"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल.""लग्नाआधी पत्रिका बघता तितक्याच गांभीर्याने "या" मेडिकल टेस्टचे रिझल्ट्स बघायला हवेत!" संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 21 जानेवारी 2023.

*पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल.*
*लग्नाआधी पत्रिका बघता तितक्याच गांभीर्याने "या" मेडिकल टेस्टचे रिझल्ट्स बघायला हवेत!*
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
21 जानेवारी 2023. 

भाग - 39.

लग्न मग ते ठरवून केलेले असो वा प्रेम विवाह. सर्वसामान्यपणे त्यात मुला-मुलींचे शिक्षण,नोकरी-व्यवसाय, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि या जोडीने पत्रिका कितपत जुळतेय याच गोष्टी पारखून घेण्याकडे अधिक कल असतो.

तुळशी विवाह झाला की वेध लागतात ते लग्नसराईचे. लग्नेच्छुक मंडळी अनुरूप जोडीदार मिळावा अशी मनीषा बाळगून असतात. याकामी घरच्यांनींही कंबर कसलेली असते. *अनेक घरांमध्ये लग्न जुळवताना जन्मपत्रिकेतील गुण जुळतात की नाही हे आवर्जून पाहिलं जात. पण तुम्हाला माहिती आहे का ? सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात लग्न जुळवताना पत्रिका आणि जन्म कुंडली पेक्षा आरोग्याच्या कुंडल्या जुळवणं महत्त्वाचं झाल आहे.*

भावी जोडीदाराबाबत माहिती घेताना त्याची आर्थिक, सामाजिक पत पहिली जाते. पण दुर्लक्ष केलं जातं ते शारीरिक पतकडे. थोडक्यात नव्या जीवनाची सुरुवात करताना वधु आणि वर शारिरीकदृष्ट्या निकोप असणं तितकंच महत्वाचं आहे. यासाठी कोणतंही दडपण किंवा आडपडदा न ठेवता विवाहापूर्वी काही तपासण्या करणं गरजेचं आहे. तुम्हीही विवाह करण्यासाठी उत्सुक असाल तर तुमची आणि तुमच्या पार्टनरच्या या तपासण्या जरुर करा.

काळ बदलला तरी लग्न ठरविण्याच्या निष्कर्षात फारसा फरक पडलेला नाही. अगदी नाही म्हटलं तरी पूर्वी जी खोलवर पत्रिका बघितली जात असत. आता ती वरवर किंवा नावापुरती पहिली जाते पण भावी वधू-वर पुढील संसार करण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या सक्षम आहेत का याचा मात्र अजूनही विचार होताना दिसत नाही.

अशा प्रकारची चाचणी करणे म्हणजे काहीना मानहानीचे लक्षण वाटते तर काहीना ते हास्यास्पद वाटतं, पण डोळे उघडे ठेवून या चाचण्यांचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल की, यामुळे दोन्ही पक्षांची फसवणूक होणार नाही.

*यापूर्वीचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*👇

http://sahebraomane1967.blogspot.com/2023/01/38-9028261973-9422411862-20-2023.html

कित्येकदा वंशपरंपरागत चालत आलेले आजार न सांगण्याकडे लोकांचा अधिक कल असतो. शिवाय त्यातील स्त्री ही गर्भ धारणेसाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत की नाही हे देखील या चाचण्यांमधून समजू शकते. एकदा का तुमची शारीरिक क्षमता लक्षात आली की, पुढील निर्णय घेणे सोपे जाते. तेव्हा कोणकोणत्या चाचण्या करणे आवश्यक आहे हे जाणून घेऊया.. 

१) रक्त गट चाचणी – बऱ्याचदा भावी वधू-वरांचे रक्त गट एकमेकांना अनुकूल असतातच असे नाही. कित्येकदा एकेमकांचे रक्त गट माहित नसल्यामुळे गर्भधारणेच्या सुमारास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. कधी कधी तर यामुळे स्त्री किंवा भावी बाळाच्या जीवावर बेतू शकतं. हे होऊ नये म्हणून ही चाचणी करावी. यात रक्त गट आणि रक्ताचा प्रकार शोधून कोणते गट एकमेकांना पूरक आहेत हे समजते.

२) प्रजनन चाचणी – यात दोघेही शारीरिकदृष्ट्या प्रजननासाठी सक्षम आहेत की नाही हे पहाता येते. याचा फायदा असा होतो की, बाळ होण्यास काही अडचण असेल तर त्या दृष्टीने उपचार पद्धती ठरविता येते.

३) अनुवांशिक आजार चाचणी – या चाचणीमुळे दोघांना वंशपरंपरेमुळे होणारे काही आजार आहेत का,हे समजते. कधी कधी मधुमेह, ह्रदयविकार अशा आजारांची परंपरा असते. वेळीच आजार समजल्यास भावी काळात आपली जीवनशैली कशी ठेवावी याचा अंदाज येतो. शिवाय या आजारांमुळे येणाऱ्या बाळावर काय काय परिणाम होऊ शकतात ,हे समजते.

४) पेल्विक अल्ट्रा साउड चाचणी – यात गर्भाशय, अंडाशय आणि फॅलोपियन ट्युब अशा आतील अवयवांची स्थिती लक्षात येते. यात काही दोष आढळल्यास वेळीच उपचार करता येतात.

५) थॅलेसेमिया चाचणी – थॅलेसेमिया मुळे भावी बाळामध्ये जन्मजात काही दोष निर्माण होण्याची शक्यता असते . यामुळे लग्नापूर्वी ही चाचणी केल्यास बाळाच्या दृष्टीने योग्य ठरते.

