"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल". भाग 25. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 21 आक्टोंबर 2022. "नाडीगुणचक्रम."
*"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना जुळवताना चे गौडबंगाल".*
भाग 25
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
21 आक्टोंबर 2022.
*"नाडीगुणचक्रम"*
सर्वात जास्त आठ गुण देणारा आणि भंपकपणाचा कळस असलेला हा विभाग आहे. मुलगा आणि मुलगीच्या नक्षत्रावरून त्यांना अाद्य, मध्य किंवा अंत्य यापैकी एक नाडी मिळते. नाडीचे हे तीन प्रकार नक्षत्रांच्या क्रमांकावरून पाडण्यात आलेले आहेत. ते खालीलप्रमाणे.
आद्य नाडी : - नक्षत्र क्र. १,६,७,१२,१३,१८,१९,२४,२५
मध्य नाडी : - नक्षत्र क्र. २,५,८,११,१४,१७,२०,२३,२६
अंत्य नाडी : - नक्षत्र क्र. ३,४,९,१०,१५,१६,२१,२२,२७
वधुवरांच्या नक्षत्रांचे क्रमांक एकाच नाडीमध्ये म्हणजे आद्य, मध्य, अथवा अंत्त्यमध्ये आल्यास त्याला एकनाड किंवा नाडीदोष समजतात. एकनाड असल्यास त्यांना शून्य गुण मिळतात. आणि लग्न करण्यास मनाई. कारण एकनाड असून लग्न केल्यास वैधव्य प्राप्त होते. साक्षात मृत्यूला सामोरे जावे लागते, असे पंचांगकर्त्यांचे मत.
*(एकनाड आले म्हणजे रक्तगट एकच आहे असा गैरसमज समाजात पसरलेला आहे. त्यावर पुढील भागात सविस्तर माहिती देण्यात येईल.)*
वधुवरांच्या नक्षत्रांचे क्रमांक वेगवेगळ्या नाडीमध्ये आल्यास त्यांना आठ गुण मिळतात. गणिताप्रमाणे अधली मधली गुण देणारी पायरीची सोय गुणनिर्मात्याने ठेवलेली नाही. ही गुणनिर्मात्याची अक्कलहुशारी की, बावळटपणा याचा विचार करण्यास हरकत नाही. प्रथमदर्शनी हे क्रमांक असेच का दिले ? असा प्रश्न कोणाला विचारायचा ? हा एक प्रश्नच आहे. पण याची कारणमीमांसा भौतिक पातळीवर केल्यास आणि थोडासा विचार केल्यास लक्षात येते की हे नाडी प्रकरण हाताच्या बोटांना जे तीन पेरे असतात, त्याच्याशी संबंधित आहे. बोटांचा वरचा पेरा अाद्यनाड, मधला पेरा मध्यनाड आणि तळाचा पेरा अंत्यनाड. वरच्या पेऱ्यास एक क्रमांक, मधल्या दोन, तळाच्यास तीन द्यावे. परत उलट येताना दुसऱ्या बोटाच्या तळाच्यास चार देऊन वरच्या पेऱ्यापर्यंत यावे. अशा प्रकारे सत्तावीस येईपर्यंत अनुक्रमे जावे. लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या चित्रातून नाडी प्रकार समजण्यास अडचण येऊ नये.
*एकाच पेऱ्यामध्ये वधूवरांच्या नक्षत्रांचे क्रमांक आल्यास शून्य गुण देणारा हा प्रकार गणितावर अन्याय करणारा ठरेल, यात शंकाच नाही. केवळ क्रमांकावर आठ गुण देणारा हा विचित्र प्रकार निर्माण करणाऱ्यांचे गुलाम आपण व्हायचं का ? असल्या भंपक गुणांचा प्रसार करायचा का ? हे निश्चितपणे आपणाला ठरवावेच लागेल. अन्यथा शिक्षणाची गंगा आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या समाजसुधारकांच्या कार्यावर बोळा फिरवला असे होईल.*
*नक्षत्र म्हणजे ताऱ्यांचा समूह. तारे म्हणजेच सूर्य. आपल्यापासून प्रचंड अंतरावर असलेले. त्यांचा आपल्या आयुष्याच्या गाठी बांधण्यासाठी वापर करून घेण्यात काय अर्थ आहे? एकदम आठ अथवा शून्य गुण देणारा असा कोणताही प्रश्न सध्या तरी भारताच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आलेला नाही.*
*त्यामुळे पंचांगवाले गुण देण्याच्या बाबतीत शैक्षणिक क्षेत्राच्या फारच पुढे आहेत यात वादच नाही.*
दीपालीचे १० क्रमांकाचे मघा नक्षत्र असल्यामुळे अंत्य नाडी, तर सुनीलचे १७ क्रमांकाचे अनुराधा नक्षत्र असल्यामुळे मध्य नाडी येते. दीपाली - सुनील ही जोडी अंत्य-मध्य या वेगवेगळ्या नाडीमध्ये असल्यामुळे आठ गुण मिळवत टॉपला जाते. आणि त्यांचे पालक विजयी झाल्याच्या अविर्भावात पत्रिका जुळली म्हणत लग्नाला संमती देतात.
खाली काही वधुवरांची रास आणि नक्षत्रे (image मध्ये) दिली आहेत. त्यावरून त्यांची नाडी, गण, योनी बरोबरच त्यांना किती गुण मिळतात हेही काढू शकतो.
दीपाली सुनील जोडी सत्तावीस गुण मिळवून गुणमिलन परीक्षेत पास झालेले आहे, तर वैशाली रोहित जोडी साडेतेरा गुण मिळवून या परीक्षेत नापास झालेली आहे. पण त्यांना परत ऑक्टोबरला परीक्षेत बसता येणार नाही. यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे वैशालीला अठरा गुण मिळवून देणारा दुसरा जोडीदार शोधणे. आणि ही सर्वस्वी आईवडिलांची जबाबदारी आहे. वैशालीने त्यासाठी कोणतेही कष्ट करण्याची गरज नाही.
*जरा विचार करा... अशा प्रकारच्या गुणमिलनातून जोड्या जुळवणाऱ्या व्यवस्थेला आणि तिच्या मागे फरफटत जाणार्या समाजाला काय म्हणायचं ? सर्वसामान्य माणसांच्या अज्ञानाचा फायदा उठवून पिढ्यान पिढ्या स्वतःचे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक हितसंबंध जपू पाहणाऱ्या व्यवस्थेचे षडयंत्र आपण वेळीच ओळखले पाहिजे.*
*यापूर्वीचा "पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल".*
भाग 24
*"राशीकुटगणचक्रम."*
http://sahebraomane1967.blogspot.com/2022/10/24-9028261973-20-2022.html
*वैज्ञानिक दृष्टिकोण.*
साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
21 आक्टोंबर 2022.
*पुढील भागात "लग्नाच्या आधी ब्लड ग्रुप चा गैरसमज".*
Comments
Post a Comment