"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल." भाग 29. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 27. आक्टोंबर 2022. "कुंडलीचा मेळ आणि आयुष्याचा खेळ."
*"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल."*
भाग 29.
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
27 आक्टोंबर 2022.
*"कुंडलीचा मेळ*
*आणि आयुष्याचा खेळ."*
.... प्रदीप चंद्रकांता गजानन ढोबळे
BE MBA BA LLB
9820350758
*हल्ली मुला-मुलींचे लग्न जोडणे फारच कठीण झालय. आजची उच्चशिक्षित मुलं-मुली आणि त्यांचे पालक मुला-मुलींच्या आवडीनिवडी पेक्षा मुलामुलींची कुंडली जमते का यात जास्त विश्वास ठेवतात. कुंडली जमली तरच पुढील वार्ता होते; स्वतः एका मुलीचा बाप म्हणून जेव्हा मी लग्न जोडण्यासाठी समाजात वावरलो तर माझ्या लक्षात आले की 95 टक्के पालक हे पहिले कुंडली जमतं का हे बघतात? म्हणजे एकूणच आपल्या मुला-मुलीं पेक्षा त्यांचा कुंडलीवर जास्त विश्वास.* अच्छा किती बरं लोकांना ही कुंडली समजते. तर कुंडली बाबत सर्वच अज्ञानी. *म्हणजे कुंडली पाहणाऱ्या भटजी वर अवलंबून लग्न करणे एवढेच आता शिकलेल्या सवरलेल्या लोकांच्या हातात राहिलेले आहे.* कुंडल्या बनतात नवग्रहतून. आता खरं बघायला गेलं तर सूर्य हा तारा आहे, पण कुंडली साठी त्याला ग्रह मानतात. चंद्र हा उपग्रह आहे, पण त्यालाही ग्रह म्हणतात. राहू आणि केतू हे ग्रह अस्तित्वातच नाही परंतु त्यालाही ग्रह मानतात. *म्हणजे एकूण नऊ पैकी चार ग्रहांचीच कुंडली बरोबर नाही आणि हे ग्रह माणसाची कुंडली जोडणार? किती हा नादानपणा?*
*भारतीय संविधानात भारतीय नागरिकांचे कर्तव्य या प्रकरणात भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाने आपला विज्ञानवादी दृष्टिकोन वाढवावा असे एक कर्तव्य म्हणून सांगितले आहे; परंतु हे एक कर्तव्य पाळण्यास कुणीच तयार नाही. सर्व आपले कुंडली वर /भटजीवर निर्भर.*
*महात्मा फुले यांनी बहुजन समाजाला सुशिक्षित करण्यासाठी 1948 ला पुणे येथे पहिली शाळा काढली. बहुजन समाज फक्त शिक्षितच नव्हे तर उच्चशिक्षित झाला; परंतु या उच्च शिक्षणाचा काय फायदा? कि भविष्यातला साथीदार सुद्धा आपण चर्चा करून ठरवू शकत नाही? कुठल्यातरी असलेल्या नसलेल्या ग्रहाच्या आधारावर असलेल्या कुंडलीच्या द्वारे आपण आपले जीवन अंधारात फेकायला तरुण पिढी व त्यांचे पालक तयार आहोत; परंतु मुला-मुलींनी आपसात चर्चा करून; एक दुसऱ्याच्या आवडी-निवडी; सोबतीने भविष्य घडविण्याची चर्चा असा विवाह करण्याचा मार्ग घेण्याची हिंमत त्यांच्यात नसावी; हे अनाकलनीय आहे; परंतु हीच वस्तुस्थिती ही आहे.*
*यापूर्वीचा "पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल."*
भाग 28.
वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
*"गोष्ट एका लग्नाची."*
http://sahebraomane1967.blogspot.com/2022/10/28-9028261973-26-2022.html
वेगवेगळ्या प्रकारच्या गुढ भीती नष्ट करण्याचे साधन म्हणजे शिक्षण; परंतु भारतातील उच्चशिक्षित लोकांना सुद्धा आज कुंडली जमली नाही आणि लग्न केले; तर वाईट होईल या भीतीने वेठले आहे? *काही मुलींना मंगळ आहे तर काही मुलांच्या मागे शनि लागलेला आहे. गंमतच आहे. पृथ्वीपासून करोडो करोडो किलोमीटर अंतरावर असणारे मंगळ आणि शनी भारतातल्या लग्नास योग्य असणाऱ्या युवक युवती च्या मागे असे लागले आहे की त्यांना अवकाशात आता दुसरे काहीच काम उरली नाही. हे ग्रह भारतातीलच युवक-युवतींच्या मागे लागलेले आहेत; युरोप आणि अमेरिकेतील मुला-मुलींशी त्यांना काही देणे घेणे नाही. सर्व काही विचित्र आहे.*
सुरुवातीला कुंडली जमत नाही असे म्हणणारे भटजी मुला-मुलींच्या आई-वडिलांनी आग्रह केल्यास, मग एखादी पूजा सांगतात, शांती सांगतात आणि मग लग्न होतात. म्हणजे भटजीच्या पूजा आणि शांतीचा प्रभाव एवढा आहे की अवकाशात फिरणारे मंगळ आणि शनि हे ग्रह सुद्धा त्यांच्यापुढे बापुडे आहेत. काय हा पोरकटपणा?
मागे आमच्या एका मित्राच्या मुलाला खानदेशातील एक मुलगी आवडली. दोन्ही कुटुंबांना स्थळ खूप योग्य वाटत होते. मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा खूप आवडला. परंतु मुलीचे वडील म्हणाले कुंडली जमत नाही आणि म्हणून हे लग्न होणे नाही. मध्यस्थी करत मी मुलीच्या वडिलांना विचारले की मुलगा तुम्हाला आवडला आहे का? तर ते म्हणाले की एवढा चांगला मुलगा मला आता बहुदा भविष्यातही भेटणार नाही; संपूर्ण भारत शोधला तरी एवढा चांगला मुलगा मिळणे कठीण. परंतु कुंडलीने घोळ केला.
मी त्यांना विचारलं की भटजी विश्वास पात्र आहे का?
तर ते म्हणाले आमचा पिढीजात भटजी आहे.
मग मी त्यांना विचारले की हे तुम्हाला आवडलेले पहिले स्थळ का?
ते म्हणाले होय.
मी म्हटले भटजी ना तुम्ही किती दक्षिणा दिली?
ते म्हणाले 500 रुपये.
मी त्यांना साधा व्यवहार सांगितला की पहिल्याच वेळी भटजींनी जर का होय म्हटलं, तर पुढे मिळणारे अनेक पाचशे रुपये त्यांना मिळणार नाही. दक्षिणा हे त्यांचे पोट भरायचे साधन आहे. कमीत कमी पाच सहा दक्षिणा घेतल्यावर व एखादी पूजा किंवा शांती केल्यावर ते कुंडली जुळतील असे म्हणतील; अहो हा पोट भरण्याचा व्यवहार आहे.
मुलीचे वडील म्हणाले,: तुम्ही काही ही बोलता.
मी म्हटले मग तुम्ही असे करा नाशिकला जा. तिथे मोठमोठे भटजी आहेत. त्यांची दक्षिण भारी आहे; ते विद्वान आहेत. त्यांनी कुंडली जमते म्हटल्यावर तुम्ही लग्न करणार का?
मी त्यांना आग्रह केला आणि आग्रहाखातर ती नाशिकला गेले. आता नाशिकच्या भटजी साठी बाहेरून येणारे गिराईक रोजचाच नवीन; पुन्हा कधी तो येणे नव्हे; त्यामुळे आहे त्या ग्राहकाकडून जास्तीत जास्त व्यवहार करून घ्यावा; हा त्यांचा उद्देश.
