"ओळख हिरकणी ची" - 21 आॅगस्ट. जन्म दिनाचे औचित्य साधून "समीक्षा ताई आमटे".

*"ओळख हिरकणी ची - 21 आॅगस्ट. समिक्षा ताई आमटे". (सौ. समिक्षा अनिकेत आमटे. प्रकाश बाबा आमटे यांची स्नुषा.)*
सुमारे तीन वर्षांपूर्वी समिक्षा ताई आमटे यांच्या कारकीर्दीवर आधारित एक लेख वाचला होता. त्या वेळी माझ्या विनंतीला मान देऊन त्या आपल्या फक्त महिलांसाठी राखीव असलेल्या सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप क्रमांक एक मध्ये सहभागी झाल्या. 

आमटे परिवाराबद्दल मी काय लिहिणार.... 😊 जगालाच भुरळ घातली आहे हेमलकसा आणि नेलगुंडा च्या निमित्ताने. सुरवातीला बाबा आमटे. त्यांच्या नंतर प्रकाश आमटे आणि आता सौ. समिक्षा आणि अनिकेत आमटे... अशी ही निरंतर सेवा सुरुच आहे. 

समिक्षा ताई 🙏
तुम्हाला सत्यम् शिवम् सुंदरम् आणि महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप कडून वाढदिवसाच्या 🎂💐🌹
हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा आहेतच.
*औक्षवंत व्हा. किर्तीवंत व्हा. यशवंत व्हा. यशस्वी भव.*

*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇*

http://Sahebraomane1967.blogspot.com

संबंधित लेख 👉 *"चुकते कई बातल आयो" : आदिवासी शाळा - नेलगुंडा गावं. भामरागड तालुका.*
 

*बाबा आमटे यांच्या नातसून आणि अनिकेत प्रकाश आमटे यांच्या सौभाग्यवती समिक्षा ताई आमटे "बोल बरवा" मध्ये. नक्की पाहा.* 👇

https://youtu.be/sDIbbmEZFpk


*समिक्षा ताई यांची हेमलकसा आणि नेलगुंडा आदिवासी बिरादरी शाळा.*

https://youtu.be/CZCad1xq1UE

नेलगुंडाच्या शाळेसंदर्भात सर्वांत धाडसी पण महत्त्वाची गोष्ट मला वाटली, ती शाळेच्या भाषा माध्यमाची. पहिली ते पाचवीपर्यंतची ही शाळा संपूर्णपणे इंग्रजी माध्यमाची आहे. या विषयावर समीक्षा आमटे यांची भूमिका पटणारी आहे. या मुलांची बोली मराठी नाही, ती माडिया आहे. त्यांच्यासाठी मराठी असो की इंग्रजी, दोन्ही भाषा परकीयच आहेत. शिक्षणक्रमात या मुलांना पुढे इंग्रजीलाच सामोरे जावे लागणार आहे. लोकबिरादरीच्या हेमलकसाच्या शाळेचा अनुभव पाठीशी आहेच. म्हणून शाळेच्या दैनंदिन व्यवहारात माडिया आणि इंग्रजीचा जाणीवपूर्वक वापर सर्व विद्यार्थी व शिक्षक करतात, असे दिसले.

नेलगुंडा. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसाच्या पुढे सत्तावीस किलोमीटरवर असलेले एक छोटेसे आदिवासी खेडे. हेमलकसाच्या लोक बिरादरी प्रकल्पाची एक आगळीवेगळी शाळा नेलगुंडाला आहे. त्या शाळेच्या प्रथमदर्शनी भिंतीवर लिहिले आहे, ‘चुकते कई बातल आयो.’ मी समीक्षा आमटेंना विचारलं, ‘‘ह्याचा काय अर्थ?’’- ‘‘ह्याचा अर्थ- चुकलं तर चुकलं, काळजी नको!’’ या उत्तरामागे अनेक संदर्भ कसे दडलेले आहेत, ते पुढे ती जिवंत शाळा बघताना लक्षात आले.

