पत्र्याचे छप्पर गंजत का नाही?

*कुतूहल : पत्र्याचं छप्पर गंजत का नाही?*
_संकलन साहेबराव माने._
_पुणे - 9028261973_
साभार - गिरीश घाटे.
मराठी विज्ञान परिषद.

*_नवीन वाचकांनी आपल्या विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि  पोस्ट इतरांना फॉरवर्ड करा._* 👇

https://chat.whatsapp.com/CbHknUNKpOtCwLCkStDUdS

जस्ताचे 'बलिदान' आणि गॅल्व्हनायझिंग प्रक्रियेमुळे पत्र्यांचे आयुष्य कसे वाढते, याविषयी मराठी विज्ञान परिषदेचे गिरीश घाटे यांनी दिलेली ही खास माहिती. 

गॅल्व्हनायझिंग प्रक्रियेमुळे पत्र्यांवरील जस्ताचा थर पोलादाचे ऑक्सिडीकरण होण्यापासून संरक्षण करतो.

कधी विचार केलाय का? घरावरचं पत्र्याचं छप्पर वर्षानुवर्षे ऊन, वारा आणि पावसाला तोंड देत कसं टिकून राहतं? सामान्य लोखंडाला तर लगेच गंज चढतो, मग हे पत्रे गंजत का नाहीत? पाणी आणि हवेच्या संपर्कात आलं की, साधं लोखंड हळूहळू गंजतं. म्हणजेच त्याचं रूपांतर ‘आयर्न ऑक्साइड’मध्ये होतं. पण घरांवर वापरले जाणारे पत्रे साध्या लोखंडाचे नसतात. ते ‘गॅल्व्हनाइज्ड’ स्टीलचे असतात.

हे ‘गॅल्व्हनाइज्ड स्टील’ म्हणजे काय? पोलादाचा पत्रा तयार करताना त्यावर जस्त या धातूचा, एक अतिशय पातळ थर चढवला जातो. या प्रक्रियेला ‘गॅल्व्हनायझिंग’ म्हणतात. जस्ताचा एक खास गुणधर्म आहे. तो म्हणजे जस्त लोखंडाच्या आधी गंजतं. जेव्हा हवा आणि पाऊस पत्र्याच्या संपर्कात येतात, तेव्हा ते थेट लोखंडावर परिणाम करत नाहीत. त्याचा आधी जस्तावर परिणाम होतो. जस्तावर, जस्ताच्या ऑक्साइडचा एक थर तयार होतो. हा थर आतल्या पोलादासाठी जणू एक ढाल बनतो.

विज्ञानाच्या भाषेत याला ‘सॅक्रिफिशिअल ॲनोड प्रक्रिया’ म्हणतात. सोप्या शब्दांत सांगायचं तर, जस्त स्वत: ‘बलिदान’ देऊन पोलादाचं रक्षण करतं. जरी पत्र्यावर ओरखडा पडला किंवा तो कुठे कापला गेला, तरी उघडं पडलेलं पोलाद लगेच गंजत नाही. कारण आजूबाजूचं जस्त आधी गंजतं आणि त्या प्रक्रियेतून पोलाद सुरक्षित राहतं. जोपर्यंत पत्र्यावर जस्ताचा थर आहे, तोपर्यंत आतलं पोलाद गंजत नाही.

अर्थात, या संरक्षणालाही मर्यादा आहेत. जस्ताचा थर संपल्यावर पोलाद थेट हवा आणि पावसाच्या संपर्कात येतं. जस्ताचा ‘पांढरा गंज’ थांबून ‘लाल गंज’ सुरू होतो. हे पत्र्याचं आयुष्य संपत असल्याचं लक्षण! गंजामुळे पत्रा ठिसूळ होतो, छिद्रं पडतात आणि छप्पर गळू लागतं. आजकाल बाजारात आकर्षक रंगांचे पत्रे दिसतात. यांना ‘प्री पेन्टेड गॅल्व्हनाइज्ड स्टील’ म्हणतात.

या पत्र्यांना दुहेरी संरक्षण असतं. आधी पोलादावर जस्ताचा थर असतो. त्यावर पॉलिमरचा एक खास थर दिला जातो. हा थर पाणी आणि ओलावा आत जाऊ देत नाही. सर्वात वर आकर्षक रंगाचा शेवटचा थर दिला जातो. हे आधुनिक पत्रे साध्या गॅल्व्हनाइज्ड पत्र्यांपेक्षा दुप्पट काळ टिकतात. हे पत्रे उष्णता परावर्तितही करतात. त्यामुळे घर आतून थंड राहायला मदत होते.

थोडक्यात काय तर, जस्ताचं ‘वैज्ञानिक बलिदान’ आणि आधुनिक रंगांचं संरक्षण कवच या दोन्हीमुळेच पत्र्याचं छप्पर गंजण्यापासून वाचतं आणि म्हणूनच ते दशकानुदशकं आपल्याला सावली देत राहतं.
*_संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973_*

Comments

Popular posts from this blog

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.