आता मुलीच्या वडिलांनी भटजी ला सांगितले की ही कुंडली जमली तर माझ्या मुलीचे आयुष्य खूप सुखात जाईल.
भटजी म्हणाले माझी दक्षिणा पाच हजार रुपये आहे.
मुलीचे वडील लागलीच म्हणाले कुंडली जमली तर पाच नाही मी सहा हजार रुपये देईल.
आता महाविद्वान भटजी म्हणाले असा योग फार कमी असतो; मुला-मुलींच्या सुखद आयुष् दोघांचाही कुंडली दर्शविते; हे लग्न तुम्ही निश्चित करा.
मुलीच्या वडिलांनी भटजीला सहा हजार रुपये दिले; आणि लग्न मोठ्या धुमधडाक्यात झाले. आणि आज तो मुलगा आणि मुलगी सुखाने संसार करत आहे.
*काळ बदलतो तशी नवीन व्यवस्था जन्म घेते आणि आम्ही नवीन व्यवस्थेत शिरकाव केला पाहिजे. आधी मुला मुलींचे लग्न दहाव्या पंधराव्या वर्षी व्हायचे; त्यामुळे मुला-मुलींचे आईवडीलच लग्नाचा निर्णय घ्यायचे. पुढे मुलामुलींच्या लग्नाचे वय वाढले. आई वडील मुलगा मुलगी मिळून निर्णय घ्यायला लागले. मुलांसोबत मुली सुद्धा उच्चशिक्षित व्हायला लागल्या. आता तर मुला मुलींच्या वडिलांचा अनुभव व मार्गदर्शन आणि मुला मुलींची आपसातील चर्चा हाच लग्नाचा मुख्य आधार असला पाहिजे.
कुठलीही दोन व्यक्ती थोड्याबहुत फरकाने वेगवेगळ्या स्वभावाचे असतात; त्यामुळे कुठलीही लग्न झाले की मुला-मुलींना एक दुसऱ्याला समजून घ्यावे लागते आणि परस्परातील अंतर एक दुसऱ्याला समजून कमी करायचे असते. एक दुसऱ्या मध्ये अंतर किती आहे हे समजून घेण्यासाठी विवाहाआधी दोघांमध्ये चर्चा होणे हे जास्त महत्त्वाचे आहे; ना की कुंडली जुळणे. कुंडली जुळत नसल्यामुळे दोन-दोन तीन-तीन वर्ष मुला मुलींची लग्न होत नाही; आणि ही आज एक फार मोठी सामाजिक समस्या आहे. भटजी नी सुद्धा आता लग्नाआधी कुंडली बघण्यापेक्षा लग्नानंतर मॅरेज कौन्सिलर म्हणून काम करायला पाहिजे आणि आपला उदरनिर्वाह करायला पाहिजे. मॅरेज कौन्सिलर दोघांनाही समजून त्यांच्यातील अंतर व विवाहातील खास खळगे कमी करण्याचे काम करू शकतात; आणि त्यासाठी योग्य ती फी आकारून विवाहाचे प्रमाण समाजात वाढवू शकतात. *सरकारने सुद्धा सहा महिन्याचा मॅरेज कौन्सिलरचा डिप्लोमा अभ्यासक्रमात समाविष्ट करायला पाहिजे. आणि विवाहयोग्य मुला-मुलींना एका महिन्याचा विवाहयोग्य दाखला एखाद्या प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे द्यायला पाहिजे.*
*हा अवैज्ञानिक कुंडलीचा कार्यक्रम सोडून वैज्ञानिक मॅरेज मॅनेजमेंटचा मार्ग नवीन समाजाने स्वीकारला तर मुला-मुलींच्या वाढते लग्नाचे वयाचे प्रमाण सुद्धा कमी होऊ शकते.*
... .... प्रदीप चंद्रकांता गजानन ढोबळे
BE MBA BA LLB
9820350758
*वैज्ञानिक दृष्टिकोण.*
साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
*पुढील भागात "मनापासून विवाह नकोसा?"*
Comments
Post a Comment