"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल." भाग 28. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 26 आक्टोंबर 2022. "गोष्ट एका लग्नाची."
*"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल.*
भाग - 28
लेखन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
26 आक्टोंबर 2022.
*गोष्ट एका लग्नाची...*
पुरोहित (भटजी) वर्गातील व्यक्तीवर विश्वास ठेवून लग्नकार्यात पत्रिकेतला मंगळाला अनन्यसाधारण महत्त्व देऊन लग्न कार्यात विघ्न आणले जाते. अगदी दोन्ही बाजूंनी पसंती झाली असली तरीही मंगळाची परिक्षा घेण्याची कुणाचीच तयारी नसते. खरं तर मंगळ हा पृथ्वीसारखाच दगडमातीचा बनलेला एक ग्रह. पण पुरोहित वर्गाने त्याला पुरता बदनाम करुन टाकले आहे. पत्रिकेत मंगळ घालणारे तेच आणि 15000 /20000 हजार रुपये दक्षिणा घेऊन मंगळाची शांती करुन विघ्न निर्मुलन करणारे तेच. (हे प्रकार सांगली जिल्ह्य़ातील नरसोबाची वाडी / नाशिक मधील काही मंदिरात आणि घरगुती सुद्धा चालतात.) यातील काही रक्कम ते मंगळला देतात की काय जेणेकरून त्यांच्या शांतीयज्ञामुळे मंगळ संबंधित वधुवरांच्या आयुष्यातून निघून जातो.
सकलजनहो, या गोष्टींचा सगळ्यांनीच विचार करायला हवा. आजकाल पुस्तकी शिक्षणाने सम्राट असलेल्यांना अल्पशिक्षित पुरोहितवर्गाने नादाला लाऊन स्वतःच्या रोजीरोटीचा कसा धंदा केला आहे हे याचं मुर्तीमंत उदाहरण आहे.
आपण जे शालेय शिक्षण घेतलं ते वाया गेले का? आपणास काहीच समजत नाही का? या गोष्टींचा विचार करायला हवा. याच विषयाच्या अनुषंगाने सत्य घटनेवर आधारित हा लेख मी लिहिला आहे. ज्या ज्या वेळी मी काणत्याही गोष्टींचं समर्थन करतो त्या त्या वेळी त्या गोष्टीचं प्रथम मी अनुकरण करतो तेंव्हाच मी इतरांना सांगतो. मी लिखाणाच्या माध्यमातून प्रबोधन करत असताना अशाच अनेक वेगवेगळ्या घटना घडल्या / घडवल्या आहेत.
आजच्या काळात शिवाजी महाराज जन्माला यावे असे सगळेच म्हणतात. पण तो माझ्या घरात नको" म्हणणारे लोक सर्वात जास्त आहेत. असं म्हटलं तर शिवाजी जन्म घेणार कोणाच्या घरात?
फुले, शाहू, आंबेडकरांचा आणि महान साधुसंतांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात आपण जन्म घेतला आहे आणि गुणमिलन /पत्रिका /कुंडली पाहून आपण त्या महान साधुसंतांचा अपमान तर करत नाही ना?
... जरा विचार करा.
*यापूर्वीचा "पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल".*
वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
भाग 27.
*आर. एच. विसंगती - लेख 1 आणि 2.*
http://sahebraomane1967.blogspot.com/2022/10/27-9028261973-25-2022.html
*माझ्या भाच्याच्या लग्नाची गोष्ट माझ्याच शब्दात....*👇
*एका लग्नाची गोष्ट.*
1 मे 2016 रोजी आम्ही माझ्या भाच्याला (सुभाष पाटील) वधु (मुलगी प्राजक्ता) पाहण्यासाठी पुण्यातून इस्लामपूर ला गेलो होतो. मुलगा पुण्यात मॅकेनिकल इंजिनिअर आहे.
तत्पूर्वी मुलीकडील मंडळी मुलाच्या घरी येऊन गेली होती. एकंदरीत मुलीच्या घरील लोकांनी मुलग्याला वर म्हणून पसंती दिली होती. पण मुलीला मंगळ असल्याचे सांगितले होते.
