*विचारवेध - BEYOND THOUGHTS.*संकलन - साहेबराव माने.9028261973.साभार - सौ. सीमा मंगरूळे.वडूज. सातारा.12 मार्च 2022. *पुर्वाध - “हुंड्यातुन महिला मुक्त झाली आहे का ?*...काही लेख.
*विचारवेध - BEYOND THOUGHTS.*
संकलन - साहेबराव माने.
9028261973.
साभार - सौ. सीमा मंगरूळे.
वडूज. सातारा.
12 मार्च 2022.
*पुर्वाध - “हुंड्यातुन महिला मुक्त झाली आहे का ?*
...काही लेख.
नमस्कार, मंडळी.
जागतिक महिला दिनानिमित्त “हुंड्यातुन महिला मुक्त झाली आहे का ?” या विषयावर मतं, विचार, अनुभव मागविण्यात आले होते. मिळालेला प्रतिसाद पाहून आपल्याला हुंडा पद्धतीचं निर्मूलन होण्यासाठी किती लांबचा पल्ला गाठायचा आहे, हे दिसून येते.
काल आपण भारतातील हुंडा प्रतिबंधक कायदा व सद्यस्थिती, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर मधील परिस्थिती या वर लेख प्रसिद्ध केले.
इतर लेख आज पुढे देत आहोत…..
१) हुंडा : ज्वलंत आग
हुंड्यातुन महिला मुक्त झाली आहे काय ॽ हा प्रश्न म्हणजे जणु इथल्या समाजव्यवस्थेला, शासनव्यवस्थेला आणि मानसिकतेला लागलेली एक ज्वलंत आग आहे आणि आता ही आग कधी विझणार हा प्रश्न प्रत्येक आई बापाच्या समोर आहे जे आपल्या हृद्ययाचा एक तुकडा दान करतात, तरी समाज त्यांना विचारतो की मुलीच्या हुंड्यात काय दिले ? आणि आता ही आग ग्रामीण, निरक्षित लोकांमध्येच नाही तर याची ठिणगी मोठमोठ्या शहरांमध्ये आणि शिक्षित वर्गात सुद्धा पोहचली आहे.
या प्रथेला आळा घालण्याकरिता साठ वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. अनेक संघटनांची स्थापना झाली आहे, यावर कायदा तयार करण्यात आला आहे, तरी आज महिलांच्या समस्यांमध्ये हुंडाप्रथेने आपले स्थान कायम राखले आहे.
आज विज्ञानाच्या युगात आमच्या समोर स्री हुंड्यातुन मुक्त झाली काय असा खणखणीत प्रश्न येतो आहे ॽ मग वाटते कि, भारतासारख्या पवित्र देशात स्री अजुनही अंधारातच आहे..
तिच्या अस्मितेची जाणीव नाही या समाजाला. ती अजुनही कुणाची तरी गुलामच आहे. हुंड्यासाठी दुशासनासारखे पापी अजुनही मोकाट फिरतच आहे.
द्रोपदीस आजही सासुरवाडीतील पांडव जुगारात धरतच आहे…
हक्कासाठी झटत, हुंड्यासाठी जळत आहे..
माझ्या या भारतासारख्या पवित्र देशात स्री अजुनही अंधारातच आहे…..
हुंडा प्रतिबंधक कायदा, 1961 या अधिनियमातील कलम 2 अन्वये हुंडा या शब्दाची व्याख्या विवाहातील एका पक्षाने विवाहातील अन्य पक्षास किंवा विवाहातील कोणत्याही पक्षाच्या आई – वडिलांना अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीने किंवा तत्पूर्वी किंवा त्यानंतर कोणत्याही वेळी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे दिलेली किंवा द्यायाचे कबुल केलेली कोणतीही संपती अथवा मुल्यवान रोख असा आहे.
पंडित नेहरूंच्या काळात हुंडा विरोधी कायदा संसदेत मंजूर झाला. मात्र, कडक असूनही हा कायदा सहा दशकांनीही निष्प्रभ ठरतो आहे. तथापि आज हुंड्याची प्रथा अबाधित आहे. एवढंच नव्हे तर तिची पाळेमुळे एखाद्या विषवेलीसारखी अधिक घट्ट आणि अधिक विस्तृत झालेली दिसत आहेत. आज आपण २१ व्या शतकात प्रवेश केला आहे. कसा आहे आपला आजचा भारत ? इथं उच्चभ्रू मंडळी एकाच वेळी प्राचीन परंपरांचे आणि आधुनिक औद्योगीकरणाचे ढोल बडवतात. शॉपिंग मॉल्स मधून चैनीच्या वस्तू ओसंडून वाहत आहेत. इथल्या कुटुंबातल्या माता ‘त्यागी’ आणि मुली ‘आज्ञाधारक’ आहेत. इथल्या लग्नात मॉडेल्सच्या धर्तीवर अत्याधुनिक पेहेरावांचे प्रदर्शन मांडले जात आहे. असा आपला आजचा भारत..
