नाणी कोणत्या धातूची असतात?

*_कुतूहल : नाणी कोणत्या धातूची असतात?_*

_संकलन साहेबराव माने._
_पुणे - 9028261973_
साभार – गिरीश घाटे.
मराठी विज्ञान परिषद. 
*_नवीन वाचकांनी आपल्या विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि  पोस्ट इतरांना फॉरवर्ड करा._* 👇

https://chat.whatsapp.com/CbHknUNKpOtCwLCkStDUdS

नाणी ही केवळ आर्थिक व्यवहाराचे साधन नसून ती तत्कालीन तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्था यांचं प्रतिबिंब असतात. भारतात इसवी सनपूर्व काळातली नाणी प्रामुख्यानं चांदीची आणि काही प्रमाणात तांब्याची होती. पुढे यासाठी सोनं, शिसं आणि मिश्रधातू यांचाही वापर झाला. आज मात्र स्टेनलेस स्टील, निकेल-ब्रास मिश्रधातू यांच्यापासून बनवलेली नाणी तसेच बायमेटॅलिक (द्विधातू) नाणी आपण वापरतो. हा बदल केवळ परंपरेमुळे नाही, तर काही विशिष्ट निकषांवर या धातूंची निवड केली जाते म्हणूनच झाला आहे.

भारतात नाण्यांचा वापर इ.स.पूर्व ५००-६०० पासून सुरू झाला. महाजनपद काळात चांदीची नाणी प्रचलित होती. मौर्य, सातवाहन, इंडो-ग्रीक व कुशाण काळात सोनं, चांदी, तांबं आणि शिसं वापरलं गेलं. गुप्त काळात मोठ्या प्रमाणावर सोन्याची नाणी पाडली गेली. मध्य युगात, विशेषत: मुघल काळात, सोन्याची मोहर, चांदीचा रुपया व तांब्याचा दाम रूढ झाला. ब्रिटिश आणि स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात ॲल्युमिनियमसारखे स्वस्त धातू वापरले गेले. नाण्यांसाठी वापरले जाणारे धातू हे प्रामुख्याने त्या काळातील सुबत्तेचं आणि तांत्रिक प्रगतीचं प्रतीक होतं. 

आज बहुतेक नाणी फेरिटिक स्टेनलेस स्टीलची असतात. यात ८३ टक्के लोखंड आणि १७ टक्के क्रोमियम असतं. हा धातू गंजरोधक व पुरेसा कडक असतो. याचे चुंबकीय गुणधर्म त्यातील क्रोमियमच्या प्रमाणानुसार बदलतात. त्यामुळे खोटी नाणी ओळखणं किंवा चुंबकीय फरकांवरून वर्गीकरण करणं सोपं होतं.

काही नाणी निकेल-ब्रासची असतात. त्यात सुमारे ६० ते ७० टक्के तांबं, २० ते ३० टक्के  जस्त व २ ते ६ टक्के निकेल असतं. आजच्या वापरातील १० व २० रुपयांची बायमेटॅलिक नाणी दोन भिन्न धातूंनी बनवली जातात. ही तयार करण्यासाठी उच्च दाबाच्या प्रेसची गरज असल्याने बनावट नाणी तयार करणं कठीण असतं. त्यामुळे ही नाणी आकर्षक व विश्वासार्ह ठरतात.

नाणी सतत वापरली जात असल्यानं त्यासाठी मजबूत व झीज-प्रतिरोधक धातू वापरावाच लागतो. गंज टाळण्यासाठी स्टेनलेस स्टील, क्यूप्रो-निकेल, निकेल-ब्रास यांसारखे मिश्रधातू वापरले जातात. नाण्यांवर स्पष्ट ठसा उमटण्यासाठी योग्य कडकपणा महत्त्वाचा असतो. याशिवाय धातूच्या विशिष्ट चुंबकीय गुणधर्मांमुळे यंत्रांना बनावट नाणी पकडणं सोपं जातं. सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे, नाण्याच्या धातूचं मूल्य त्यापासून पाडल्या गेलेल्या नाण्याच्या दर्शनी मूल्यापेक्षा कमी असावं लागतं! 
*_संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973_*

Comments

Popular posts from this blog

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.