मुलीला मंगळ असेल तर सहसा कोणी त्या मुलीला वधु म्हणून कोणी स्विकारत नाही. मुलाच्या आईचा (माझी सख्खी बहीण) एका बाजूने न ना चा पाढा सुरु होता. ती म्हणाली की, आपण फक्त मुलगी बघून येऊया. त्या वर मी स्पष्टपणे सांगितले की, मुलगी बघण्यासाठी गेल्यानंतर मुलाला मुलगी पसंत असेल तर लगेच लग्न ठरवले जाईल आणि त्या वेळी केवळ मुलीला मंगळ आहे म्हणून मुलीला नकार देता येणार नाही. मुलगी पसंत नसेल तर तसं स्पष्ट सांगूया पण मंगळाचे नावाखाली मुलीला नकार द्यायचा नाही.
या प्रकरणात ओळखीच्या एका भटजींनी सल्ला दिला होता की, जर ह्या मुलीबरोबर मुलाचे लग्न केले तर सहा महिन्यात वैध्यव्य येईल. म्हणजे माझ्या भाच्यासाठी भटजींचा सल्ला घातक ठरणार होता. त्यामुळे मुलाची आई ही मुलगी पाहण्यासाठी नको नको म्हणत होती.
मी भटजींचे लग्न पत्रिका /जन्म कुंडली कोणतेही सल्ले बिनकामाचे समजतो. कारण शैक्षणिक दृष्टीने विचार केला तर भटजींचे सल्ल्याला कोणत्याही खगोलशास्त्राचा/विज्ञानाचा आधार नाही. राशी ग्रीक लोकांनी तयार केल्या आहेत तर नक्षत्र भारतीय लोकांचे शोध आहेत.
भटजींनी ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करून सर्व सामान्य माणसाला काही कळणार नाही अशी क्लिष्ट रचना करुन ठेवल्या आहेत.
मुळात आपण आपल्या शिक्षकांना प्रश्न विचारत शिकलो. पण या भटजी नावाच्या गुरुजींना कोणताही प्रतिप्रश्न आपण विचारत नाही. त्याचाच फायदा घेत समाजाला पत्रिका आणि जन्म कुंडली च्या नावाखाली आर्थिक कमाई करण्यासाठी लुट या वर्गाने सुरु केली आहे. वाईट या गोष्टीचं वाटतं की त्यांनी टाकलेल्या दुकानात आपण स्वतः गिराईक म्हणून जातो. दुकानदार धंदा करायलाच बसलेला असतो.
आणि आपण विशेष करून मुलींचे आई-वडील या गोष्टींना अवाजवी महत्त्व देऊन लग्न कार्यात विलंब करताना दिसतात. विवाह संस्था भटजींनी ताब्यात घेतली आहे. याला आपणच जबाबदार आहोत. या बाबतीत अनेक वधुवर सुचक ग्रुप मधील बऱ्याच मुलामुलींच्या आईवडीलांशी माझे अनेक वेळा बोलणे झाले आहे. ज्यांनी स्वतःच्या लग्नात स्वतःची पत्रिका अथवा जन्म कुंडली पाहिली नाही आज तेच या प्रकरणाचा बागुलबुवा करुन बसले आहेत. वाईट याचे वाटते की घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग ते करतच नाहीत. फक्त भटजींनी नकारघंटा वाजवली की सगळे मुसळ केरात जाते यांचे. असो...
शेवटी मुळ मुद्दा.... हो ना करत मुलाची आई सुद्धा मी सुचवलेल्या गोष्टीला तयार झाली. 1 मे 2016 रोजी आम्ही मंगळ असलेल्या इस्लामपूर येथील प्राजक्ता ह्या मुलीशी माझ्या भाच्याचे लग्न ठरवले. आणि 26 मे 2016 रोजी दुपारी कोणतेही विघ्न न येता लग्नाचे सोपस्कार इस्लामपूर येथे पार पडले. 26 मे 2022 रोजी त्या घटनेला 6 वर्षे झाली. ज्या मुलीच्या जन्म कुंडली मध्ये मंगळ आहे आणि जिला सहा महिन्यात वैध्यव्य येईल असे म्हणणाऱ्या आणि लग्नकार्यात अडथळा तयार करुन दाखवणाऱ्या पुरोहीताचे आता काय करायचे? कशासाठी दुधात मिठाचे खडे टाकतात हे पुरोहित? गिराईक आले की काही तरी ठोकून देतात. एकच जन्म कुंडली आणि पत्रिका वेगवेगळ्या भटजींना दाखवली तर वेगवेगळे सल्ले येतात. हे कसे काय ते मात्र आपण विचारत नाही.
