"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल."भाग 8. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. आक्टोंबर 2022 .
*पत्रिका आणि जन्म कुंडली चे गौडबंगाल.*
भाग - 8 :
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
3 आक्टोंबर 2022.
*रहस्य जन्मपत्रिकेचे - 2*
दीपालीच्या जन्मावेळी पूर्वेला चार नंबरची कर्क रास उगवत होती. छोट्या अक्षरांच्या रूपामध्ये लिहिलेली अक्षरे ही ग्रहांची नावे आहेत. ग्रहांचे नाव पूर्ण लिहिलेले नसते. आपण त्या अक्षराने सुरू होणार्या ग्रहाचे नाव ओळखायचे असते.
मं : मंगळ, र : रवी (सूर्य), रा : राहू, के : केतू, शु : शुक्र, गु : गुरु, प्लू : प्लुटो, बु : बुद्ध, ने : नेपचून, श : शनी, ह : हर्षल, (युरेनस), चं : चंद्रा
वरील पत्रिकेनुसार चौथ्या क्रमांकाच्या कर्क राशीमध्ये रवी, चंद्र आणि शनी होता. तिसऱ्या क्रमांकाच्या मिथून राशीमध्ये बुध आणि शुक्र होते तर सातव्या क्रमांकाच्या तूळ राशीमध्ये मंगळ आणि गुरू ठाण मांडून बसले होते. जणू काय सर्व ग्रह यांना विचारूनच घर ठरवत असतो. असो, अशा पद्धतीने व्यक्तीची जन्मपत्रिका तयार होते. ही पत्रिका लग्नाच्यावेळी अत्यंत उपयुक्त असते, कारण या पत्रिकेवरूनच कडक मंगळ, कालसर्पयोग काढता येतो आणि व्यक्तीला अडकवून ठेवता येतं. म्हणूनच या जन्मपत्रिकेला लग्नपत्रिकासुद्धा म्हणतात. पत्रिकेचं एक वैशिष्टय़ म्हणजे, व्यक्ती ज्या पृथ्वी ग्रहावर राहत आहे, ती पृथ्वी मात्र कुंडलीमध्ये कुठेही नसते. जी पृथ्वी व्यक्तीला जन्म देते, तिच पालनपोषण करते. तिचं भविष्य घडवते अशा पृथ्वीला यांच्या लेखी काहीच किंमत नाही. मग आपण अशा पत्रिकेच्या माध्यमातून आपलं वैवाहिक जीवन घडवायला जायचं का ? याचा विचार मात्र केलाच पाहिजे. चंद्र ज्या राशीमध्ये असेल ती संबंधी व्यक्तीची रास असते, त्यामुळे दीपालीची कर्क रास आहे.
पंचांगकर्त्यांनी राहू, केतू हे ग्रह वाटतात. परंतु ते ग्रह नसून आकाशातील काल्पनिक छेदनबिंदू आहेत. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा आणि चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा जिथे छेदतात त्या छेदनबिंदूंना पंचांगकर्ते राहू आणि केतू अर्थात राक्षस संबोधतात. ते बिंदू फार घातक आहेत ही भीती निर्माण करणे वैज्ञानिक दृष्ट्या योग्य नव्हे. राहू आणि केतू हे नेहमी सहा घरांचे अंतर राखून असतात. कारण ते एकमेकांपासून १८० अंशावर असतात.
पंचांगवाले युरेनस ग्रहाला हर्षल म्हणतात. युरेनसचा शोध विल्यम हर्षलने लावला म्हणून नव्हे तर हर्षल नाव भारतीय वाटते म्हणून युरेनसला हर्षल म्हणतात. नावात काय आहे ? असे म्हणणाऱ्यांना यांचे काहीच वाटणार नाही. परंतु सामाजिक आणि सांस्कृतिक अभ्यासकांना नाव बदलाचा हेतू समजून येण्यास वेळ लागणार नाही. प्लूटोचं ग्रहपद २००६ साली आंतरराष्ट्रीय खगोलविज्ञान परिषदेने काढून घेतलेले आहे. त्याला आता बटू किंवा खुजा ग्रह म्हणतात. परंतु आजतागायत पत्रिकावाल्यांनी पत्रिकेमधून प्लूटो काढलेला नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट युरेनस नेपच्युन आणि प्लुटो हे उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. ते दुर्बिणीतूनच पाहावे लागतात. दुर्बिणीतून शोधल्यानंतरच ते पत्रिकेत आले. दुर्बिणीचा शोध विज्ञानाने हॅन्स लिपरशेच्या मदतीने १६०८ मध्ये लावला. त्यामुळे कोण कोणावर अवलंबून आहे, हे सुज्ञास समजण्यात अडचण येऊ नये. पत्रिकेच्या या चौकोनाकृती नक्षीवरुन वेगवेगळ्या प्रकारचे योग, दोष, गुणमिलन, घातवार निश्चित केले जातात. प्रत्येक योगाची वैज्ञानिक दृष्टीकोनातून चिकित्सा करणे याप्रसंगी उचित ठरेल.
*यापूर्वीचा "पत्रिका आणि जन्म कुंडली चे गौडबंगाल" भाग 7 वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*
http://sahebraomane1967.blogspot.com/2022/10/7-9028261973-2-2022.html
*वैज्ञानिक दृष्टिकोन.*
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
3 आक्टोंबर 2022.
(पुढील भागात, जंत्री : पत्रिकेतील दोष आणि योगांची)
- *डॉ. नितीन शिंदे*
Comments
Post a Comment