"सांगायचं आहे : रिलेशन्स आणि जोती - साऊ" "नातीगोती.. खरी.. खोटी?"संकलन - दिपाली पडवळ .ठाणे. 9028261973.दिनविशेष निमित्ताने.11 एप्रिल 2022.
*सांगायचं आहे : रिलेशन्स आणि जोती - साऊ*
*नातीगोती.. खरी.. खोटी?*
संकलन - दिपाली पडवळ .
ठाणे. 9028261973.
साभार - कृष्णात स्वाती
86002 30660
महेंद्र नाईक
9594094785
दिनविशेष निमित्ताने.
11 एप्रिल 2022.
कोणतंही रिलेशन आणि समतेचा दृष्टिकोन यांना वेगळं काढता येत नाही. रिलेशन हे जसं मैत्रीपूर्ण हवं तसंच ते समतेच्या पायावर सुद्धा हवं. म्हणूनच जगण्यातील समता असेल की रिलेशनचा मुद्दा असेल, तो मांडताना जोति - साऊला डोळ्यांसमोर न आणता पुढे जाता येत नाही. दोघांचं सहजीवनाचं नातं हे समतेवर उभं असावं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपसूक जोति- साऊची जोडी आठवते. पण ते तेव्हढच आहे का? मान्य- अमान्य असणाऱ्या रिलेशन्स विषयीचा दृष्टिकोन तपासतानाही जोति- साऊच्या काळाच्यापुढील विचारांना आणि कृतीला समजून घ्यायला हवं.
माझ्या 'जेंडर डेंजर बॉक्स' या पुस्तकात जोति- साऊच्या सहजीवनाविषयी स्वतंत्र लेख लिहिला आहेच. दोघांचं नातं परस्पर पूरक कसं असावं हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येतं. ही पूरकता समतेला कुठेही छेद देत नाही तर समतेचा अर्थ अधिक व्यापक करत जाते. दोघांच्या नात्यात कुणीतरी कुणासाठी तरी त्याग वगैरे करत नाही तर जो त्याग करायचा आहे तो दोघे मिळून त्यांच्या ध्येयासाठी करतात. त्याची झळ आणि समाधान दोघांच्याही वाट्याला येत असतं. फक्त सामाजिक कार्यातूनच त्यांच्या सहजीवनातील पूरकता दिसते असं नाही तर त्यांच्या दोघांच्या अंतर्गत जगण्यातही ती भरून राहिलेली दिसते. त्यांच्या खाजगीतील संबंधांवर त्यांनी काही लिहिलंय का ते मला नाही माहीत (साऊ च्या काही कविता आहेत), पण तरीही हे ठामपणे म्हणता येतं कारण त्यांच्या जगण्यातील समाजाच्या प्रत्येक घटकाप्रती असलेला भाव स्पष्ट दिसत राहतो. यातील दोघांचा सारखेपणा दोघांविषयी खूप काही सांगून जातो.
नात्यातील शत्रुत्व हा नेहमीच्याच अनुभवाचा विषय असतो. आजच्या मालिका कितीही गोंडस, रोमँटिक नावाने सुरू असल्या तरी त्यांचा संपूर्ण भर हा नात्यातील शत्रुत्व दाखवण्यावरच असतो. तरीही त्या मालिका चवीने पाहिल्या जातात कारण 'हे असच असतं' असं कुठेतरी मान्य असतं. नात्यातील शत्रुत्व की शत्रुबरोबरही नातं? स्वतःच्या मारेकऱ्यांबरोबर भावनिक नातं गुंफायला अचाट ताकद लागते. अशी ताकद असणारी माणसेही अचाटच असतात.
जोति- साऊला ते जमलं. छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यभर उगाळत राहून वैर जपणारे आपण आणि मारेकऱ्यांचं हृदय परिवर्तन करून आयुष्यभराचं नातं जपणारे ते. याचं महत्त्व खूप आहे, रिलेशनचा विचार करताना ते नीटपणे समजूनही घेता यायला हवं. 'प्रेमाने जग जिंकता येतं' हे सुवचन प्रत्यक्ष आयुष्यात प्रत्येकाला जगता येईलच असं नाही. पण 'प्रेमात हिंसा असूच शकत नाही' हे मान्यच असायला हवं ना! फक्त प्रेमातच नाही तर कोणत्याच नात्यात हिंसा असता कामा नये. सध्या आपण प्रेमाचं (?) हिंसेत रूपांतर होताना पाहत असतो. नात्यांचा शेवट भयंकर हिंसेत होताना पाहत असतो. या सगळ्याचा विचार केला तर हिंसेचं नात्यात रूपांतर करण्याचं सामर्थ्य उठून येतं. ते कोणत्याही नात्यात जगण्याचं मूल्य असायला हवं.
