*_कृष्ण विवराला ग्रहण!_*
*_कृष्णविवराला ग्रहण !_*
_संकलन साहेबराव माने._
_पुणे - 9028261973_
साभार - डॉ. राजीव चिटणीस
निवृत्त शास्त्रज्ञ (बीएआरसी)
सी-4/42, चित्तरंजन नगर, राजावाडी, विद्याविहार.
*_नवीन वाचकांनी आपल्या विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट इतरांना फॉरवर्ड करा._* 👇
https://chat.whatsapp.com/CbHknUNKpOtCwLCkStDUdS
दोन लक्ष प्रकाशवर्षे इतक्या व्यासाच्या आणि आपल्या गाभ्याजवळच्या परिसरातून सतत क्ष-किरणांचे उत्सर्जन करणाऱ्या दीर्घिकेच्या गाभ्याजवळूनच एक अतिशय दाट असा वायूचा ढग सरकत गेला, आणि कृष्णविवराला लागलं ग्रहण !
(*'चंद्रा' अंतराळ दुर्बीण*
'चंद्रा' ही क्ष-किरणांचा वेध घेणारी दुर्बीण नासाने इ.स. 1999 साली अंतराळात सोडली. विख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचं नाव लाभलेली ही दुर्बीण एका कृत्रिम उपग्रहावर बसवलेली असून, ती पृथ्वीभोवतीची आपली प्रदक्षिणा सुमारे चौसष्ट तासांत पूर्ण करते.
या दुर्बिणीची लांबी सुमारे दहा मीटर इतकी असून तिच्या नळकांड्याचा व्यास जवळजवळ सव्वा मीटर इतका आहे. दुर्बिणीचं वजन सुमारे साडेनऊशे किलोग्रॅम इतकं आहे. या दुर्बिणीत क्ष-किरण परावर्तित करू शकतील असे विशिष्ट प्रकारचे चार आरसे बसवलेले असून त्यावर इरिडियम या धातूचा अतिशय पातळ लेप दिलेला आहे.
*कृष्णविवरं, अतिनवतारे यांचं, तसंच दीर्घिकांच्या गाभ्यांचं निरीक्षण करण्याची कामगिरी या दुर्बिणीवर सोपवली गेली आहे. आपली कामगिरी व्यवस्थित पार पाडताना, या दुर्बिणीनं गेल्या सात-आठ वर्षात अतिशय उपयुक्त माहिती गोळा केली आहे. या दुर्बिणीनं काही अनपेक्षित घटनांची नोंदही केली आहे. दीर्घिकेच्या गाभ्यातल्या कृष्णविवराला लागलेलं ग्रहण, हा असाच एक अनपेक्षित शोध आहे.*)
ग्रहणं ही नेहमीच घडून येतात. यात कधी सूर्य झाकला जातो तर कधी चंद्र झाकला जातो. पिधानयुतीसारख्या ग्रहणात एखादा ग्रह किंवा तारा झाकला जातो. खगोलशास्त्रज्ञांना (2020) एक वेगळ्याच प्रकारचं ग्रहण अनुभवायला मिळालं. हे ग्रहण चक्क एका कृष्णविवराला लागलेलं होतं. मात्र, हे ग्रहण टिपलं गेलं ते नेहमीच्या दुर्बिणीतून नव्हे, तर क्ष-किरणांचा वेध घेणाऱ्या दुर्बिणीतून. केवळ अपघातानं दृष्टीस पडलेल्या या ग्रहणामुळं शास्त्रज्ञ अत्यंत उत्साहित झालेले आहेत. संशोधनाच्या दृष्टीनं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या या ग्रहणानं खगोलशास्त्रज्ञांना अतिशय मोलाची माहिती पुरवली आहे. या माहितीचा संबंध हा दीर्घिकांच्या जडणघडणीशी आहे.
*ताऱ्यांचं निवासस्थान*...
दीर्घिका हे अब्जावधी ताऱ्यांचं निवासस्थान असतं. आपलं विश्व हे अशा असंख्य दीर्घिकांनी व्यापलं आहे. या दीर्घिकेच्या गाभ्याचं वजन इतकं असतं की, हा गाभा दीर्घिकेतल्या ताऱ्यांना आपल्या गुरुत्वाकर्षणाद्वारे जखडून ठेवू शकतो. या गाभ्यात प्रचंड वस्तुमानाचं एखादं कृष्णविवर दडलेलं असू शकतं. या कृष्णविवराचं वस्तुमान हे लक्षावधी वा कोट्यवधी सूर्याच्या एकत्रित वस्तुमानाइतकं असतं. (आपली आकाशगंगा हीसुद्धा एक दीर्घिका असून तिच्या गाभ्याशी असलेल्या कृष्णविवराचं वस्तुमान सुमारे पंचवीस लक्ष सूर्य एकत्रित व्हावेत इतकं प्रचंड असावं.)
