"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल." भाग 32. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 30. आक्टोंबर 2022. "पत्रिका पाहून लग्न करणे योग्य की अयोग्य?."

*"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल."*

भाग - 32. 
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
साभार - सूर्यकांत शिवलिंगप्पा घोडके, पिपळगाव बसवंत, चिटणीस, महाराष्ट्र वीरशैव सभा, पुणे.
30 आक्टोंबर 2022. 

*विवाह जमविताना पत्रिका पाहणे योग्य की अयोग्य?*

विवाह जमविताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. त्यात पत्रिका जमविणे हे एक. वधु-वरांची कुंडली पाहून ज्योतिषी/भटजी १८ पासून ३६ गुण मिळाल्यास तो पत्रिका योग्य गुणांची आहे असे सांगतात. परंतु १८ पेक्षा कमी गुण आल्यास पत्रिका जमत नाही असे सांगितले जाते. त्यावेळी आपल्याला मुलगी पसंत नाही असे सांगितले जाते. अशावेळी आपल्याला मुलगी पसंत असली, स्थळ पसंत असले तरी नाईलाजाने स्थळ सोडून यावे लागते. माणूस सुशिक्षित, सुसंस्कृत झाला पण काही बाबतीत मात्र चाकोरीबद्धताच पसंत केली. त्याच त्या रुढी, परंपरा यांना अधिक कवटाळीत गेल्या मुळे विवाह हा प्रश्न बिकट होत चालला आहे.

विवाह ठरविताना काळानुसार कसे बदल होत गेले याचा जर विचार केला तर रामायण, महाभारत काळात स्वयंवर विवाह केला जात होता. पराक्रमी पुरुष त्याचे शील, साम्राज्य पाहून मुलींना पती निवडण्याचा अधिकार होता. कालांतराने हेच अधिकार पुरुषांना प्राप्त झाले. त्यात मुलीचे कुल, शील, अंग लक्षण वगैरे पाहून विवाह होऊ लागले. यामध्ये पत्रिका पाहण्याचा योग कोठेच पत्ता नव्हता. त्यानंतर मुलीच्या चालण्या-बोलण्यावरून तिच्या चारित्र्याविषयी माहिती काढून, मूल्यमापन करून मुलीस होकार किंवा नकार देत असत. साधारण ३०-४० वर्षांपूर्वीच्या काळात आपण डोकावून पाहिले तर त्यावेळी मुला-मुलींची पत्रिका नसत, किंवा जन्म टिपण व्यवस्थित टिपून ठेवण्याचे भानही कोणास रहात नव्हते किंवा खेड्यात दाई मुलाला किंवा मुलीचे बाळंतपण करताना घड्याळे नव्हती. म्हणजेच असे म्हणावयाचे आहे की, जन्म वेळ अचूक असल्याशिवाय कुंडली खरी ठरू शकत नाही. वडीलमाणसं लग्नानिमित्त एकत्र येऊन त्यावेळी गावातील प्रतिष्ठीत माणसांच्या घरी विवाह ठरविले जात. हे वधुवर मुलाला किंवा मुलीला हे माहित नसे. घरातील माणसे त्या मुलीला लक्ष्मी मानून होकार देण्याची परंपरा होती. परंतु हल्ली विवाह जमविताना पत्रिकेचे फार स्टोम माजविले जाते. ही परिस्थिती अलिकडे २०/२५ वर्षांपासून रुढली आहे. पूर्वीच्याकाळी मागच्या पिढीतील माणसे आज म्हणतात आमच्यावेळी कोठे होती पत्रिका? आमची झाली ना लग्नं. आमचा संसार झाला. आम्हाला नातू पणतू झाले ना, आमचे कोठे अडले ?

विवाह जमविताना रूप, शिक्षण, कर्तुत्व, आर्थिक स्थिती, छंद व अशा अनेक गोष्टी तर महत्वाच्या आहेत पण आजकाल पत्रिकेला फार महत्व दिले जाते. कधी कधी बाकीच्या सर्व गोष्टी होऊनही केवळ पत्रिक न जमल्यामुळे विवाह होऊ शकत नाही.

मग विचार येतो की खरंच पत्रिका जुळणे इतके महत्त्वाचे असते का? पत्रिका जुळविताना होणारा वेळेचा अपव्यय आपण टाळू शकणार नाही का ? मनासारखी पत्रिका जमतेच असे नाही. काही वेळेस गोत्र, एक नाडी, राजस मनुष्य दोष, कुल दोष, अनिष्ट योग हे नसले तरी शेवटी मंगळ असतो. सर्व अडीअडचणीतून सही सलामत बाहेर पडणे हे फार अवघड झाले आहे. माझ्या माहितीप्रमाणे पत्रिका न पहाता ही विवाह होऊन संसार व्यवस्थित आहेत व २८ किंवा ३६ पर्यंत गुण जमून केलेल्या विवाहितांची त्रेधा तिरपिट झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

विवाह जमविताना एक नाडी दोष आहे म्हणून स्थळ नाकारताना रक्तगट जरुर तपासून पहावा. त्याचबरोबर घरातील बाईवडिलांना असलेले अनुवांशिक आजाराची माहिती घेणे अत्यंत गरजेचे आहे.

पत्रिका जुळविताना पत्रिकेची सत्यता हाही विचार करण्याचा मुद्दा येतो. बऱ्याच वेळा जन्म वेळेची अचूक नोंद घेतलेली नसते, कधी कधी पत्रिका तयार करणारे ज्योतिषी हे पूर्ण ज्ञानी नसतात. त्यामुळे पत्रिका चुकीच्या करतात, पत्रिका अत्यंत ढोबळ स्वरूपाची असते.

तसे पाहिले तर विवाह योगायोगाची गोष्ट असते. प्रत्येकाचा विवाह यशस्वी होतो असे नाही, इतर समाजात सर्वजण कुठे पत्रिका पाहून विवाह जमविले जातात. त्यांचे विवाह ही यशस्वी होतातच ना ? परस्परांचे विचार आवडी-निवडी, छंद, व्यक्तिमत्व, आर्थिक स्थिती या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. ३६ गुण जमूनही संसाराचे १२ वाजतात आणि गुण न जमणारे किती तरी दांपत्य सुखाचा संसार करत आहेत. 

*विवाह जुळविताना पत्रिकेचा आधार ज्ञानी - अज्ञानी लोकांना किती काळ लागणार आहे कोणास ठाऊक ?*


*यापूर्वीचा "पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल."*
भाग 31.
वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

*"लग्नगाठ : जुळूनि येता रेशीमगाठी."*

http://sahebraomane1967.blogspot.com/2022/10/31-9028261973-29-2022.html

वैज्ञानिक दृष्टिकोण.
साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
30 आक्टोंबर 2022.

पुढील भागात - *"भानगड ९६ कुळीची."*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.