*15 आॅगस्ट - ओळख हिरकणी ची...**"ती ची गोष्ट" ....अष्टपैलू डॉ प्रा. जयश्री कापसे गावंडे.*जन्म दिनाचे औचित्य साधून... ....साहेबराव माने. पुणे. 9028261973. *🇮🇳15 आॅगस्ट 2022 🇮🇳*

*15 आॅगस्ट - ओळख हिरकणी ची...*

*"ती ची गोष्ट" ....अष्टपैलू डॉ प्रा. जयश्री कापसे गावंडे.*
*अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेल्या जयश्री ताई कापसे गावंडे ह्या आपल्या सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप क्रमांक दोन च्या सन्मानिय भगिनी सदस्या आहेत.*
त्यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून... 
....साहेबराव माने. पुणे. 
9028261973. 
*🇮🇳15 आॅगस्ट 2022 🇮🇳*
अजय धवणे यांच्या फेसबुक वरुन साभार. 

*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*👇
http://Sahebraomane1967.blogspot.com
==================================

*ती विद्यार्थीप्रिय प्राध्यापक... ती समाजकार्यात पारंगत प्राध्यापक ....ती संवेदनशील नाट्यअभिनेत्री....ती कुशल नाट्य दिग्दर्शक .....ती सामाजिक चळवळीत अग्रेसर कार्यकर्ती ....ती उत्तम वक्ता .. सर्वात महत्त्वाचे म्हणजे... ती निर्मळ मनाची स्वामिनी !!! आज मी सांगणार आहे 'ती ची गोष्ट' !!*
.... अजय धवणे. 

तिचं आणि माझं नातं बहीण भावाचं. त्याहूनही जिवाभावाचं. ते सा-यांनाच माहितेय. आज मी तिला नात्यात फार न अडकवता तिच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू मांडणार आहे. आमचं बहीण भावाचं नातं आता एक वेगळं स्वरूप धारण करून पुढे गेलंय ते म्हणजे नाट्य निर्माता आणि दिग्दर्शक यांचं !!!!! तर आजचे पुष्प मी माझ्या जयाताई साठी अर्थात डॉ प्रा. जयश्री कापसे गावंडे हिच्या साठी गुंफणार आहे. 

चंद्रपूर च्या विख्यात सुशिलाबाई मामीडवार समाजकार्य महाविद्यालयात सहयोगी अधिव्याख्याता म्हणून कार्यरत जयाताईने बीएस्सी एमएसडब्ल्यू केलंय .वैद्यकीय व मन: चिकित्सक समाजकार्य हे तिचे स्पेशलायझेशन ! या व्यस्ततेत सुद्धा अभ्यास कायम ठेवत तिने आचार्य ( डॉक्टरेट) पदवी संपादन केली. बालपणापासूनच नृत्य , अभिनय ह्यात तिला विशेष रस . शालेय एकांकिका गाजवत सतत प्रथम क्रमांकाची पारितोषिके पटकावत तिचा प्रवास सुरु होता. नृत्यासाठी तर पंडित बिरजू महाराजांची शिष्यवृत्ती सुद्धा मिळवली पठ्ठीने . घरातली मोठी, शिवाय त्यावेळी मुलींनी नाच , नाटक निषिद्ध असे वातावरण . या ऑर्थोडोक्स भूमिकांना झिडकारत तिच्या आईबाबांनी तिला प्रमोट केलं.

पुढे नोकरीसाठी चंद्रपूरात आली .सरदार पटेल महाविद्यालयाच्या समाजकार्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाली. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक अरविंद बाभळे यांनी ‘वडवानल’ या एकांकिकेत तिला प्रथमतः संधी दिली . दोनच पात्रांच्या या एकांकिकेतली तिची ‘सुधा’ ज्या तडफदार पणे पुढे यायची की तिचे अभिनयाचे पहिले पारितोषिक ठरूनच जायचं. मला आठवतं नवोदिताच्या एकांकिका स्पर्धेत तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चे प्रथम पारितोषिक मिळाले . मी पारितोषिक वितरण समारंभाचे निवेदन करत होतो . ती पहिली भेट आणि ओळख आज सख्ख्या नात्यापेक्षा कितीतरी पुढे गेलीय.