कृष्णविवरापासून विशिष्ट अंतरापर्यंत त्याचं गुरुत्वाकर्षण इतकं तीव्र असतं की, या अंतराच्या आत शिरलेली फक्त वस्तूच नव्हे, तर प्रकाशकिरण सुद्धा कृष्णविवराकडे खेचले जातात. या विशिष्ट अंतराच्या आत निर्माण झालेल्या प्रकाश किरणांनाही हे गुरुत्वाकर्षण भेटून बाहेर जाता येत नसल्यामुळं, या अंतराच्यापलीकडे काय घडतंय हे आपल्याला बाहेरून दिसू शकत नाही. आपल्या दृष्टीनं हे अंतर एक प्रकारे क्षितिजच ठरतं. म्हणूनच या अंतराला कृष्णविवराचं 'दृश्य-क्षितिज' असं म्हटलं जातं. कृष्णविवराचं वस्तुमान जितकं जास्त, तितकं कृष्णविवराचं दृश्य-क्षितिज मोठं.
*राक्षसी गुरुत्वाकर्षण*...
दृश्य-क्षितिजाच्या बाहेरील प्रकाशकिरण जरी कृष्णविवराच्या तावडीतून निसटू शकत असले, तरी इतर पदार्थमात्र या कृष्णविवराकडून गुरुत्वाकर्षणाद्वारे गिळंकृत केले जाऊ शकतात. हे पदार्थ कृष्णविवरात शिरताना त्यांचा वेग वाढत जातो. या वाढलेल्या वेगामुळं या पदार्थांना प्रचंड ऊर्जा प्राप्त होऊन त्यांचं तापमान लक्षावधी सेल्शियसपर्यंत पोहोचतं. अतिशय तप्त अवस्थेतले कृष्णविवराच्या 'आहारी' जात असलेले हे पदार्थ क्ष-किरण उत्सर्जित करू लागतात. दृश्य-क्षितिजाच्या बाहेर निर्माण होणाऱ्या प्रकाशकिरणांची कृष्णविवरापासून सुटका होऊ शकते आणि ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतात.
कृष्णविवर आजूबाजूचे जे पदार्थ आपल्याकडे ओढून घेतं ते कृष्णविवरात सरळ रेषेत न शिरता, वर्तुळाकार मार्गानं शिरतात. त्यामुळं आत शिरणाऱ्या पदार्थांची या कृष्णविवराभोवती चकती निर्माण होते. या चकतीचा दृश्य-क्षितिजाच्या बाहेरील भागाचा आकार आपल्याला खरं तर स्पष्टपणे दिसायला हवा. परंतु, या चकतीचा एकूण आकार अतिशय छोटा असल्यामुळं आपल्या दुर्बिणींना ही चकती स्पष्टपणे दिसू शकत नाही. जर या चकतीचा आकार कळू शकला, तर या कृष्णविवरांच्या निकटच्या प्रदेशातली रचना आपल्याला कळू शकेल.
*क्ष-किरणांचं उत्सर्जन*...
अव्याहतपणे क्ष-किरण उत्सर्जित करणारा अशा प्रकारचा जागृत अवस्थेतला गाभा बाळगणाऱ्या अनेक दीर्घिका शास्त्रज्ञांना ठाऊक आहेत. अशा दीर्घिकांच्या गाभ्याची रचना प्रत्यक्षात कशी असावी हे जाणून घेण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांकडून गेली कित्येक वर्षं केला जात आहे. शास्त्रज्ञांच्या या प्रयत्नांना अखेर गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात यश लाभलं. आपल्या गाभ्याच्या परिसरातली जडणघडण जाणून घेण्याची संधी शास्त्रज्ञांना अश्मंत या दक्षिणेकडच्या तारकासमूहातल्या एका दीर्घिकेनं मिळवून दिली. ही घटना होती ती वर उल्लेखिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण ग्रहणाची!
