सोने का चमकतं?
*कुतूहल - सोने का चमकतं?*
_संकलन साहेबराव माने._
_पुणे - 9028261973_
साभार – गिरीश घाटे
मराठी विज्ञान परिषद.
*_नवीन वाचकांनी आपल्या विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट इतरांना फॉरवर्ड करा._* 👇
https://chat.whatsapp.com/CbHknUNKpOtCwLCkStDUdS
सोनं माणसाला शतकानुशतकं भुरळ घालत आलं आहे. त्याचा रंग आणि चकाकी काही वेगळीच आहे. इतर धातूंमध्येही चमक असते, पण सोन्याची चमक पिवळी आणि जिवंत वाटते. ही चकाकी केवळ सौंदर्याची गोष्ट नाही. तिच्यामागे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राची कारणं दडलेली आहेत.
सर्वप्रथम, धातू म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ या. प्रत्येक धातू अणूंनी बनलेला असतो. प्रत्येक अणूमध्ये मध्यभागी केंद्रक असतं. त्याभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात. सोन्याच्या अणूमधील काही बाहेरच्या कक्षेत फिरणारे इलेक्ट्रॉन केंद्रकाला घट्ट बांधलेले नसतात. ते थोडे ‘मुक्त’ असतात. अनेक सोन्याचे अणू एकत्र येतात, तेव्हा हे मुक्त इलेक्ट्रॉन संपूर्ण धातूमध्ये मोकळेपणाने फिरू शकतात. शास्त्रज्ञ याला ‘इलेक्ट्रॉनचा समुद्र’ असं म्हणतात.
आता प्रकाशाचा विचार करू या. प्रकाश म्हणजे ऊर्जा. तो लहरींच्या रूपात प्रवास करतो. जेव्हा प्रकाश सोन्याच्या पृष्ठभागावर पडतो, तेव्हा तो या मुक्त इलेक्ट्रॉनांवर आदळतो आणि हे इलेक्ट्रॉन्स त्या प्रकाशातील ऊर्जा शोषून घेतात आणि वेगाने थरथरू लागतात. त्यानंतर ते ही ऊर्जा पुन्हा प्रकाशाच्या स्वरूपात बाहेर टाकतात, ज्याला आपण ‘परावर्तन’ म्हणतो. यामुळेच सोनं चमकताना दिसतं.
मग सोनं पिवळंच का दिसतं? आणि चांदी पांढरी का दिसते? याचं उत्तरही प्रकाश आणि मुक्त इलेक्ट्रॉन यांच्या खेळात दडलेलं आहे. चांदीचा पृष्ठभाग प्रकाशातील जवळजवळ सर्व रंग सारख्याच प्रमाणात परावर्तित करतो. म्हणून आपल्या डोळ्यांना चांदी चकचकीत, पण पांढरी दिसते. परंतु सोन्याच्या बाबतीत चित्र थोडं वेगळं आहे. सोन्याच्या पृष्ठभागावर पडलेल्या प्रकाशातील निळ्या आणि जांभळ्या रंगाचा काही भाग सोन्यातील मुक्त इलेक्ट्रॉन शोषून घेतात. उरलेले, प्रामुख्याने लाल आणि पिवळे रंग परावर्तित होतात. म्हणूनच सोनं आपल्याला खास पिवळसर आणि चमकदार दिसतं.
सोन्याचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यावर गंज चढत नाही. म्हणूनच त्याला ‘राजधातू’ (नोबल मेटल) असंही म्हणतात. लोखंड किंवा तांबं हवेतल्या आर्द्रतेशी आणि ऑक्सिजनशी लगेच प्रतिक्रिया करतात. त्यामुळे ते गंजतात आणि त्यांची चमक कमी होते. परंतु सोन्याची ऑक्सिजनबरोबर प्रतिक्रिया होऊनसुद्धा त्यावर गंजाचा थर बसत नाही. त्यामुळे त्याची चमक वर्षानुवर्षं टिकून राहते.
थोडक्यात काय, तर सोन्याची चकाकी ही केवळ दिसण्याची गोष्ट नाही. ती मुक्त इलेक्ट्रॉन आणि त्यांच्या प्रकाश परिवर्तनाची करामत आहे आणि त्याचा एक गुणधर्म हा त्याला गंज न लागण्याचाही आहे. म्हणूनच हजारो वर्षांनंतरही सोनं तसंच चकाकतं आणि आपल्याला ते तेजस्वी व मोहक दिसत राहतं.
*_संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973_*
Comments
Post a Comment