हेमलकसाच्या या वेळच्या भेटीत नेलगुंडाच्या साधना विद्यालयाला भेट देता येईल, असे वाटले नव्हते. पण अनिकेत आमटे यांच्या सूचनेवरून समीक्षा आमटेंच्या गाडीतून गेलो. हेमलकसा ते नेलगुंडा अंतर फार नसले, तरी रस्ता फार खडतर. पण इसुकी या जपानी गाडीमुळे प्रवास थोडासा सुखकर झाला. जाताना तिथल्या जंगलाविषयी आणि माडिया आदिवासी जीवनासंबंधी आमच्या चर्चा सुरू होत्या. एका ठिकाणी समीक्षाने गाडी अचानक थांबवली आणि एक दृश्य दाखविले. एका झाडाला वानर टांगलेले दिसले. अर्थात ते पेंढा भरलेले होते. माडिया गोंड अशुभनिवारण म्हणून अशा प्रकारे झाडावर ते टांगतात. त्या अनुषंगाने आदिवासींच्या प्रथा-परंपरा, लोककला, लोकगीते-लोककथा याविषयी बोलणे होत होते. जाता- जाता मुंग्यांची वारूळे, झाडाझाडांतून सूर मारणारे विविध पक्षी यांची त्या ओळख करून देत होत्या. मी स्वतः गडचिरोली जिल्ह्यातील असलो, तरी माझी बरीचशी माहिती पुस्तकीच.

खरे तर वरोरा येथील महारोगी सेवा संस्था बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या उपचारासाठी व पुनर्वसनासाठी स्थापन केली होती. हेमलकसाचा लोकबिरादरी प्रकल्प त्याच ट्रस्टचा एक भाग. पूर्वी भामरागडच्या घनदाट अरण्यात दळणवळणाच्या कोणत्याच सोई नव्हत्या. रोगराई आल्यास किंवा जंगली जनावराने हल्ला केल्यावर आदिवासींकडे भगत आणि मंत्रतंत्र याशिवाय कोणताच इलाज उपलब्ध नव्हता. उपचाराअभावी मृत्यूलाच तोंड द्यावे लागे. डॉ.प्रकाश आणि मंदा आमटे यांनी हेमलकसाच्या प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या आरोग्यसेवेतून लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले. पण त्या भागात मुलांच्या शिक्षणाच्या सोईही फार नव्हत्या, म्हणून त्यांनी लोकबिरादरी शाळा सुरू केली. शाळाखात्याच्या अनेक अडथळ्यांना पार करावे लागले. या शाळेतून बाहेर पडलेले काही माडिया विद्यार्थी खूप पुढे गेले. अहेरी येथे आरोग्यसेवा देत असलेले डॉ.कन्ना मडावी हे एक उदाहरण.

तर पुढे ‘हेमलकसाच्या दूरवर असलेल्या खेड्यातील लहान मुलांच्या शिक्षणाचे काय?’ असा प्रश्न लोकबिरादरी प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणाऱ्या डॉ.दिगंत आणि अनिकेत आमटे यांना पडला. त्याचे उत्तर म्हणून कदाचित नेलगुंडा या गावाची निवड केली असावी आणि २०१५ मध्ये तिथे आगळीवेगळी एक शाळा साकार झाली. या शाळेची जबाबदारी समीक्षा आमटे यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे, असे कुणाला न विचारातही आपल्या लक्षात येते. जाताना नेलगुंडाच्या शाळेबद्दल समीक्षा भरभरून बोलत होत्या. आजूबाजूच्या दहा-बारा गावांतील मुलं या शाळेत येतात. पण सगळ्या वाटा जंगलातूनच आहेत, त्यामुळे जंगली प्राण्यांची भीती असते. एकदा तर मुलांच्या मागे अस्वल लागले होते. आता त्यांच्यासाठी सायकली घेतल्या आहेत.

