"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल." भाग . 14 - संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 9 आक्टोंबर 2022 .
*पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल.*
भाग - 14.
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
9 आक्टोंबर 2022.
*शनीची साडेसाती*
शनीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी तीन वर्षे लागतात. आकाशाचे बारा भाग बारा राशींच्या रूपाने केलेले असल्यामुळे शनी एका भागामध्ये म्हणजेच एका राशीमध्ये अडीच वर्षे असतो. शनी अनुक्रमांकानुसार आपली जागा बदलतो. शनी आपल्या राशीमध्ये येण्यापूर्वीची अडीच वर्षे, आल्यानंतरची अडीच वर्षे आणि निघून गेल्यानंतरची अडीच वर्षे, असे एकंदर साडेसात वर्षे सदर राशीच्या व्यक्तीला साडेसातीच्या रूपाने लागतात. पीडायुक्त असणारी, अनेक संकटे अंगावर येणारी ही वर्षे आयुष्याला अत्यंत धोकादायक असतात. असे पंचांगवाल्यांचे मत ! साडेसात वर्षे शनीची साडेसाती सुरू असते.
सध्या शनी वृश्चिक राशीमध्ये आहे. अडीच वर्षे तो वृश्चिक राशीमध्ये राहणार. त्यापूर्वी तो तूळ राशीमध्ये अडीच वर्षे होता. नंतर तो धनू राशीमध्ये अडीच वर्षे राहणार. याचाच अर्थ तूळ राशीची शेवटची अडीचकी, वृश्चिक राशीची दुसरी अडीचकी आणि धनु राशीची पहिली अडीचकी सुरू आहे. एकाच वेळी तूळ, वृश्चिक आणि धनु या तीन राशींना सध्या साडेसाती सुरू आहे. बारा राशींपैकी तीन राशींना साडेसाती, म्हणजे पंचवीस टक्के भारतीय जनतेला साडेसाती लागलेली असते. *भारताव्यतिरिक्त जगामध्ये कुठल्याही अन्य देशात हे खूळ नाही. शनी फक्त भारतीयांनाच नावानिशी आणि राशीनिशी ओळखतो का ? ग्रहताऱ्यांचा धाक दाखवून दरवर्षी कष्ट न करता लोकांच्याकडून आर्थिक कमाई चालू ठेवण्यासाठीची पिढ्यान पिढ्यांची ही यंत्रणा आहे. शनी मागे लावून दिला की झालं! काम फत्ते.*
शालेय जीवनापासून शनी उघड्या डोळ्यांनी कधीही पाहिलेला नसतो. शनीची कडी पाहण्याचाही योग कधीही आलेला नसतो. खगोलाबद्दलची अनास्थाच याला कारणीभूत आहे. शनि पृथ्वीपासून जवळपास एकशेचाळीस कोटी किलोमीटर अंतरावर आहे. त्याला भावना, विचारस्वातंत्र्य, बुद्धिमत्ता असण्याचा प्रश्नच नाही. त्याच्याकडून अडचणी निर्माण करणारे, दु:खद घटना घडवणारे प्रकार कसे घडणार ? हे करण्यासाठी माणसाचीच आवश्यकता आहे. हे सर्व खरे आहे हो ! पण शनीकडून काहीतरी येत असलं पाहिजे, त्याशिवाय का परंपरेने हे चालत आलेले आहे ? असे तथाकथित सुशिक्षितांचे मत असते. शनी सूर्यमालेचा सदस्य. सूर्यापासून पृथ्वी तीन नंबरला तर शनी सहा नंबरला. पृथ्वी आणि शनी दोघांनाही सूर्यापासून प्रकाश मिळतो. शनिपासून हा प्रकाश परावर्तित होऊन पृथ्वीवर येणार एवढेच. शनिकडून परावर्तीत झालेल्या प्रकाशापेक्षा सूर्याकडून सरळ पृथ्वीवर येणारा प्रकाश जास्त तेजस्वी आहे. पूर्वीच्या लोकांनी हे सगळ लिहिलं ते काय गाढव होते काय ? असे आणखी त्याच्या पुढचे मत, या शिकलेल्यांचे असते. पूर्वीचे लोक गाढव नव्हते आणि फार हुशारही नव्हते. कारण त्यावेळेस ज्ञानाच्या कक्षा एवढ्या प्रगल्भ नव्हत्या. त्यांनी जी निरीक्षणे नोंदवली ती त्या काळात उच्च दर्जाचीच होती यात वादच नाही. त्या अभ्यासाच्या पुढे जाण्याची आजच्या माणसाची दृष्टी हवी होती. पण तसे न होता भारतीय समाज ग्रहताऱ्यांच्या संदर्भात अतार्किक गोष्टींमध्येच जास्त गुरफटलेला आहे. खगोलाचा विचार केल्यास आज एकविसाव्या शतकात ज्योतिषावर विश्वास ठेवणार्यांपेक्षा पूर्वीचे लोक फारच प्रगत मानले पाहिजेत. कारण त्यांनी शनी, मंगळ, गुरू, नक्षत्र, रास इत्यादी गोष्टी उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या होत्या.
*तसं पाहिलं तर आपल्या भारतीय जनतेच्या पाठीमागे तथाकथित पंचांगकर्ते गुरुजींनी साडेसाती लावली आहे असच म्हणावं लागेल. कारण साडेसाती आणि तत्सम बाबी खऱ्या असत्या तर शाळेत असताना ह्या गोष्टी शिक्षणाच्या पाठ्यपुस्तकात आल्या असत्या का नाही?*
*यापूर्वीचा पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल" भाग 13 वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*
http://sahebraomane1967.blogspot.com/2022/10/13-9028261973-8-2022.html
*वैज्ञानिक दृष्टिकोण*
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
9 आक्टोंबर 2022.
(पुढील भागात नक्षत्र मुळावर उठते)
- *डाॅ. नितीन शिंदे यांच्या पत्रिका जुळवताना या पुस्तकातून साभार.*
Comments
Post a Comment