*सर्पिलाकृती दीर्घिका*
'न्यू जनरल कॅटलॉग' नुसार 1365 क्रमांकाच्या या सर्पिलाकृती आकाराच्या दीर्घिकेचा व्यास सुमारे दोन लक्ष प्रकाशवर्षं इतका असून या दीर्घिकेचं आपल्यापासूनचं अंतर हे सुमारे सहा कोटी प्रकाशवर्ष इतकं आहे. या दीर्घिकेच्या गाभ्याजवळच्या परिसरातून सतत क्ष-किरण उत्सर्जित होत असतात. या गाभ्यातल्या कृष्णविवराचं दृश्य-क्षितिज हे शुक्र ते सूर्य एवढ्या अंतराइतकं मोठं आहे.
या प्रचंड दीर्घिकेच्या गाभ्याजवळून एक अतिशय दाट असा वायूचा ढग सरकत गेला.
गाभ्याच्या समोरून गेल्यामुळं या ढगानं दीर्घिकेच्या गाभ्याभोवतालच्या चकतीकडून येणाऱ्या क्ष-किरणांना अडवलं. दीर्घिकेच्या गाभ्याच्या परिसराला लागलेलं हे ग्रहण घडून येत असतानाच योगायोगानं 'चंद्रा' ही क्ष-किरणांचा वेध घेणारी अंतराळ दुर्बीण याच दीर्घिकेची निरीक्षणं करीत होती. दोन-दोन दिवसांच्या अशा सहा सत्रांत केली जात असलेली ही निरीक्षणंही पूर्वनियोजित होती. या सहा सत्रापैकी दुसऱ्या सत्रातील काही काळ दुर्बिणीकडून क्ष-किरणांची नोंद न झाल्यामुळे कृष्णविवर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराला
झाकणाऱ्या या ग्रहणाकडे शास्त्रज्ञांचं लक्ष गेलं.
*ग्रहणाचे निष्कर्ष*...
अमेरिकेतल्या 'हार्वर्ड-स्मिथ्सोनियन सेंटर फॉर अॅस्ट्रोफिजिक्स' आणि 'इटालियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोनॉमी' या संस्थांतील गुईदो रिसालिती आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या निरीक्षणांवर आधारित निष्कर्ष काढले. हे निष्कर्ष या वर्षीच्या तीस मार्चच्या 'दी अॅस्ट्रोफिजिकल जर्नल'मध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. दीर्घिकेच्या गाभ्याला झाकण्यास या ढगाला दोन दिवसांहून कमी कालावधी पुरेसा ठरला. याचाच अर्थ, हा ढग दीर्घिकेच्या गाभ्याच्या अगदी जवळून गेला.
रिसालिती आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या गणितानुसार क्ष-किरणांना अडवणाऱ्या या ढगाचे कृष्णविवरापासूनचं अंतर हे अवघं एक शतांश प्रकाशवर्ष भरलं. यावरून हे निश्चित झालं की, क्ष-किरणांची निर्मिती कृष्णविवराच्या अगदी निकट होत आहे. कृष्णविवराभोवतालच्या चकतीतला क्ष-किरण निर्माण करणारा भाग हा सूर्य ते पृथ्वी या दरम्यानच्या अंतराच्या फक्त सातपट मोठा असल्याचं त्यांना दिसून आलं. दीर्घिकेच्या एकूण सुमारे दोन लक्ष प्रकाशवर्ष इतक्या प्रचंड आकारापुढे, क्ष-किरणांच्यास्रोताचा हा आकार नगण्यच आहे. या स्रोताचा आकार तिथल्या कृष्णविवराच्या दृश्य-क्षितिजापेक्षा फक्त दहापट मोठा आहे.
अपघातानं दिसलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण ग्रहणानं गुईंदो रिसालिती हा अत्यंत आनंदित झाला आहे. त्याच्या मते, या निरीक्षणांद्वारे आपण या कृष्णविवराच्या अतिशय जवळ पोहोचलो आहोत. इतके जवळ की, कृष्णविवराच्या आसपासच्या क्ष-किरणांची निर्मिती करणाऱ्या या पदार्थांना कृष्णविवराच्या घशात जायला अवघं एक शतक पुरेसे ठरावं. रिसालिती आणि त्याच्या सहकाऱ्यांनी काढलेल्या या सर्व निष्कर्षांना अत्यंत महत्त्व आहे. कारण, हे निष्कर्ष दीर्घिकांच्या गाभ्यांचं स्पष्ट चित्र उभं करण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाची पायरी ठरले आहेत.
*_संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973_*
Comments
Post a Comment