आमच्या गाडीला एका मुलीने अचानक समोर येऊन थांबवले. तिच्या बरोबर कडेवर मूल आणि एक गाठोडे घेतलेली एक माडिया तरुण स्त्री होती. मुलगी म्हणाली, ‘‘ताई, या बाईला समोरच्या गावी जायचे आहे, तुमच्या गाडीत न्याल का?’’ अर्थातच समीक्षातार्इंनी गाडीचे दार उघडून त्या बाईला बसवलं. तिची भरपूर चौकशी केली. त्या परिसरात कुठलीच वाहनव्यवस्था नसल्याने त्या लोकांचे कसे हाल होतात, ते मला सांगितले. रस्ता खरोखरच फार दुर्गम होता. मोठमोठे खड्डे आणि दगड- धोंडे चुकवत गाडी चालवणे सोपे नव्हते. अतिशय कौशल्याने समीक्षा गाडी चालवत होत्या. एका वेळी एक वाहन जाऊ शकेल, असा एक पक्का पूल मात्र एका जागी दिसला. पण एकूण प्रवास खडतरच. रस्त्याचा आणि शिक्षणाचादेखील.

६ जून म्हणजे नेलगुंडा शाळेचा शेवटचाच दिवस होता तो. भामरागड परिसरात बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुढे दोन महिने शाळा बंद असणार होती. नेलगुंडाची शाळा ही पहिली ते पाचवीपर्यंतची होती. शासनाची मान्यता असली तरी विनाअनुदान होती, कारण ती पूर्णपणे इंग्रजी माध्यमाची होती. पण त्यामुळे आम्हाला पठडीतील शाळेपेक्षा आमच्या पद्धतीने चालवता येते याचा आनंद आहे, असे समीक्षा म्हणाल्या. उदाहरणार्थ- जून, जुलैमध्ये पाऊस असल्याने शाळा बंद ठेवता येते. शाळाखात्याचे धोरण एकसूत्री असते. त्यात स्थानिक गरजांचा आणि लोकांच्या समस्यांचा विचार कसा केला जात नाही, यावर आमची बरीच चर्चा झाली. पावसाबरोबरच आदिवासींच्या लोकजीवनात काही विशिष्ट सण-समारंभांना फार महत्त्व असते. याउलट ज्या दिवशी सरकारी सुट्‌ट्या असतात, त्यांचे त्यांना तसे महत्त्व नसते. येथील आदिवासींचे जीवन, त्यांच्या गरजा आणि भौगोलिक परिस्थितीशी जुळवून शाळा त्यांच्या सोईची कशी होईल, ते बघतो. शाळा जर अनेक अडचणी निर्माण करीत असेल, तर मुलांना पाठविण्याचा उत्साह त्यांच्यात असणार नाही.

नेलगुंडाची शाळा चालवताना आमटे कुटुंबीयांनी घेतलेल्या या भूमिकेला दोन पदर आहेत. ‘शिक्षण’ ही स्वतंत्र गोष्ट नाही. अध्यापन आणि मूल्यांकनासाठी राज्य शासनाने स्वत:ची एक प्रणाली निर्माण केली आहे. नेलगुंडाची शाळा स्वायत्त नाही, पण स्वतंत्र आहे. हे एक प्रकारे राज्याच्या सार्वभौमत्वाला आव्हानच आहे. दुसरीकडे आदिवासींच्या सामाजिक व भौगोलिक परिस्थितीशी जुळवून त्यांच्यापर्यंत शिक्षण घेऊन जाणे, ही एक गोष्ट आहे. मला ही दुसरी गोष्ट महत्त्वाची वाटते. यात उदारमतवाद व बहुसांस्कृतिकता आहे. त्या-त्या समूहाचे भाषिक आणि सांस्कृतिक अस्तित्व मान्य करणे आहे. लोकशाहीच्या शुद्ध रूपाकडे जाणारा तो प्रवास आहे. शिक्षणाच्या एकाच मध्यवर्ती साच्यात सर्वांना कोंबण्यापेक्षा, शेवटच्या स्तरावरील समूहाला शिक्षणाच्या प्रवाहात आणताना त्याचे सत्त्व जपण्याची ही मौलिक भूमिका रवीन्द्रनाथ टागोर यांच्या भूमिकेशी सुसंगत आहे.