नात्यांचे जसे प्रकार असतात तशीच त्यांची वर्गवारीही असते. त्यात रक्ताचं (!) नातं फार महत्वाचं असतं. रक्ताचं म्हणून जी काही नाती असतात त्यात स्वतःला काही निवडीचं स्वातंत्र्य नसतं. पण या नात्यांना फार महत्व असतं. पितृसत्तेचा डोलारा बऱ्यापैकी त्यावरच तोललेला असतो. त्या नात्यांमध्ये कितीही बेबनाव असले तरी अशी नाती बऱ्यापैकी टिकवली जातात. कारण कुटुंब, वंश सातत्य, प्रॉपर्टी, मोक्ष इत्यादी अनेक गोष्टी त्यात गुंतलेल्या असतात. त्यामुळे स्व रक्ताचं मुल (मुलगाच) हवं. ते नसेल होत तर रक्ताच्या नात्यातलच दत्तक हवं. मुल नसेल तर पती पत्नीचं रिलेशनही ब्रेक होत असतं. म्हणजे एक नातं निर्माण होत नाही तर आधीचं असलेलं नातंही संपुष्टात येऊ शकतं. (पत्नीचं नातं काही रक्ताचं नसतं, पण त्या दोघांपासून जन्माला येणारं मुलं रक्ताचं नातं निर्माण करतं) इतकं या रक्ताच्या नात्याला महत्त्व असतं. जोति- साऊने या रक्ताच्या नात्याच्या भ्रामक कल्पनेला छेद दिला. एक नातं तुटू दिलं नाही आणि दुसरं नातं (मनाने) निर्माण केलं.
स्वतःच (म्हणजे तिने जन्म दिलेलं) बाळ नसणं हा तसा नाजूक मुद्दा आहे. जो दोघांच्या रिलेशनवरही गंभीर परिणाम करत असतो किंवा ते रिलेशन संपवूनही टाकू शकतं. जोतिबांनी दोघांच्या अशा रिलेशनचा वेगळा अर्थ रुजवला. दोघांचं नातं हे दोघांचं असतं, त्याला जोडून अनेक नाती नक्कीच येतात पण त्या नात्यांवर दोघांचं नातं टिकवायचं की नाही हे ठरत नसतं. बाळासाठी त्यांचं नातं ब्रेक करायला तसेच पर्यायी नातं निर्माण करायला जोतिबांनी नकार दिला. त्यांच्या या निर्णयात दोघांच्या सहजीवनाचा व्यापक अर्थ सामावलेला आहे. स्पेस ही जशी एका व्यक्तीची असते तशीच ती दोघांच्या नात्याचीही असते. ती दोघांच्या नात्याची असणारी स्वतंत्र स्पेस जोतिबांनी जपली होती. ती जपताना सावित्रीवर कोणत्याही परोपकाराचं ओझ टाकलं नाही. त्यांचा त्यामागचा दृष्टिकोन स्पष्ट होता आणि तो तितक्याच स्पष्टपणे कुटुंबासमोर ते मांडू शकले. कोणतीच त त प प ची भूमिका न घेता ठामपणे त्यांनी आपली भूमिका मांडली. विचारांची बैठक नुसती असून चालत नाही, त्या विचारांवर जगण्यासाठी कोणत्याही रिलेशन मध्ये जोडीदाराची साथ निर्भयपणे देता यायला हवी. वैयक्तिक जीवनापासून ते सामाजिक जीवनापर्यंत जोति- साऊ एकमेकाची साथ अशी देत होते.
त्या दोघांचं व्यक्तिगत रिलेशन एकदम भारी होतं, पूरक होतं म्हणून त्यांच्याविषयी हे लिहावसं वाटतंय असं नाही. त्यांच्या व्यक्तिगत रिलेशन पलिकडे इतरांच्या रिलेशनकडे मानवी अधिकारांच्या दृष्टीने त्यांनी पाहिलं, हे काळाच्या खूप पुढलं होतं. दीड शतकानंतरच्या काळालाही ते पचनी पडत नाही. विवाहाशिवायचे लैंगिक संबंध, विवाह संबंधांव्यतिरिक्त बाळाला जन्म देणं हे सगळं आजही अनैतिक आहे. त्या अनैतिकतेला खोडून काढत माणूस म्हणून जगण्याच्या अधिकाराला त्यांनी प्राधान्य दिलं. मातृत्वाचं नातं वैवाहिक चौकटीतच अडकवून ठेवण्याच्या पितृसत्तेच्या कटकारस्थानांना त्यांनी मोडून काढलं. वैधव्यानंतर इच्छेतून किंवा इच्छेविरुद्ध घडणाऱ्या लैंगिक संबंधातून बाळ राहिल्यास स्वतःला संपवू पाहणाऱ्या स्त्रीला त्यांनी जगण्याची प्रेरणा दिली आणि बाळाला जन्मण्याचा अधिकार दिला. 'तुझे कुणाशी लैंगिक संबंध आले किंवा तुझ्याबरोबर कुणी लैंगिक कृती केली म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होत नाही. तुझा जगण्याचा अधिकार शाबूत राहतो' हाच संदेश ते त्यांच्या कृतीतून देत आहेत असं जाणवतं.