मग तिने ब-याच एकांकिका केल्या . चितपट , विभावरी, खेळ मांडीयेला , दे वर ही असा दे , नातं अशी मोठी मालिका तिच्या नावे आहे . इथे नाव ठेवायला जागा नाही , अंधार वेदना या एकांकिका तिने दिग्दर्शित सुद्धा केल्यात .चितपट जेव्हा एकांकिका होती तेव्हा सुद्धा तिची दयाकाकू पारितोषिकाची मानकरी असायचीच. अरविंद बाबळे यांच्या दिग्दर्शनात अनंताचे प्रवासी , मुक्तीपथ ही नाटके तिने केली. अनंताचे प्रवासी मधली भूमिका तर फार छोटी पण ती त्यात जे रंग भरायची त्यावर बक्षिसाची मोहोर उमटायचीच. 

मग श्रीपाद जोशी लिखित अभिनित चितपट मधली दयाकाकू...राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चे रौप्यपदक घेऊन आली व प्रथमच चंद्रपूर ला हा बहुमान प्रदान करून गेली. एका प्रसंगात दयाकाकू रमाकांत ला म्हणते 'तू का पाया पडतो , अरे मीच तुझ्या पाया पडते. तुझ्या घर सोडून जाण्याच्या निर्णयाने तो म्हातारा बघ कसा कोलमडून गेलाय' हा संवाद ऐकताच अश्रूंच्या धारा वाहायच्या . आज इतक्या वर्षानंतर सुद्धा मला हा डॉयलॉग मुखोद्गत आहे. अनेकांना असेल. ह्यातच सर्व आलं.

देवाशपथ खरं सांगेन मधल्या शांताबाई साठी सुद्धा तिने रौप्यपदक पटकावलं . ज्याचा त्याचा प्रश्न मधल्या निर्मला साठी सुद्धा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं. यश आणि ती यांचं जणू एक नातंच निर्माण झालं होतं, आजही आहे.

2001 मध्ये एक होती राणी हे नाटक तिने सुशील सहारे , प्रकाश गडदे , गिरीश जोशी यांच्या सोबतीने बसवलं . रानो ची मध्यवर्ती भूमिका तिने केली . 45 कलावंतांची चमू.3 महिन्यांची अविश्रांत मेहनत. नागपूर ला राज्य नाट्य स्पर्धेत प्राथमिक फेरीत प्रयोग . प्रयोगाच्या 4 दिवस आधी तिच्या पायाला गम्भीर अपघात झाला. लिगामेंट फाटलं . डॉक्टरानी हालचाल न करण्याचा सल्ला तिला दिला पण 45 जणांची मेहनत वाया जाऊ नये म्हणून शो मस्ट गो ऑन या सूत्रानुसार तिने त्या ही परिस्थितीत प्रयोग करायचे ठरवले. देवेंद्र गावंडे ( तिचे पती ) यांनी तिला विरोध केला पण तिची आंतरिक जिद्द बघून त्यांनाही झुकावे लागले. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर तिने व्हीलचेअर वर बसून प्रयोग पूर्ण केला, प्रत्‍येक प्रसंग त्‍याच परिणामासह तिने प्रभावीपणे साकारला. तिच्या या धाडसाचे प्रचंड कौतुक झाले, वृत्तपत्रानी सुद्धा तिच्या या भूमिकेचा गौरव केला. या भूमिकेसाठी ती अभिनय गुणवत्ता पुरस्काराची मानकरी ठरली. हौशी मराठी रंगभूमीवर घडलेल्या काही घटनांमधली ही एक प्रमुख घटना असावी .

