*विचारवेध - BEYOND THOUGHTS.* *गोष्ट एका लग्नाची...* *पत्रिका जुळवताना चे गौडबंगाल* भाग 29. साहेबराव माने.पुणे. 9028261973. 10 जून 2022.

*विचारवेध - BEYOND THOUGHTS.* *गोष्ट एका लग्नाची...*
*पत्रिका जुळवताना चे गौडबंगाल*

भाग 29

साहेबराव माने.
पुणे. 9028261973. 
10 जून 2022. 

 1 मे 2016 रोजी आम्ही माझ्या भाच्याला (सुभाष पाटील) वधु (मुलगी प्राजक्ता) पाहण्यासाठी पुण्यातून इस्लामपूर ला गेलो होतो. मुलगा पुण्यात मॅकेनिकल इंजिनिअर आहे. 

तत्पूर्वी मुलीकडील मंडळी मुलाच्या घरी येऊन गेली होती. एकंदरीत मुलीच्या घरील लोकांनी मुलग्याला पसंती दिली होती. पण मुलीला मंगळ असल्याचे सांगितले होते.

मुलीला मंगळ असेल तर सहसा कोणी त्या मुलीला वधु म्हणून कोणी स्विकारत नाही. मुलाच्या आई (माझी सख्खी बहीण) म्हणाली की, आपण फक्त मुलगी बघण्यासाठी जाऊन येऊया. मंगळाचा विषय नंतर पाहूया. त्या वर मी स्पष्टपणे सांगितले की, बघण्यासाठी गेल्यानंतर मुलगी पसंत असेल तर लगेच लग्न ठरवले जाईल आणि त्या वेळी केवळ मुलीला मंगळ आहे म्हणून मुलीला नकार देता येणार नाही. मुलगी पसंत नसेल तर तसं स्पष्ट सांगूया पण मंगळाचे नावाखाली मुलीला नकार द्यायचा नाही.

या प्रकरणात ओळखीच्या एका भटजींनी सल्ला दिला होता की, जर ह्या मुलीबरोबर लग्न केले तर सहा महिन्यात वैध्यव्य येईल. म्हणजे माझ्या भाच्यासाठी भटजींचा सल्ला घातक ठरणार होता. त्यामुळे मुलाची आई ही मुलगी पाहण्यासाठी हो ना करत होती. 
मी भटजींचे लग्न पत्रिका /जन्म कुंडली कोणतेही सल्ले फालतू समजतो. कारण शैक्षणिक दृष्टीने विचार केला तर भटजींचे सल्ल्याला कोणत्याही खगोलशास्त्राचा/विज्ञानाचा आधार नाही. राशी ग्रीक लोकांनी तयार केल्या आहेत तर नक्षत्र भारतीय लोकांची देणं आहे. 
भटजींनी ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करून सर्व सामान्य माणसाला काही कळणार नाही अशी क्लिष्ट रचना करुन ठेवल्या आहेत. 
मुळात आपण आपल्या शिक्षकांना प्रश्न विचारत शिकलो. पण या भटजी नावाच्या गुरुजींना कोणताही प्रतिप्रश्न आपण विचारत नाही. त्याचाच फायदा घेत समाजाला पत्रिका आणि जन्म कुंडली च्या नावाखाली आर्थिक कमाई करण्यासाठी लुट सुरु केली आहे. 
आणि आपण विशेष करून मुलींचे वडील या गोष्टींना अवाजवी महत्त्व देऊन लग्न कार्यात विलंब करताना दिसतात. विवाह संस्था भटजींनी ताब्यात घेतली आहे. याला आपणच जबाबदार आहोत. या बाबतीत अनेक वधुवर सुचक ग्रुप मधील बऱ्याच मुलींच्या आईवडीलांशी माझे बोलणे झाले आहे. ज्यांनी स्वतःच्या लग्नात स्वतःची पत्रिका अथवा जन्म कुंडली पाहिली नाही आज तेच या प्रकरणाचा बागुलबुवा करुन बसले आहेत. वाईट याचे वाटते की घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग ते करतच नाहीत. फक्त भटजींनी नकारघंटा वाजवली की सगळे मुसळ केरात जाते यांचे. असो...

