दूधाचे दात का येतात?

*कुतूहल : दुधाचे दात का येतात?*
_संकलन साहेबराव माने._
_पुणे - 9028261973_
साभार – डॉ. निलेश कोदे
मराठी विज्ञान परिषद. 
*_नवीन वाचकांनी आपल्या विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट इतरांना फॉरवर्ड करा._* 👇

https://chat.whatsapp.com/CbHknUNKpOtCwLCkStDUdS

बाळ जन्मल्यानंतर सहाव्या महिन्यापासून येणारे दुधाचे दात सातव्या वर्षापासून पडू लागतात. ही केवळ एक शारीरिक बदल नसून पक्क्या दातांच्या वाढीसाठी केलेली निसर्गाची पूर्वतयारी असते. दुधाच्या दातांचे महत्त्व आणि त्यांच्या पडण्यामागचे नेमके विज्ञान या लेखातून उलगडण्यात आले आहे.

मुलांच्या शारीरिक विकासात दुधाचे दात महत्त्वाची भूमिका बजावतात; पक्क्या दातांसाठी जागा तयार करणे हे त्यांचे मुख्य काम असते.

सात-आठ वर्षांच्या मुलांचे दुधाचे दात पडायला लागतात आणि मुलांच्या चेहर्‍याला एक वेगळ्या प्रकारचा गोडवा येतो. दुधाचे दात पडणं, ही मुलांच्या वाढीतली एक अत्यावश्यक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण मुळात असे पडणारे दुधाचे दात असतातच का?
बाळ जन्मल्यानंतर साधारण सहाव्या महिन्यापासून दुधाचे दात येण्यास सुरुवात होते आणि ही प्रक्रिया अडीच वर्षांपर्यंत पूर्ण होते. दुधाचे एकूण २० दात असतात. पण गंमत अशी आहे की पक्के दात तयार होण्याची प्रक्रिया ही याहीआधी सुरू झालेली असते. जन्माच्या वेळीच मुलाच्या जबड्याच्या हाडांमध्ये पक्क्या दातांचे अंकुर तयार होत असतात. हे दात लगेच बाहेर येत नाहीत, तर योग्य वेळेची वाट पाहत जबड्याच्या आतच राहतात. कारण तोपर्यंत दुधाच्या दातांना काही कामं करायची असतात.

दुधाच्या दातांची कामं ही अतिशय मूलभूत आणि खूप महत्त्वाची असतात. एक तर तान्ह्या मुलांचा जबडा आकाराने लहान असल्यामुळे त्यात ३२ दात बसण्याएवढी जागाच नसते. त्यामुळे दुधाचे वीस दात, कालांतराने येणार्‍या आणि अधिक खोलवर मुळं असलेल्या पक्क्या दातांच्या आधी अनेक कामं करायला सुरुवात करतात. चावण्याची सवय लावणं, शब्दोच्चारासाठी मदत करणं, चेहर्‍याला योग्य आकार देणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्क्या दातांसाठी योग्य जागा तयार करणं, ही सगळी जबाबदारी दुधाच्या दातांवर असते.

दुधाच्या दातांची मुळं फार खोल नसतात. कारण हे दात कायमस्वरूपी नसतात. अडीच-तीन वर्षांनंतर जबड्यात तयार झालेले पक्के दात हळूहळू वर यायला लागतात. ते वर येताना दुधाच्या दातांच्या मुळांवर दाब देतात. त्याच वेळी शरीरातील विशिष्ट पेशी दुधाच्या दातांची मुळं हळूहळू विरघळवतात. मुळं नष्ट झाल्यावर दुधाचा दात आपोआप सैल होतो आणि पडतो.

साधारण सातव्या वर्षापासून दुधाचे दात पडण्यास सुरुवात होते आणि त्या जागी पक्के दात येऊ लागतात. पक्क्या दातांना व्यवस्थित जागा मिळण्यासाठी दुधाचे दात योग्य वेळी पडणं तितकंच गरजेचं असतं. ही प्रक्रिया १२ वर्षांपर्यंत चालते. पुढे अक्कलदाढा येईपर्यंत, म्हणजे जवळजवळ एकविसाव्या वर्षापर्यंत, दात येण्याचा प्रवास सुरूच राहतो. सात ते बारा वर्षांच्या दरम्यान मुलांच्या दातांमध्ये फटी, वाकडेपणा किंवा ओबडधोबड रचना दिसते. दंतवैद्यकात यालाच ‘अग्ली डकलिंग’ अवस्था म्हणतात. दिसायला विचित्र वाटणारी ही अवस्था तात्पुरती असते.

थोडक्यात, दुधाचे दात पडणं ही बालकाच्या शारीरिक वाढीतली एक नैसर्गिक, नियोजित आणि आवश्यक प्रक्रिया आहे. त्यामुळे या बदलाकडे विकासाचं एक महत्त्वाचं पाऊल म्हणून पाहिलं पाहिजे.. 
*_संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973_*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.