अभिनेत्री म्हणून रंगभूमीवर आपल्या समर्थ अभिनयाचा ठसा उमटविणा-या तिने नाट्य दिग्दर्शक म्हणून सुरू केलेली इनिंग तर विक्रमाची नोंद करणारी ठरली. प्लेस विथ द पिग्ज हे नाटक तिने राज्य नाट्य स्पर्धेसाठी बसविले. सुशील सहारे आणि भाग्यश्री चारमोडे या दोघांना या नाटकासाठी अभिनय गुणवत्ता पुरस्कार मिळाले. मी आणि ती नात्याने जवळ असलो तरी प्रत्यक्षात आम्ही सोबत काम केलेच नव्हते. मन मनास उमगत नाही हे नाटक मी 2012 मध्‍ये सादर केले. त्‍यावेळी निर्माती म्‍हणुन मी तिचा नामोल्‍लेख केला होता. त्‍यावेळी गमतीने ती म्‍हणाली होती की मी नाही रमणार या भुमिकेत, तिथे तुच सर्वार्थाने फिट आहेस. 2013 मध्ये राज्य नाट्य स्पर्धेसाठी हेमंत मानकर लिखित चिंधी बाजार हे बोहरणीच्या आयुष्यावर आधारित नाटक आम्ही निवडले. मी आणि माझा सहकारी निर्माता आशिष अंबाडे यांनी ठरवलं की या वर्षी दिग्दर्शक म्हणून जयाताई ला जवाबदारी द्यायची. तिला गळ घातली. तिनेही विचारपूर्वकच होकार दिला. 40 जणांच्या चमुच्या चिंधी बाजार ने हौशी रंगभूमीवर नोंदविलेला विक्रम चंद्रपूरच्या नाट्यक्षेत्रासाठी मानबिंदू ठरला. नाटक 53 व्या हौशी अंतिम स्पर्धेत राज्यात प्रथम आले व दुसऱ्या वर्षी हेच नाटक 54 व्या हिंदी अंतिम स्पर्धेत सुद्धा राज्यात प्रथम आले. राज्य नाट्य स्पर्धेच्या इतिहासात ही कामगिरी चंद्रपूरकर कलावंतांनी केली. दिग्दर्शक म्हणून या ग्रँड यशात तिचा सिंहाचा वाटा आहे. चिंधी बाजार चा प्रयोग मुंबई विद्यापीठाच्या वसंत नाटयोत्सवात झाला , गोव्याच्या आर्ट अँड कल्चर अकादमीत झाला. हा हौशी नाटकाचे आम्ही 34 प्रयोग केले. एका हौशी नाटकाला इतक्या प्रयोगाचे भाग्य लाभले , ती होती म्हणून. नूतन धवने , रोहिणी उईके या दोघींना अभिनयाची रौप्यपदके मिळाली. मुख्य म्हणजे अभिनयाचा न ठाऊक नसलेल्या 38 लोकांकडून अभिनय करवून घेत उत्तुंग यश संपादन करण्याचे कौशल्य तिचेच. नाट्यनिर्मिती च्या क्षेत्रात दर्जेदार तंत्रसमृद्ध नाटके देण्यासाठी मला आणि आशिष ला तिची मोलाची साथ मिळाली तर अभिनेत्री म्हणून नूतन आणि बकुळ धवने या दोघींनाही तिच्या मार्गदर्शनाचा मोठा लाभ झाला हे मी इथे नम्रपणे नमूद करू इच्छितो . नाटकाच्या निर्मिती प्रक्रियेत माझी होणारी चिडचिड , त्रागा बघून निवांत क्षणी मला जवळ घेऊन माझे समुपदेशन करणा-या तिची आभाळमाया मी अनुभवलीये .