शेवटी मुळ मुद्दा.... हो ना करत मुलाची आई सुद्धा मी सुचवलेल्या गोष्टीला तयार झाली. 1 मे 2016 रोजी आम्ही मंगळ असलेल्या इस्लामपूर येथील प्राजक्ता ह्या मुलीशी माझ्या भाच्याचे लग्न ठरवले. आणि 26 मे 2016 रोजी दुपारी कोणतेही विघ्न न येता लग्नाचे सोपस्कार इस्लामपूर येथे पार पडले. 26 मार्च 2022 रोजी त्या घटनेला 6 वर्षे झाली. ज्या मुलीच्या जन्म कुंडली मध्ये मंगळ आहे आणि जिला सहा महिन्यात वैध्यव्य येईल असे म्हणणाऱ्या पुरोहीताला आता ठोकून काढावा का? कशासाठी दुधात मिठाचे खडे टाकतात हे पुरोहित? गि-हाईक आले की काही तरी ठोकून देतात. एकच जन्म कुंडली आणि पत्रिका वेगवेगळ्या भटजींना दाखवली तर वेगवेगळे सल्ले येतात. हे कसे काय ते मात्र आपण विचारत नाही. 

 आजरोजी श्री सुभाष आणि सौ. प्राजक्ता यांच्या सुखी संसार वेलीवर कळी फुलली आहे. तीन वर्षे वयाची छानशी मुलगी आहे. गार्गी नावाची. सोबत फोटो दिले आहेत. सत्यता कळावी म्हणून. 

गेले अनेक वर्षे मी या विषयावर भटजींच्या 'पत्रिका जुळवताना चे गौडबंगाल' या लेखमालिकाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा असलेल्या आपल्या महाराष्ट्रात गुलमिलन, जन्म कुंडली आणि पत्रिकेला महत्त्व देऊन आपण आपल्याच विचाराचा कोतेपणा दाखवत आहोत असे वाटते. या मधून बाहेर पडलो तर तीच आपल्या या थोर पुरुषांच्या विचाराला श्रद्धांजली ठरेल. ज्या फुले, शाहू, आंबेडकरांचा एकही गुण तुमच्या अंगी बाणवत नसाल तर त्या थोर पुरुषांची नावे घेण्याचा अधिकार आहे का याचा विचार करा.

आज प्रत्येकाला शिवाजी जन्माला आला पाहिजे असे वाटते. पण तो शिवाजी आपल्या घरात नको, शेजारच्या घरात जन्माला यावा असे वाटते. म्हणजे जे काही होईल ते शेजाऱ्यांच्या घरात. आपल्या घरात नको.
काळाची पावले ओळखून मी काही गोष्टी मध्ये पुढचे पाऊल उचलले आहे. त्या साठी जे जे काही करता येईल ते ते करत आहे.

सुभाष आणि प्राजक्ता च्या लग्नाची गोष्ट लिहिताना काही गोष्टींचा समाचार घ्यावा लागला आहे. अर्थात ती काळाची गरज आहे म्हणून.

*तर ही होती 'सुभाष आणि प्राजक्ताच्या लग्नाची गोष्ट.*

आम्ही लग्नात विघ्न आणणाऱ्या मंगळावर मात केली आहे. जन्म कुंडली आणि पत्रिका ला झुगारून.

जाता जाता आणखी एक गोष्ट नमुद करावीशी वाटते ती म्हणजे प्रत्येकाला आपल्याच जिल्ह्यातील वधुवर हवे आहेत. ज्या वेळी बायोडाटा तयार केला जातो त्या वेळी त्या मध्ये स्पष्टपणे लिहावं की 'आम्हाला आमच्याच जिल्ह्य़ातील स्थळ हवे आहे असं. म्हणजे बऱ्याच लोकांची विनाकारण चौकशी करणारी फोनाफोनी थांबेल. 

पाच हजार वर्षांपूर्वी महाभारतातील गांधार गंधार देशातून (आताचा अफगाणिस्तान) पाकिस्तान ओलांडून भारतात आली. वहातूक फक्त घोड्यावरून व्हायची तेंव्हा. आणि आज सर्व साधने हातात असताना आपण आपला स्वतःचा जिल्हा सोडू शकत नाही? मग महाभारत आणि रामायण च्या टिमक्या कशाला वाजवायच्या? 

*आपणास शक्य आहे का? की पहिले पाढे पंचावन्न?* 
*🙏विचारवेध 9028261973🙏*
*(पुढील भागात समारोप)*
... साहेबराव माने.
10 जून 2022.

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.