"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल." भाग . 16. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 11 आक्टोंबर 2022 .

*"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल"*
भाग 16.
 
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
11 आक्टोंबर 2022. 

*वैरवर्ग*

 स्वतःच्या आर्थिक लाभासाठी ज्योतिषांनी वधुवरांमध्ये शत्रुत्व अथवा मित्रत्व निर्माण केलं. वैरवर्ग काढण्यासाठी अथक परिश्रमातून त्यांनी निर्माण केलेलं कोष्टक खाली दिलेलं आहे.

 वधूवरांच्या व्यावहारिक नावांची सुरुवात कोणत्या अक्षरापासून होते, त्यावरून ते कुत्रा, मांजर किंवा सर्प आदी वर्गात समाविष्ट केले जाणार. मला एक साधा प्रश्न पडतो की ट,ठ,ड,ढ,ण ही अक्षरं कुत्र्याने आणि प,फ,ब,भ,म ही अक्षरं उंदराने निर्माण केली आहेत काय ? असो, यांचं सगळं विचित्रच आहे. व्यावहारीक दृष्टीकोनाच्या नेमकं उलटं. माणसाला प्राण्यांच्या रुपात वर्ग करणाऱ्यांच्या बुद्धिमत्तेची कीव करावीशी वाटते. अहो यांना कोणीतरी सांगण्याची गरज आहे की, आदिम अवस्थेतील माणूस पूर्वी प्राणीच होता. पण नंतर त्याने जिज्ञासा आणि बुद्धीच्या सहाय्याने प्राणी वर्गातून शहाण्या अशा माणूस वर्गात प्रवेश केला.

 वैरवर्ग पाहण्याची यांची नियमावली तर फारच अफलातून आहे. वधुवर एकाच वर्गात आले तर त्यांच्यात परस्पर प्रेम, एकमेकांपासून पंचम वर्गात असल्यास वैरभाव आणि इतर वर्गात असल्यास परस्पर समता असते. काय यांचं वधुवरांच्या भावाचं अफलातून गणित. यांची समता कोण कितव्या स्थानावर आहे यावर अवलंबून असते. समतेसाठी स्वतः किंवा समाजाने काहीच करायचं नाही. यांचं वैरभावाचं गणित पण कल्पनेच्या पलीकडचं आहे. केवळ नावातील अद्याक्षरावरुन ते प्रेम, वैर आणि समता याचा लेखाजोखा मांडतात. यांनी वैरभावासाठी पंचमच का निवडलं ? याला कोणता निकष लावण्यात आलेला आहे ? गरुड आणि सर्प, मांजर आणि उंदीर, सिंह आणि गज, कुत्रा आणि हरीण हे परस्पर वैरी होतात काय ? असले त्यांच्या दृष्टीने फालतू प्रश्न त्यांना विचारण्यात काहीच अर्थ नाही.

 एखाद्या वधूचं नाव डिंपल असेल तर ती कुत्रा या वर्गात गणली जाणार आणि वराचं नाव समीर असेल तर तो हरिण वर्गात समाविष्ट होणार. काय पण यांची वर्गवारी करण्याची पद्धत आहे. आपल्या मुलीला कुत्रा आणि मुलाला हरिण समजणाऱ्यांच्या ज्ञानाला सलाम. असो ! डिंपल आणि समीर या दोघांचे वर्ग एकमेकांपासून पंचम स्थानावर येतात, त्यामुळे त्यांच्यात वैरभाव निर्माण होणार. हे आधीच तय झालेलं असल्यामुळे डिंपलला समीर कितीही आवडत असला तरीही लग्न होणार नाही. कारण वैरभाव ! ज्योतिषांचा अभ्यास फार प्रचंड आहे, कारण लग्नानंतर काय होणार याची खडानखडा माहिती त्यांनी जमा केलेली आहे. अक्षरावरून वर्ग काढण्याची आणि उंदीर, साप, कुत्रा अशी नाव देण्याची पद्धत, ज्या बुद्धिवंताने निर्माण केली असेल त्याला सलाम आणि आपल्या पाल्याची अशा प्रकारे वर्गवारी करून घेण्यासाठी जाणाऱ्याला साष्टांग दंडवत ! माझं नाव आहे नितीन, तर पत्नीचा नाव दीपिका. दोघेही सर्प या वर्गात सामावले जातो आणि पंचांगकर्त्याच्या दृष्टीने आमच्यात परस्पर प्रेम आहे असा निष्कर्ष निघतो. आता मला होय म्हणण्याशिवाय पर्याय नाही. कारण नाही म्हटलं तर चळवळीच्या दृष्टीने उक्ती आणि कृतीमध्ये भिन्नता. त्यामुळे पंचांगवाल्याचं खरं ठरलं. अशाच प्रकारे यांचं खरं ठरत आलेलं आहे हे लक्षात घेण्याची नितांत आवश्यकता आहे.

*कडक मंगळाच्या माध्यमातून मंगळाला, साडेसातीच्या माध्यमातून शनीला, आठव्या गुरूच्या माध्यमातून गुरूला तर कालसर्पयोगाच्या माध्यमातून सापाला यांनी बदनाम केलं. मंगळ, शनी, गुरू किंवा सापाला जर खरोखरच भावना असत्या तर त्यांनी त्यांच्यावर कोट्यावधी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला असता. आम्हाला न विचारता आमची परवानगी न घेता आम्हाला का बदनाम करता? म्हणून त्यांनी जाब विचारला असता ना ! पण जित्याजागत्या भारतीय माणसाला हे कळत नाही, तिथं या निर्जीव ग्रहांचं आणि भावना नसलेल्या सापांचं काय चालणार म्हणा !*

*यापूर्वीचा "पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल" भाग 15 वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.* 👇

http://sahebraomane1967.blogspot.com/2022/10/15-9028261973-10-2022.html

🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोण* 🔬
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
11 आक्टोंबर 2022. 

(पुढील भागात गुणमिलनाचे *गौडबंगाल)*

- *डॉ. नितीन शिंदे यांच्या "पत्रिका जुळवताना या पुस्तकातून साभार.*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.