'जीएम अन्नाचा प्रवास'..
*_'जीएम' अन्नाचा प्रवास._*
_संकलन साहेबराव माने._
_पुणे - 9028261973_
*लेखक - डॉ. गिरीश महाजन.*
डॉ. अरविंद देशमुख
mtedit@timesofindia.com
सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ.
+91 98216 28179
साभार - महाराष्ट्र टाइम्स. 19 एप्रिल 2026.
*_नवीन वाचकांनी आपल्या विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट इतरांना फॉरवर्ड करा._* 👇
https://chat.whatsapp.com/CIrYKUoFpYDICjIa1NwqSp
आपण रोज खातो, त्या अन्नात अनेक गोष्टींची गुंफण असते. चव, गंध, रंग यांसह त्या पदार्थाचा उगम कशातून झाला, तो कसा तयार झाला, त्यासाठी कोणते पीक वापरले गेले आणि त्यापलीकडे शेती, हवामान, बाजार आणि विज्ञानाचीही. यातला एक आधुनिक, पण आव्हानात्मक धागा म्हणजे 'जीएम' अन्नपदार्थ महणजेच जनुकीय बदलित अन्न, प्रत्येक पिकाच्या बियाण्यात एक 'सूचना-पुस्तिका (डीएनए) असते. त्यात कुठे काय लिहिले आहे, त्यावरून रोप कसे वाढायचे, त्याचं रूप कसे असायचे, अशी सगळी माहिती ठरते. 'जीएम'मध्ये हा बदल वरून काही लावून केला जात नाही. त्यामुळे रोपाचे वाढणे, फळधारणा हे सगळं नैसर्गिकच होते; फक्त त्या बियाण्यातील 'सूचना' जाणीवपूर्वक बदललेल्या असतात. म्हणूनच 'जीएम' अन्नाची चर्चा केवळ प्रयोगशाळेपुरती नाही; ती रोजच्या अन्नाशी जोडलेली, समजून घेण्यासारखी आणि विश्वासाशी निगडित आहे. 'जीएम' हा शब्द ऐकताच डोळ्यांसमोर चमकदार बहुरंगी दाण्यांनी भरलेला मका, बीटी वांगे, अशी काहीशी विज्ञान रंजक चित्रे उभी राहतात. प्रत्यक्षात ही कथा प्रयोगशाळेत सुरू झाली असली, तरी तिचा शेवट आपल्या ताटात होतो. सन १९७३ मध्ये शास्त्रज्ञ कोणत्याही पेशीतला 'डीएनए' कापणे-जोडणे शिकले. ही घडामोड सामान्यांच्या जगात आली, ती १९९० नंतर, जेव्हा जगभरच्या संस्थांनी अन्नसुरक्षेचे अचूक नियम केले आणि काही उत्पादने बाजारात दिसू लागली. १९९४ मधला 'फ्लेवर सेव्हर टोमॅटो' हा एक गाजलेला टप्पा, कॅलिफोर्नियाच्या कंपनीने तो विकसित केला. उद्देश होता टोमॅटो वेलावरच पूर्ण पिकवता यावा, शेल्फवर अधिक काळ टिकावा आणि दूर वाहतुकीतही तो ताजा राहावा. त्यासाठी पेशींच्या भिंती मऊ करणाऱ्या 'एन्झाइम'ची क्रिया मंदावण्याचे तंत्र वापरले गेले. हा टोमॅटो व्यावसायिकदृष्ट्या फार यशस्वी झाला नाही. त्याचा उत्पादनखर्च अव्वाच्या सव्वा होता आणि तंत्रज्ञानही अपेक्षेइतके फलदायी नव्हते.