नेलगुंडाच्या शाळेसंदर्भात सर्वांत धाडसी पण महत्त्वाची गोष्ट मला वाटली, ती शाळेच्या भाषा माध्यमाची. पहिली ते पाचवीपर्यंतची ही शाळा संपूर्णपणे इंग्रजी माध्यमाची आहे. या विषयावर समीक्षा आमटे यांची भूमिका पटणारी आहे. या मुलांची बोली मराठी नाही, ती माडिया आहे. त्यांच्यासाठी मराठी असो की इंग्रजी, दोन्ही भाषा परकीयच आहेत. शिक्षणक्रमात या मुलांना पुढे इंग्रजीलाच सामोरे जावे लागणार आहे. लोकबिरादरीच्या हेमलकसाच्या शाळेचा अनुभव पाठीशी आहेच. म्हणून शाळेच्या दैनंदिन व्यवहारात माडिया आणि इंग्रजीचा जाणीवपूर्वक वापर सर्व विद्यार्थी व शिक्षक करतात, असे दिसले. जैवविविधतेप्रमाणे मानवी अस्तित्वासाठी भाषिक विविधताही महत्त्वाची आहे. किंबहुना, कला आणि जीवनमूल्यांचा विचार केला, तर भाषिक विविधता अधिक महत्त्वाची ठरते. एखाद्या भाषिक समूहाचे हजारो पिढ्यांचे ज्ञान त्यांच्या भाषेतच दडलेले असते. ते त्यांच्या जैविक आणि सामाजिक पर्यावरणाचा अविभाज्य भाग असते. त्यामुळे माडिया मुलांना प्राथमिक स्तरावर त्यांच्या मायबोलीच्या कोशाचा आधार कायम असणे गरजेचेच असते.

नेलगुंडा शाळेच्या परिसरात प्रवेश करताच ती शाळा आहे असे वाटतच नाही. जपानी पॅगोडासारखे सर्व बाजूंनी मोकळे असलेले सुंदर डोम आहेत. भोवतालच्या झाडीमुळे हवेशीर छपराखाली बसतंना मुलांना बंदिस्त वर्गात बसल्यासारखे वाटतच नाही. काही ठिकाणी पायऱ्या चढून उंचावर वर्गखोली, तर नुसत्या बांबूपासून बनविलेली एक अतिशय सुंदर झोपडी. मुलांना बसायला चौरंगासारखी आसने. शिक्षकालाही तसेच. त्याच उंचीवर फळा. मुलांना खेळा-बागडायला खूप-खूप मोकळी जागा सोडली आहे. मुळातल्या लहान-मोठ्या झाडांच्या आधारे जुन्या टायरसारख्या वस्तूंनी झुले बनविलेले दिसतात. विटा- सिमेंटचे बांधकाम कमी करण्याचा प्रयत्न दिसतो. पहिल्याच पावसाने सगळीकडे हिरवेगार दृश्य होते.

मोकळेपणा हा केवळ तेथील वर्गखोल्यांमध्येच नाही, तर एकूणच सगळ्यांच्या बोलण्या-चालण्यातून सहजपणे जाणवत होता. आम्ही तिथे जाऊन पोहोचलो, तर चौथीतला एक मुलगा हळूच समीक्षाच्या मागे गेला, पाठीवर धपाटा दिला आणि कसे चकवले म्हणून खो-खो हसायला लागला. एका ठिकाणी एकाच वेळी दोन वर्ग सुरू होते. काही मुलं फळ्यासमोर बसलेली, तर काही मागे चित्र काढत किंवा मातीकाम करीत असलेली. काही मुलं बाहेर नुसतीच हुंदडताना दिसत होती. खूप मुलं बाहेर मातीत खेळत होती. एका मुलाला कुठे तरी लागलं, तो रडत-रडत आला. सगळी मुलं गोळा झाली. समीक्षाने त्याला समजावलं. समजावताना भाषा माडिया आणि इंग्रजी. सगळी मुलं इंग्रजीतून बोलण्याचा प्रयत्न करताना दिसत होती. एकूणच वातावरण अत्यंत उत्साही आणि प्रसन्न होते. एरवीच्या सरकारी शाळांमधील मुलांमध्ये कोंडवाड्यात कोंबलेपणाचे दिसणारे भाव एकाही मुलाच्या चेहऱ्यावर नव्हते.

