. भारतीयांनीच शून्याला स्वतंत्र गणितीय अस्तित्व असलेली संख्या म्हणून हाताळण्यास सुरुवात केली. शून्याशी बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार कसा करायचा, यासाठी नियम विकसित केले. गणिताच्या इतिहासात ही अत्यंत महत्त्वाची झेप होती. विशेषतः सातव्या शतकातले भारतीय गणितज्ञ ब्रह्मगुप्त यांनी शून्याशी संबंधित गणितीय नियम स्पष्टपणे मांडले. धन आणि ऋण संख्या तसंच शून्य यांच्यातला गणितीय संबंध त्यांनी प्रणालीबद्ध करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.*

*केवळ चिन्ह नव्हे, संख्यात्मक तत्त्व*
भारतीय गणितज्ज्ञांनी बौद्धिक प्रज्ञेच्या बळावर हे दाखवून दिलं की, शून्य फक्त ‘काहीच नाही’ दर्शवणारं चिन्ह नाही; ते गणितीय क्रियांमध्ये सक्रिय भूमिका बजावणारं संख्यात्मक तत्त्व आहे. हीच बाब भारताच्या योगदानाला विशेष महत्त्व देणारी ठरते. भारतातून इस्लामी जग आणि पुढे युरोपकडे भारतीय गणितीय संकल्पना पोहोचल्या. त्या काळच्या अरब आणि पर्शियन विद्वानांनी भारतीय संख्यापद्धतीचा अभ्यास केला, तिचा विस्तार केला आणि ती अधिक व्यापक ज्ञानपरंपरेचा भाग बनवली.

*शून्याचा शोध भारतानं लावला हे म्हणणं चुकीचं?*
एका काळानंतर गणितीय परंपरा युरोपात पोहोचल्या. आज जगभर वापरली जाणारी दशमान स्थानमूल्य अंकपद्धती आणि शून्य आधुनिक गणिताचा पाया बनले. त्यामुळे आज ज्याला अनेकदा ‘हिंदू-अरेबिक न्यूमराल सिस्टम’ म्हटलं जातं, तिच्यामागे विविध संस्कृतींच्या दीर्घकालीन योगदानाची परंपरा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग ‘शून्याचा शोध भारताने लावला’ असे म्हणणे चुकीचे आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात संभवत नाही.

*भारताचं मोल मोठं का?*
शून्याच्या इतिहासाचा विचार करायचा तर, तो तीन स्वतंत्र स्तरांवर पाहणं आवश्यक ठरतं. ते स्तर म्हणजे, दशमान मोजणी, स्थानमूल्य पद्धती आणि शून्याचे स्वतंत्र गणितीय तत्त्व. दशमान पद्धती विविध संस्कृतींनी स्वतंत्रपणे वापरली. स्थानमूल्याची संकल्पना चीनसह इतर ठिकाणीही विकसित होत गेली. रिकामं स्थान दाखवणाऱ्या शून्यसदृश चिन्हांचे पुरावे भारताबाहेरही आढळले. मात्र शून्याला स्वतंत्र संख्या म्हणून गणितीय प्रणालीत स्थान देणं, त्याच्याशी संबंधित गणितीय नियम मांडणं आणि दशमान स्थानमूल्य पद्धतीच्या विकासाला निर्णायक स्वरूप देणं, या प्रक्रियेत भारताचं योगदान निर्विवाद अत्यंत महत्त्वाचं राहिलं आहे.

शून्य हा एका क्षणाचा शोध आहे?
ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करता एवढं निश्चित म्हणता येतं की, शून्याचा इतिहास हा एका देशानं, एका क्षणी लावलेल्या शोधाची कथा नाही. ती अनेक शतकांत आणि अनेक संस्कृतींच्या योगदानातून विकसित झालेली ज्ञानकथा आहे. निःसंशय भारतानं या इतिहासात अत्यंत निर्णायक भूमिका बजावली आहे. विशेषतः ‘शून्याचं गणित’ विकसित करण्यात भारताचं योगदान ही जगाच्या बौद्धिक इतिहासातली असाधारण कामगिरी आहे. या योगदानाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी “भारतानेच सर्वप्रथम सर्व काही शोधलं” अशी अतिशयोक्ती करण्याची जराही आवश्यकता नाही.कारण, उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारानं पुढं येणारं भारताचं योगदान तितकंच विलक्षण आणि अभिमानास्पद आहे.
*(देवदत्त पट्टनायक हे कला, संस्कृती आणि वारसा या विषयांवर लेखन करणारे प्रसिद्ध पुराणकथांचे अभ्यासक आहेत.)*
🙏आपुलकी जपणारी माणसं.🙏
*_संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973_*

Comments

Popular posts from this blog

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.