काही अपेक्षित गुणधर्म पिकांत विकसित करण्यासाठी अनंतकाळ नैसर्गिक निवडीची वाट पाहत न बसता ते जाणीवपूर्वक घडवून आणता येतात, असे आढळल्यापासून 'जीएम' अन्नाची वाटचाल सुरू झाली. कधी उत्पादन वाढवण्यासाठी, कधी रोगप्रतिकार वाढवण्यासाठी, प्रतिकूल परिस्थितीत तग धरता यावी म्हणून, कधी शेतकऱ्याची जोखीम कमी करण्यासाठी आणि अलीकडे ग्राहकाला दिसतील, असे बदल दाखवण्यासाठीही. या तंत्रज्ञानाची पहिली मोठी यशोगाथा शेतकऱ्याच्या दैनंदिन त्रासाशी जोडलेली आहे. जगातले काही अंदाज सांगतात, की कीड-रोगांमुळे पिकांचे दर वर्षी २० ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. भारतातही चित्र वेगळे नाही. काही अभ्यासांनुसार किडींमुळे उत्पादनात १८ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते, तर तणांमुळे प्रमुख पिकांत १८ ते २६ टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.
*जनुकीय बदल केलेल्या (जीएम) अन्नाचा वापर जगभरात वाढत आहे. भारतामध्ये अनेक बाबींचा विचार करून याबाबतची धोरणे काळजीपूर्वक आखली जात आहेत. बदलते तंत्रज्ञान, नागरिकांची मागणी आणि त्याचे परिणाम अशा पैलूंवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.*
..शेतीतील मेहनत ही जैविक शत्रूशीही रोजची झुंज आहे. यात मदत करण्यासाठी 'जीएम' तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काही पिकांमध्ये असे बदल केले, की किडींमुळे होणारे नुकसान घटले, काही ठिकाणी कोटकनाशकांचा वापर कमी झाला आणि तणनियंत्रण काहीसे सोपे झाले. म्हणूनच सोयाबीन, मका, कापूस अशी मोठ्या प्रमाणावर लागवड होणारी पिके 'जीएम' लाटेत सर्वप्रथम आली. पुढे एकाच वाणात दोन-तीन गुणधर्म एकत्र देण्याची 'स्टॅकिंग' पद्धत रूढ झाली; एका बाजूला किडींपासून संरक्षण, दुसरीकडे तण व्यवस्थापन, एखादा उपाय मोठ्या प्रमाणावर वापरला, की निसर्गही त्याला उलट उत्तर देऊ लागतो. काही देशांत तणनाशक प्रतिरोधक तणे वाढली, तर काही ठिकाणी किडीमध्येही प्रतिकारशक्ती तयार होण्याचा धोका दिसू लागला. जीएम अन्नाबाबत सर्वात मोठा प्रश्न असतो 'हे सुरक्षित आहे का?' आणि या प्रश्नाचं उत्तर आज सरळ हो किंवा नाही असे राहत नाही. आधुनिक जगात सुरक्षिततेची तपासणी अधिक विश्लेषणात्मक आणि शास्त्रीय तर्कानुसार होते. पिकात नेमका कोणता बदल केला? तो बदल स्थिर आहे का? नवीन प्रधिन तयार होत असेल, तर त्यातून अॅलर्जी किंवा इतर त्रास होण्याची शक्यता आहे का? अन्नाच्या एकूण रचनेत काही अनपेक्षित बदल झाले आहेत का आणि सर्वात महत्त्वाचे, मानवाच्या आहारात त्याचा प्रत्यक्ष संपर्क किती? याचे एक अतिशय समजण्यासारखे उदाहरण म्हणजे रिफाइंड साखर, 'जीएम' शुगरबीटपासून बनलेली साखर शेवटी जवळजवळ शुद्ध साखरच असतेः तिथे 'डीएनएचा' प्रश्न रोजच्या सेवनात फारसा उरत नाही. अनेकदा रिफाइंड तेलात 'डीएनए' किंवा प्रथिन अल्पल्प किंवा शोधता न येण्याजोगे असू शकते. याचा अर्थ नियमांची गरज नाही, असा नव्हे; नियमांची गरज आहेच, पण धोका समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानापेक्षा उत्पादनाचा प्रकार आणि सेवनाचे प्रमाण अधिक महत्त्वाचे ठरते. आज अन्नाचा व्यापार जागतिक झाला आहे. एका देशातले
पीक दुसऱ्या देशात प्रक्रिया होऊन तिसऱ्या देशात विकले जाते. अशा वेळी नियम पाळले जातात की नाही, हे तपासण्यासाठी चाचणी व्यवस्था आणि 'देसबिलिटी' म्हणजे अन्नघटक कुठून आला, कुठल्या टप्प्यावर तो कशात मिसळला, त्याचा मागोवा घेता येईल का, हे अत्यावश्यक ठरते. 'जीएम' अन्नाचा वाद केवळ विज्ञानाचा नाही; तो मानके, मोजमाप, तपासणी आणि सरकारव्यवस्था यांचाही आहे. नियम कितीही कडक असले, तरी अंमलबजावणी विश्वसनीय नसेल, तर विश्वास टिकत नाही.