लोकबिरादारी प्रकल्प हा केवळ गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे आरोग्य व शिक्षणापुरता मर्यादित राहिलेला नाही. गांधीवादी वृत्तीने सेवाभाव जपणाऱ्या महानगरी तरुण पिढीच्या आदर्शाचा एक भाग झाला आहे. म्हणूनच नेलगुंडाच्या साधना विद्यालयात मुलांना शिकवायला मुंबई-पुण्याचे हायटेक क्षेत्रातील उच्चशिक्षित तरुण सातत्याने तिथे मुक्कामाला असतात. मी गेलो तेव्हा शाळेत ठाण्याचा कल्पेश झुंजारराव आणि डोंबिवलीचा विजय चांगण वर्ग घेताना भेटले. सामाजिक बांधिलकी आणि सेवेचे घेतलेले व्रत यांचा एका शब्दानेही उच्चार न करता ते त्यांच्या देहबोलीतून जाणवत होते.


प्रमोद मुनघाटे, नागपूर, महाराष्ट्र
pramodmunghate304@gmail.com
प्राध्यापक, लेखक.


*"चुकते कई बातल आयो"* *आदिवासी शाळा - नेलगुंडा गाव ( तालुका भामरागड )*

..... - अतुल अ. कस्तुरे . 

अनिकेतच्या ( श्री. अनिकेत प्रकाश आमटे) च्या तोंडून नेलगुंड्याच्या 'साधना विद्यालया' बद्दल ऐकले. फक्त गाव आग्रहास्तव त्याने आणि सौ.समीक्षाने ही शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला ! गर्द जंगलातून जाणारा तो कच्चा रस्ता, मधूनच वहाणारे ओहळ, त्यात अधूनमधून दिसणारी, आदिवासींनी बांधलेली, त्यांच्या मृतजनांची थडगी आणि अशा वातावरणात नेलगुंड्याला एकटी राहून मुलांना शिकवणारी ती वैभवी ! हे सर्व वर्णन ऐकताक्षणीच मी अनिकेतला नेलगुंड्याला जाण्याची माझी इच्छा व्यक्त केली. माझा कुतुहलाने भरलेला चेहरा बघताच, अनिकेतने हसतच होकार दिला व माझ्या सोबत सचिन येईल असे सांगितले. सचिनची साथ लाभल्यामुळे मी जंगलात न भरकटण्याची खात्री झाली ! आम्ही जायला निघालो व थोड्याच वेळात तो रस्ता म्हणजे जंगलातील दगड गोट्यांनी भरलेली, चढ-उतारांची, एक सर्वांग हलवणारी एक आडवाटच आहे हे प्रत्यक्ष अनुभवले ! आजकालच्या 'इंटरनॅशनल स्कूल'च्या जगात, मला ही भिंती नसलेली शाळा, वर्ग चालू असतानाच बघायची होती. जेंव्हा दुपारी आम्ही नेलगुंड्याला पोहचलो तेव्हा वर्ग सुरुच होता. वैभवी व तिथल्या एका शिक्षिकेचे गोंडी,मराठी भाषावापरून शिकवणे चालू होते. त्या जंगल शांततेत भरलेली ती शाळा, त्या चिमुरड्यांचे चेहरे बघताना मी पुरता बंद पडलो ! पुढे वर्ग संपल्यावरही ती चिल्लीपील्ली तिथेच रेंगाळत राहीली व मला नकळतच तिथे समीक्षा कुठल्या पद्धतीने अभ्यासक्रम घेत असेल हे उलगडले ! वैभवी जशी त्या मुलांच्या गराड्यातुन मोकळी झाली तसे माझ्या डोक्यातील प्रश्न, मी तिला विचारता झालो. सूर्य मावळला कि जीथे फक्त काळोखच उरतो, अशा ठिकाणी तुला एकटं राहायची भिती वाटत नाही का ? या जंगलातील शाळेत तुला शिक्षिका व्हावे असे का वाटले ? इ. इ. व अनेक प्रश्न. वैभवीने माझ्या प्रश्नांना मनापासून पटपट उत्तरे दिली. दुपारच्या त्या प्रकाशात तिचा हसरा चेहरा मी डोळे भरून बघतच राहीलो. घरून निघताना मला लाडू बांधून दिले होते, तो डब्बा मी सरळ वैभवीच्या हातात ठेवला ! सुर्यास्तापूर्वी आम्हाला परत हेमलकसा गाठायचे होते, म्हणून आम्ही परतीची वाट पकडली. पण तेथून निघताक्षणीच माझे डोके काही विचारांनी नुसते भणभणून गेले. समीक्षा हा वनसंसार का उभा करु पहात आहे ? एवढ्या कोवळ्या वयात वैभवीसारख्या मुलींना प्रेरणा मिळतेतरी कुठून ? आणि अनिकेत व समीक्षाची, समाजाचे ऋण फेडण्याची ही वेडी जिद्द कुठली ? फक्त स्वतःसाठी जगताना, या आयुष्याकडे माझ्या किती म्हणून किती तक्रारी असतात ! आणि येथे तर दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर फक्त आनंद बघण्यासाठी धडपड चालली आहे. आणि ते पण चेहऱ्यावर इतके प्रसन्न हास्य घेऊन ! कुठेसं वाचलं होते कि वटवृक्षाच्या छायेत नवीन रोपटी तग धरू शकत नाहीत म्हणून! पण आज मी माझ्या डोळ्यांनी, त्याच्या विपरीतच बघत होतो. श्री. भाऊंच्या ( प्रकाश बाबा आमटे) यांच्या जीवनदायी, कर्तुत्ववान वटवृक्षाखाली, अनिकेत व समीक्षा स्वछंदपणे फुललेच नाहीत तर वैभवी सारख्या अनेक तरुण कार्यकर्त्यांना उमलण्यास, त्यांचे प्रेरणास्तोत्र होण्यास कारणीभूत झाले आहेत ! पावसाळ्यात अशाच एका बेभान वहाणारया ओहळात , याच वैभवीला अनिकेतने स्वतः पाण्यात उडी मारुन वाहून जाताना वाचवले होते !