पुढे आमच्यासाठी ही जयश्री यशश्रीच ठरली. ज्याचा त्याचा प्रश्न , रंगबावरी , नथिंग टू से, हॅलो राधा मी रेहाना या नाटकांची दिग्दर्शक म्हणून तिच्या नेतृत्वाखाली यशाची शिखरे आम्ही पादाक्रांत केली. ईदी, ध्‍यानीमनी या नाटकांची ती नावाने जरी दिग्‍दर्शक नव्‍हती तरी तिच्‍या मार्गदर्शनाचा स्‍पर्श या दोन्‍ही नाटकांना होताच. प्राथमिक फेरी सर करून अंतिम फेरी गाठायची आणि तिथेही उल्लेखनीय यश संपादन करायचे. रंगबावरी हिंदी राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात प्रथम आले तर नथिंग टू से कामगार राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत राज्यात प्रथम आले, अर्थात ती सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक होती म्हणूनच .

तिच्या नेतृत्वात हा रंगप्रवास असाच सुरू राहणार आहे. अनेक कलावंत घडवले तिने. सुशील सहारे हे त्यातले प्रमुख नाव. नाट्य प्रशिक्षण शिबीरांची आयोजने, पथनाट्याची प्रशिक्षणे, शॉर्ट फिल्म्सची निर्मिती , लेखन , दिग्दर्शन अशा विविध माध्यमातून ती सतत सक्रिय असते. अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी तिला सन्मानित करण्यात आले आहे .नवोदिताचा कलासाधक सन्मान , लोकमत युवा मंच गौरव , सरदार पटेल महाविद्यालयाचा अभिनय क्षेत्रातील कामगिरीबद्दल गौरव , महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचा अभिनय गौरव सन्‍मान, झाडीपट्टी नाट्य संमेलनात गौरव , शासनाच्या झाडीपट्टी पर्यटन महोत्सवात गौरव , 99 व्या अ भा मराठी नाट्य संमेलनात नाट्य गौरव पुरस्कार यासह चिंधी बाजार च्या यशासाठी 10 हुन अधिक पुरस्कारांची मानकरी ती ठरली.

सकाळी महाविद्यालयाच्या क्लास रूम मध्ये विद्यादानाचे काम करणारी ती , दुपारी समाजकार्याच्या फिल्ड वर्क साठी जाणारी ती , संध्याकाळी नाटकाच्या तालमीला हजर राहणारी ती ...लिखाणही करते , कधीकधी कविताही करते. तिच्या काही विद्यार्थ्यांची तर ती आईच झालीये. गरजूंना सढळ हाताने मदत करणारी ती प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सुखदुःखात समरस होते. म्हणूनच गांधी चॅरिटेबल ट्रस्ट चा ‘मातृशक्ती’ पुरस्काराने ती सन्मानित झालीये. अष्टपैलू या शब्दाची व्याख्या जर मला कोणी विचारली तर मी लगेच सांगेन ...जयश्री कापसे गावंडे !!

तिचे पती लोकसत्ता चे नागपूर ब्युरो चीफ श्री देवेंद्र गावंडे यांचे प्रोत्साहन व भक्कम साथ हे तिच्या यशस्वी प्रवासातील बलस्थान आहे. तिची आई, मुलगा श्रेयस व सर्व बहिणींचा भक्‍कम पाठींबा हा तिच्‍या या प्रवासात अतिशय महत्‍वाचा आहे. मोठा लोकसंग्रह तिने निर्माण केलाय. तिच्या विषयी लिहिणे तसे आव्हानच होते . कारण अनेक आव्हानांना सामोरे जात , त्यावर मात करत आज ज्या अढळपदी ती पोचलीये ते भल्याभल्याना न जमणारे आहे. तिच्या आयुष्यातले चढउतार तिचा भाऊ म्हणून मी बघितले आहे. अशी ही 'ती ची गोष्ट'...साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण !! 

आव्हानांना पेलणारी 

तू पंखांवर आकाश तोलणारी 

नवी क्षितिजे कवेत येतील 

अशीच घे तू उंच भरारी......

 
लव्‍ह यू जयाताई !
💐🌹
*"सत्यम् शिवम् सुंदरम्* आणि *महाराष्ट्राचा चांगुलपणा"* ग्रुप कडून हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा.
.. साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
*🇮🇳15 आॅगस्ट 2022 🇮🇳*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.