आजकाल संगणकाला पुरोहितवर्गाने त्यांच्या पुस्तकांची आज्ञाप्रणाली अगोदरच शिकवून ठेवलेली आहे. कुठेही जा. डाटा भरला की उत्तर ठरलेलेच असते. मुळात संगणकाचा वापर प्रगतीसाठी करायला हवा. इथं मात्र लोकांना अधोगती कडे ढकलण्याचं पातकं ते ओढवून घेत आहेत.
आजरोजी श्री सुभाष आणि सौ. प्राजक्ता यांच्या सुखी संसार वेलीवर कळी फुलली आहे. तीन वर्षे वयाची छानशी मुलगी आहे. गार्गी नावाची. सोबत फोटो दिले आहेत. सत्यता कळावी म्हणून. दोन वर्षांपूर्वी पुण्यात छानसा फ्लॅट घेतला आहे त्या दोघांनी. सुखी संसार सुरु आहे.
गेले अनेक वर्षे मी या विषयावर भटजींच्या 'पत्रिका जुळवताना चे गौडबंगाल' या लेखमालिकाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा असलेल्या आपल्या महाराष्ट्रात गुलमिलन, जन्म कुंडली आणि पत्रिकेला महत्त्व देऊन आपण आपल्याच विचाराचा कोतेपणा दाखवत आहोत असे वाटते. या मधून बाहेर पडलो तर तीच आपल्या या थोर पुरुषांच्या विचाराला श्रद्धांजली ठरेल. ज्या फुले, शाहू, आंबेडकरांचा एकही गुण आपण अंगी बाणवत नसू तर त्या थोर पुरुषांची नावे घेण्याचा अधिकार आहे आपणास का याचा विचार करायला हवा.
आज प्रत्येकाला शिवाजी जन्माला आला पाहिजे असे वाटते. पण तो शिवाजी आपल्या घरात नको, शेजारच्या घरात जन्माला यावा असे वाटते. म्हणजे जे काही होईल ते शेजाऱ्यांच्या घरात. आपल्या घरात नको.
काळाची पावले ओळखून मी काही गोष्टी मध्ये पुढचे पाऊल उचलले आहे. त्या साठी जे जे काही करता येईल ते ते करत आहे.
सुभाष आणि प्राजक्ता च्या लग्नाची गोष्ट लिहिताना काही गोष्टींचा समाचार घ्यावा लागला आहे. अर्थात ती काळाची गरज आहे म्हणून.
*तर ही होती 'सुभाष आणि प्राजक्ताच्या लग्नाची गोष्ट.*
आम्ही लग्नात विघ्न आणणाऱ्या मंगळावर मात केली आहे. जन्म कुंडली आणि पत्रिका ला केराची टोपली दाखवून.
जाता जाता आणखी एक गोष्ट नमुद करावीशी वाटते ती म्हणजे प्रत्येकाला आपल्याच जिल्ह्यातील वधुवर हवे आहेत. ज्या वेळी बायोडाटा तयार केला जातो त्या वेळी त्या मध्ये स्पष्टपणे लिहावं की 'आम्हाला आमच्याच जिल्ह्य़ातील स्थळ हवे आहे असं. म्हणजे बऱ्याच लोकांची विनाकारण चौकशी करणारी फोनाफोनी थांबेल.
पाच हजार वर्षांपूर्वी महाभारतातील गांधारी गांधार देशातून (आताचा अफगाणिस्तान) पाकिस्तान ओलांडून भारतात आली. वहातूक फक्त घोड्यावरून व्हायची तेंव्हा. आणि आज सर्व साधने हातात असताना आपण आपला स्वतःचा जिल्हा सोडू शकत नाही? मग महाभारत आणि रामायण च्या टिमक्या कशाला वाजवायच्या? शाळेत असताना दररोज प्रार्थना म्हणतात "भारत माझा देश आहे" असे आपण म्हणत शिकलो. आज मात्र "भारत माझा देश नाही" तर "माझा जिल्हाच माझा देश आहे" असं वाटतं आहे.
*आणि ह्या सर्व गोष्टी सर्वांना शक्य आहेत. फक्त एक पाऊल पुढे टाकण्याची हिम्मत करायची आहे. मग येतायं ना एक पाऊल पुढे... कि पहिले पाढे पंचावन्न?*
*वैज्ञानिक दृष्टिकोण.*
साहेबराव माने.
पुणे. 9028261973
26 आक्टोंबर 2022.
*पुढील भागात - "कुंडलीचा मेळ आणि आयुष्य खेळ."*
Comments
Post a Comment