*सौ. समीक्षा या शाळेचे संपूर्ण व्यवस्थापन बघते. दर बुधवारी ती स्वतः तिथे शिकवायला उपस्थित असते. शनिवारी शिक्षकांसोबत चर्चा करून ती शाळेची पुढची वाटचाल आखत असते. आज हि प्राथमिक शाळा सुरू होऊन तब्बल दीड वर्ष पूर्ण झाले आहे. आता आजूबाजूच्या गावातीलही आदिवासी मुलेही तिथे शिकायला येत आहेत. समीक्षासह एकूण ५ तरूण शिक्षक/शिक्षिका तिथे काम करत आहेत. इयत्ता तिसरी पर्यंत वर्ग घेतले जाऊ लागले आहेत. आता तर विद्यार्थी संख्या थोडीथोडकी नव्हे तर ७५ पर्यंत पोहोचली आहे. अनिकेतचे ही शाळा अशीच विनाअनुदानित चालवण्याचे स्वप्न आहे. विपरीत परिस्थितीतही हा आमटे कुटुंबीयांचा वनशाळा संसार पहाताना माझे डोळे आपसूकच भरून आले. माझ्या जगण्याच्या पुस्तकामध्ये, खऱ्या खुऱ्या अनुभवांची काही पाने आतापर्यंत चिकटूनच राहिली होती. ती चिकटलेली पाने आज साधना विद्यालयाच्या भेटीनंतर हळूच मोकळी होत आहेत असे मनोमन जाणवयाला लागले !*

असं एखादे उदात्त स्वप्न, वेडं होऊन ते साकारण्यासाठी झटणारी हि देवमाणसे बघताना, माझ्या आत्तापर्यंतच्या जगण्यातल्या चुका माझ्या डोळ्यापुढून तरळून गेल्या. 