६) एच आय व्ही आणि एस टी डी चाचणी – संसर्गजन्य असे हे लैंगिक आजार आहे. जर दोघांपैकी कुणाला एकाला जरी या आजाराची लागण झाली असेल ,तर ती दुसऱ्याला देखील होऊ शकेल. कित्येकदा लग्न होणार नाही म्हणून यासारखे आजार लपविले जातात. किंवा माहित असूनही फसवणूक केली जाते.

ही फसवणूक एखाद्याच्या जीवावर ही बेतू शकते. अथवा एका जोडीदाराच्या चुकीमुळे दुसऱ्या जोडीदाराला विनाकारण नरक यातनांचा सामना करावा लागतो.
म्हणून लग्नाआगोदर ही चाचणी करण्यावर आवर्जुन भर द्यावा.

७) जीनो टाइप चाचणी – ही चाचणी केल्याने भावी बाळामध्ये जेनेटिकली काय दोष निर्माण होऊ शकतात याचा अंदाज येतो .

८) मानसिक आरोग्य चाचणी – मानसिक आजार म्हणजे वेडाच ही संकल्पना आजही आपल्याकडे घट्ट रुजली आहे. त्यामुळेच मानसिक आजारासंदर्भात कोणतीही चाचणी करायची म्हटल्यास, लोकांना त्याचा प्रचंड ताण येतो. परंतु संसार सुखाचा करायचा असल्यास दोघे ही मानसिकदृष्ट्या सक्षम असणे तितकेच गरजेचे आहे. किंबहुना या चाचणीमुळे भावी संसारात कुठे कुठे तडजोड करावी लागेल याचा अंदाज येतो. लग्नाआधी दोघांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा.

९) सी बी सी चाचणी – ही रक्ताची चाचणी असून यात रक्ताव्दारे अशक्तपणा ,कर्करोग ,रक्तस्त्राव यांसारखे विविध विकार शोधता येतात.

१०) रक्तदाब चाचणी – बऱ्याचदा व्यक्तींना आपल्याला रक्तदाबाचा त्रास आहे हेच माहित नसते. हाय किंवा लो रक्तदाबामुळे गर्भधारणेच्या सुमारास जीवावर बेतण्या इतका त्रास होऊ शकतो. त्यामुळेच लग्नाआगोदर दोघांना कोणत्या स्वरूपाचा रक्तदाब आहे हे जाणून घ्यावे.

११) एचआयव्ही टेस्ट : अनेकजण या टेस्टच नाव काढली तरी घाबरतात. पण ही टेस्ट तुमच्या सहजीवनासाठी अतिशय महत्वाची आहे. रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम करणाऱ्या या आजाराची चाचणी करणं अत्यंत गरजेचं आहे.

१२) ओव्हरी टेस्ट : पुरुष असो किंवा स्त्री उशीरा लग्न करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आजकाल वयाच्या तिशीनंतर लग्न करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा वेळी अनेकदा वाढत्या वयामुळे गर्भधारणेची शक्यता कमी- कमी होत जाते. अशा वेळी मातृत्वाचा विचार करणार असाल तर गर्भाशयासंबंधित आवश्यक टेस्ट. गर्भधारणेसंबंधित योग्य कौन्सिलिंग गरजेचं आहे.

१३) वंध्यत्व टेस्ट : आज काळ स्त्री असो व पुरुष वंध्यत्वाची समस्या दोघांनाही समान भेडसावू शकते. अशा वेळी स्त्री असो किंवा पुरुष दोघांनाही ही टेस्ट करणं अतिशय गरजेचं आहे. पुरुषांनी त्यांच्या स्पर्म (शुक्राणू ) ची टेस्ट आणि स्त्रियांनी गर्भधारणेसंदर्भात आवश्यक ती टेस्ट करणं गरजेचं आहे.

१४) अनुवांशिक चाचण्या : अनेकदा दोघांपैकी एकामध्ये तरी काही अनुवांशिक दोष असल्यास हा आजार पुढील पिढीत उदभवण्याची शक्यता असते. अशा वेळी योग्य वेळी अशा दोषांचं झालेलं निदान हे पुढील पिढीसाठी लाभदायक ठरू शकतं.

१५) ब्लडग्रुप टेस्ट : ब्लडग्रुपचा योग्य समन्वय हा देखील पुढील पिढीच्या दृष्टीने गरजेचा असतो. रक्ताचा RH फॅक्टर हा जोडप्यामध्ये सारखा असणं किंवा समन्वय असणं गरजेचं आहे. त्यामुळे गर्भात निर्माण होणाऱ्या समस्या टाळणं शक्य आहे.

१६) रक्तविकार चाचणी : अनेकदा दोघांपैकी एकाला काही रक्ताचे विकार असले की हा दोष पुढच्या पिढीत येऊ नयेत यासाठी या चाचण्या करणं गरजेचं असतं. त्यामुळे हेमोफिलिया आणि थॅलेसिमिया अशा विकारांची चाचणी योग्यवेळी करणं गरजेचं असतं.

*वैज्ञानिक दृष्टिकोण.*
साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
21 जानेवारी 2023. 

*पुढील भागात - फलज्योतिष आणि शास्त्रज्ञांचा इशारा.*
(डॉ. नितीन शिंदे यांच्या पत्रिका जुळवताना या पुस्तकातून.)

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.