'नातं की परंपरागत पावित्र्याच्या कल्पना?' यात नेहमीच पावित्र्याच्या कल्पना श्रेष्ठ ठरत आल्या आहेत आणि नात्याचा बळी गेला आहे. कधीतर त्या नात्यामुळे आणि पावित्र्याच्या कल्पना टिकवण्यासाठी त्या व्यक्तीचा बळी दिला गेलाय. हे तेव्हाही व्हायचं आणि आजही होतंय. जोतिबा- सावित्री अशा द्वंद्वात अडकलेच नाहीत. त्यांनी पावित्र्याच्या अर्थहीन कल्पना नाकारल्या आणि माणूसपणाचं नातं जपलं. स्वतःच्या (रक्ताच्या / खऱ्या इत्यादी) नात्यांनी ज्यांच्यापुढे जगण्याचे प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं अशा स्त्रियांसाठी या जोडीने सन्मानाने जगण्याचं स्थान निर्माण केलं. विवाहबाह्य संबंध, अनैतिक संबंध, अनैतिक संबंधातून जन्मणारं मुल अशा कशावरही काथ्याकूट करीत न बसता त्यांनी 'माणूस' म्हणून असणारा सन्मान मान्य केला. काही संबंध जरी समाजाला मान्य नसेल तरी ती व्यक्ती 'माणूस' म्हणून बाद ठरत नसते, एवढं जरी समाजाने यातून समजून घेतलं तरी बसं.
पती- पत्नी म्हणून निर्माण होणाऱ्या नात्याला धर्माच्या पवित्र बंधनात बंधण्याऐवजी त्यांनी हे नातं सत्य आणि समतेवर उभं केलं. सत्यशोधक समाज आणि त्यातून सुरू झालेले सत्यशोधक विवाह हे पतीपत्नीच्या नात्याकडे वेगळ्या दृष्टीने पहायला शिकवतात. भ्रामक आणि विषमतावादी विवाह विधीना समतेच्या विचारांचा पर्याय दिला. विधींच दिखावू बंधन बाजूला सारून शपथेतून वास्तवाची जाण दिली. नात्याला पावित्र्यात अडकवण्यापेक्षा नात्यात बांधिलकी असायला हवी याचं भान त्यांनी दिलं. नातं दोघांचं आहे तर त्यात धर्म - जातीचा मध्यस्थी नको. त्यांनी सर्वच ठिकाणचा मध्यस्थी नाकारला होता. अगदी ईश्वर आणि भक्त यांच्या (श्रध्देच्या) नात्यातही मध्यस्थी नकोच आधीच त्यांनी भूमिका घेतली. मध्यस्थी नको तर साथ देणारे सोबती हवेत, जे त्यांच्या सत्यशोधक विवाह पद्धतीत असतात. पती- पत्नीचे टिपिकल नाते नाकारून सहजीवनाचा व्यापक विचार त्यांनी मांडला.
जोति- साऊने स्वतःच्या सहजीवनातून दोघांच्या नात्याचा वेगळा अर्थ उलगडला. त्यांच्या प्रत्येक कृतीतून मानवीय मान्य, अमान्य नात्याविषयी वेगळा दृष्टिकोन दिसून आला. नैतिक -अनैतिकतेच्या भ्रमातून बाहेर काढून माणूसपणाच्या स्वच्छ नजरेने बघायला त्यांनी शिकवलं. नात्यातलं खरेपण हे ते नातं रक्ताच आहे की जवळचं आहे यावर अवलंबून नसून तुमच्या आंतरिक भावनांवर अवलंबून असतं हे ही त्यांनी दाखवलं. नात्यातून येणारी पितृसत्तेला अपेक्षित मालकी त्यांनी स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यात जशी नाकारली तशीच समाजपटलावर सुद्धा नाकारली. त्यासाठी समाजाचा रोष पत्करण्याचीही तयारी ठेवली. दोघांच्या नात्यातलं धार्मिक पावित्र्याचं बंधन नाकारून सत्यधर्माचा आधार दिला आणि समतेचा आग्रह धरला. धर्माच्या शोषणाधारित बंधनाना छेद देत स्वातंत्र्य आणि सन्मानाचा आग्रह धरला. त्यांच्या प्रत्येक कृतीतून अशी कितीतरी मानवी मूल्ये सापडतील जी आजच्या रिलेशन्सच्या कल्पनांनाही अधिक समृद्ध करतील. फक्त आपण समतेच्या चष्म्यातून पहायला हवं.
*नातीगोती.. खरी.. खोटी?*
संकलन - दिपाली पडवळ .
ठाणे. 9028261973.
11 एप्रिल 2022.
Comments
Post a Comment