 *माझ्याच आनंदासाठी जगताना मी आतापर्यंत कुठेतरी हारवलो होतो, चुकलो होतो. जे झाले ते झाले आत्ता उशीरा का होईना पण अनिकेत व समीक्षाच्या या स्वप्नात जमेल त्या प्रकाराने सहभागी होण्याचे ठरवतो. साधना विद्यालयाचे ब्रीदवाक्य आठवले...* 
*.... "चुकते कई बातल आयो" अर्थात 'चुकलं तरी काहीच हरकत नाही!'*

*बाबा... डॉ. प्रकाश आणि आता अनिकेत-समीक्षाही 'मार्गस्थ'!*
हेमलकसा इथून जवळपास २५ किलोमीटर अंतरावर नेलगुंडा हा अतिदुर्गम भाग... आजवर तिथं शिक्षणाची गंगा कधी पोहोचलीच नाही. मात्र, आता तिथं एक आगळी-वेगळी शाळा सुरू झालीय. ती सुरू केलीये बाबा आमटेंचे नातू आणि प्रकाश यांचे चिरंजीव अनिकेत यांनी...

बाबा आमटेंनी वसवलेलं आनंदवन, डॉ. प्रकाश आमटेंनी वसवलेलं हेमलकसा आणि आता अनिकेत आमटे नेलगुंडा वसवण्याच्या मागे लागलेत. आमटेंची ही तिसरी पिढी...

साधना विद्यालय, नेलगुंडा
बाबा जेव्हा वरोऱ्यामध्ये आले तेव्हा तो भाग दुर्गम होता. आनंदवनमधून बाहेर पडलेलले डॉ. प्रकाश आमटे हेमलकशाला आले... ते त्यापेक्षा जास्त दुर्गम... आणि हेमलकसापासून २५ किलोमीटरवर असलेलं नेलगुंडा हे आणखीनच दुर्गम ठिकाण... डॉ. प्रकाश आमटेंचे चिरंजीव अनिकेत आणि सून समीक्षा यांनी इथं एक शाळा सुरू केलीय. बाबांनी आखलेला मार्ग अधिक प्रशस्त करत आमटेंची तिसरी पिढी मार्गस्थ झालीय.

वर्षातले सहा महिने जगाशी संपर्क नाही... वीज नाही... पाणी नाही... रस्ता नाही... मोबाईलला रेंज नाही... मनोरंजनाचं कोणतंही साधन नाही... अशा ठिकाणी अनिकेत आणि समीक्षा यांनी उभारलेली ही शाळा... शाळा तरी कशी? आनंदवन आणि हेमलकशाप्रमाणेच आपलं वेगळेपण जपणारी... निसर्गाच्या सानिध्यात, आदिवासी मुलांना समजेल-उमजेल अशा भाषेत शिक्षण देणारी... त्यांच्या संस्कृतीचं संवर्धन करणारी...

पहिल्याच वर्षी या साधना विद्यालयाची पटसंख्या ५२ झालीये... ५-५ किलोमीटरची पायपीट करून एकही दिवस दांडी न मारता शाळा विद्यार्थ्यांसाठी एक समृध्द अनुभव ठरतोय. झपाट्यानं बदलणारं जग माडिया आदिवासींच्या चिमुकल्या मुठीत बंदिस्त करायचंय... अनिकेत आणि समीक्षा हा गोवर्धन लिलया पेलतील यात शंका नाही... कारण आमटेंच्या घरात बाळकडू मिळतं, तेच मुळी समाजसेवेचं....

समाजसेवेचं व्रत घेतलेल्या समिक्षा ताई आमटे ह्या पुण्याच्या. सर्व ऐशाआरामातले जीवन सोडून त्यांनी जे व्रत घेतले आहे त्या साठी *सत्यम् शिवम् सुंदरम् आणि महाराष्ट्राचा चांगुलपणा* ग्रुप कडून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनपुर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा.
🌹💐🎂
... साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
21 आॅगस्ट 2022.

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.