कुतूहल - तिखट खाताना नाकातून पाणी का येतं?

*_कुतूहल - तिखट खाताना नाकातून पाणी का येतं?_*
_संकलन साहेबराव माने._
_पुणे - 9028261973_
साभार – निलेश कोदे
मराठी विज्ञान परिषद. 

*_नवीन वाचकांनी आपल्या विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट इतरांना फॉरवर्ड करा._* 👇

https://chat.whatsapp.com/CbHknUNKpOtCwLCkStDUdS

झणझणीत कट-वडा, तर्री असणारी मिसळ किंवा एखादा तिखट पदार्थ खाल्ल्यावर नाकातून आणि कधी डोळ्यांतूनही अक्षरश: पाणी येतं; तर कधी ‘‘इतकं काही तिखट खाल्लं नाही तरी नाक का वाहायला लागतं?’’ असा प्रश्न अनेकांना पडतो. नेहमीप्रमाणेच, तिखट खाल्ल्यावर नाकातून पाणी येण्यामागेही ठोस विज्ञान दडलेलं आहे.

वैद्यकीय भाषेत तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर नाकातून पाणी वाहण्याच्या या प्रक्रियेला ‘गस्टेटरी रायनायटिस’ असं म्हणतात. ‘गस्टेटरी’ म्हणजे चवीशी संबंधित आणि ‘रायनायटिस’ म्हणजे नाक वाहणं. म्हणजेच चवीमुळे, विशेषत: तिखट चवीमुळे, नाक वाहण्याची क्रिया!

काही भाज्या किंवा मसाल्यांच्या पदार्थात असलेली कॅप्सायसिन, आइसोथायोसायनेट ही रसायनं, त्या त्या पदार्थांच्या एखाद्या विशिष्ट प्रकारच्या तिखटपणाला कारणीभूत असतात. भारतीय खाद्यसंस्कृतीत तिखट भाज्या आणि मसाल्यांना खास स्थान आहे. मिरची, मिरी, इतर मसाले यामध्ये ‘कॅप्सायसिन’ हे रसायन असतं, तर मोहरी आणि मुळ्याच्या तिखटपणाला ‘आइसोथायोसायनेट’ हे रसायन कारणीभूत असतं. ही रसायनं तिखटपणाची जाणीव निर्माण करतात!

नाक, तोंड आणि घशाच्या आतल्या भागावर शेंबडासारखं गुळगुळीत श्लेष्मल आवरण असतं. या आवरणात अनेक प्रकारचे संवेदक आणि ग्रंथी असतात. आपण तिखट पदार्थ खातो तेव्हा त्यातील कॅप्सायसिनसारखी काही तिखट रसायनं या संवेदकांच्या संपर्कात येतात. आणि मग त्यातलेच काही संवेदक, अतिगरम किंवा तिखट रसायनांना संभाव्य ‘धोका’ म्हणून ओळखतात.

यानंतर चेहरा, नाक व मुखाच्या संवेदनांचे मेंदूपर्यंत वहन करणार्‍या मज्जातंतूद्वारे, तोंड किंवा घसा हे अवयव, अतिउष्ण पदार्थाच्या संपर्कात आल्याने ‘जळजळ होण्याचा धोका’ असल्याचा तातडीचा संदेश मेंदूला पाठवला जातो. असे काही उद्दीपित करणारे संदेश आले की मेंदू लगेच कामाला लागतो आणि शरीराच्या संरक्षणासाठी मज्जासंस्था सक्रिय करतो. परिणामी नाकातील ग्रंथींना जास्त प्रमाणात ‘जलीय’ स्राव निर्माण करण्याचे आदेश मिळतात, जेणेकरून त्रासदायक रसायनं पाण्याबरोबर बाहेर जातील. त्याच वेळी नाकाच्या आसपासच्या रक्तवाहिन्या रुंदावतात, त्यामुळे नाक गच्च झाल्यासारखं वाटतं.

तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत ही सगळी संरक्षणात्मक यंत्रणा अतिशय त्वरेने कार्यरत होते आणि एक जैव-रासायनिक प्रक्रिया सुरू होते. तिखटाचा परिणाम कमी झाल्यावर, शरीराला धोका टळल्याचं कळताच ही प्रक्रिया आपोआप थांबते. 

तेव्हा पुढच्या वेळी तिखट किंवा अतिगरम पदार्थ खाल्ल्यावर नाकातून पाणी आलं, तर त्रास मानण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा मेंदू आणि मज्जासंस्था सतर्क आहे आणि शरीराचं संरक्षण करण्याचं काम चोख पार पाडते आहे.
*_संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973_*

Comments

Popular posts from this blog

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.