आठ कोटी हेक्टरवर 'जीएम' पिके घेणारी अमेरिका जगात आघाडीवर आहे. ब्राझील, अर्जेटिना, भारत आणि कॅनडा त्यानंतर आहेत. एकट्या सोयाबीनचे क्षेत्र दहा कोटी हेक्टरहून अधिक आहे. आपल्या दैनंदिन खरेदीत 'जीएम' फळे-भाज्या फार दिसत नाहीत, कारण बहुतेक परिणामघटक पिकांतून येतात. ही पिके 'प्रोसेस्ड फूड मध्ये तेल, सिरप, स्टार्च अशा रूपांत शिरतात देशात 'जीएम' तंत्रज्ञानाचा सर्वांत ठळक व्यावसायिक अनुभव म्हणजे बीटी कापूस (२००२), बोंड अळी सारख्या किडींमुळे होणारा तोटा कमी करण्यासाठी ही वाट निवडली गेली आणि कापूस उत्पादन, नियांत व वस्त्रोद्योगाला चालना मिळाल्याचे आढळून आले. आजही बीटी कापूस हे भारतातील एकमेव व्यावसायिकदृष्ट्या परवानगी असलेले 'जीएम' पीक आहे. २००९ मध्ये बीटी वांग्याला मंजुरी दिली गेली; मात्र सुरक्षितता, पर्यावरण आणि जैवविविधतेविषयीच्या चिंतांमुळे त्याला स्थगिती देण्यात आली. 'जीएम मोहरी'ला पर्यावरणीय मंजुरी मिळाली; पण सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणामुळे व्यावसायिक लागवड अद्याप सुरू झालेली नाही. भारतात वारंवार मांडल्या जाणाऱ्या चिंता रास्त आहेत. तणनाशक-सहनशील पिकांमुळे तणनाशकांचा अतिवापर होऊन प्रतिरोधक तणे वाढण्याची शक्यता, कीड-प्रतिरोधक गुणधर्मावर किडींची प्रतिकारशक्ती तयार होण्याचा धोका आणि शेजारील पिकांच्या जैवविविधतेवर आणि परागीभवन करणाऱ्या कीटकांवरील संभाव्य परिणाम हे सगळे प्रश्न शास्त्रज्ञ, शेतकरी आणि धोरणकर्ते यांच्यात अजूनही वादात आहेत. गेल्या वर्षों सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला 'जीएम' पिकांचे नियमन आणि स्वीकारावर राष्ट्रीय धोरण आखण्याचे निर्देश दिले आहेत. आधी अधिक सखोल, स्वतंत्र, दीर्घकालीन अभ्यास, मग व्यापक परवानगी हा सूर भारतात अद्याप ठळक आहे आणि ही सावध भूमिका शेतीधोरणापुरती नाही, तर देशांतर्गत शेतकऱ्यांचे हित जपण्यावर भर देण्यात आला आहे. 'जीनोम एडिटिंग', अचूक चाचण्या, नव्या पिढीची पोषण केंद्रित पिक असे तंत्रज्ञान पुढे जात आहे; पण विज्ञानाचा फायदा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विश्वासार्ह नियम, स्पष्ट संवाद आणि अंमलबजावणीची ताकदही महत्त्वाची आहे.
*_(लेखकद्वय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आपल्या UT&S GROUP 1 चे सन्मानिय सदस्य आहेत.)_*
*_संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973_*
Comments
Post a Comment