हुंडा प्रथा आजही प्रचलित असुन तिचे स्वरूप बदलत आहे. हुंडा केवळ लग्नापुरता मर्यादित राहिलेला नाही. आज हुंड्याचा परीघही प्रचंड आहे. केवळ विवाहाच्या वेळीच ‘देणे – घेणे’ होत नाही. तर वधूवरांची पत्रिका जमली की तिथपासून सुरुवात होते. पत्रिका जमली, जोडी ठरली, मग साखरपुड्यापासून प्रत्यक्ष विवाहापर्यंत, त्यानंतर बाळाचा जन्म, बारसं, त्यांची लग्नं या साऱ्या प्रसंगी आहेर अपेक्षित असतात. याशिवाय दोन्हीपैकी कोणत्याही कुटुंबात होणारे कार्य, धार्मिक विधी अशा सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रसंगीही मुलाकडच्यांना मानपान केले जाते. या साऱ्याचा समावेश हुंड्यातच होतो. ‘हुंडा’ केवळ लग्नापुरताच मर्यादित राहिलेला नाही. मुलीच्या माहेरच्या माणसांना तिच्या सासऱ्यांबरोबर जुळून आलेले संबंध पुनःपुन्हा दृढ करावे लागतात. लग्नाला बरीच वर्षे होऊन गेली तरीही लेकीच्या संसाराला हातभार लावावा लागतो. वा भेटवस्तू, आहेर देऊन त्यांची मर्जी राखावी लागते. पूर्वी हुंड्याची प्रथा सवर्ण हिंदूंमध्येच प्रचलित होती.आता सर्वच या प्रथेचे अनुकरण करत आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार 2020 मध्ये दररोज 19 महिलांच्या जीवनात हुंडा संबंधित बाबींचा समावेश आहे. क्राइम ब्युरोच्या अहवालात असे म्हटले आहे की, हुंडाबळी मृत्यूची एकूण 6,966 प्रकरणे, ज्यात 7,045 बळी गेले होते. देशात हुंडाविरोधी कायदा 1961पासून अस्तित्वात असूनही 95% लग्नांमध्ये अजूनही हुंडा स्वीकारला जातो आणि दिला जातो. हा धक्कादायक अहवाल जागतिक बँकेनं दिला आहे. यावरून समजते की खरंच स्री हुंड्यातून मुक्त झाली की आणखी त्या जिवघेण्या हिंसक जाळ्यात गुरफटली. 27 वर्षांच्या तरुण पीएचडी स्कॉलरने आत्महत्या केली कारण तिच्या सासरच्या लोकांना तिचा अभ्यास सुरू ठेवण्यास हरकत होती. तिच्या पालकांचे म्हणणे आहे की, हुंड्यासाठी भावनिक छळ करण्यात आला. भारतामध्ये एक चिंताजनक प्रवृत्ती आहे ज्यामध्ये दररोज 20 महिलांचा हुंड्यासाठी छळ झाल्यामुळे मृत्यू होतो – एकतर खून केला जातो किंवा आत्महत्या करण्यास भाग पाडले जाते.
हुंडाबंदीचा कायदा अस्तित्वात येऊन अनेक दशके लोटली तरी लग्नातली देणी घेणी मात्र वाढताहेत. याचं कारण म्हणजे कायद्याच्या मर्यादा आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे कायद्याला बगल देऊन ‘वरदक्षिणे’ च्या नावाखाली स्वतःच्या मागण्यांची पूर्तता करुन घेण्याची समाजाची मानसिकता. ही लोभी मानसिकता तयार करण्यात मुख्यमंत्र्यांसारखे जबाबदार समजले जाणारे नेतृत्वही मागे नाही. आपल्या मतदारांना खूष करण्यासाठी मंत्री, मुख्यमंत्री सततच चमकदार विधाने ऐकवत असतात. पण याचा काय परिणाम होतो हेही त्यांना समजायला हवे. गुजरातचे मुख्यमंत्री जेव्हा नरेंद्र मोदी होते तेव्हा त्यांनी एका शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना शेतकरीबंधूंना सुचवले की, ‘तुमच्या मुलींच्या लग्नात तुम्ही हुंडामध्ये ठिबक जलसिंचनाची सामुग्री द्या.’ हुंड्यासारख्या कुप्रथेला आळा घालण्याचे उपाय योजायचे की त्यासाठी नवनवीन गोष्टींच्या मागण्या सुचवायच्या. विकासाचा चढता आलेख दाखवणाऱ्या गुजरातेत मुलींचे लोकसंख्येतील प्रमाण दर जनगणनेत धटंताना दिसत आहे. ते हुंड्याच्या वाढत्या खर्चापोटी मुली नकोशा होत असल्यामुळेच. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने या विधानाचा निषेध केला होता.
भारतात 1961 मध्ये हुंडा प्रथा रद्द करण्यात आली. या प्रथा रुढ होण्याचे कारण म्हणजे पुरुषप्रधान समाज हा स्त्रियांपेक्षा पुरुषांना महत्त्व देतो. भारतात अनेक समाजात मुलांकडे रेट कार्ड आहे. मुलाची ही अनधिकृत किंमत आहे. आणि ती किंमत एका मुलाच्या लग्नात किती हुंडा मिळेल त्यावरून मोजली जाते. भारतीय समाजातील स्त्री-पुरुष असमानतेचा गड आहे. वधूच्या कुटुंबाला मुलीची काळजी घेण्यास ‘संमत’ झालेल्या पुरुषाच्या हुंड्याची मागणी पूर्ण करणे बंधनकारक वाटते. दुसरे प्रमुख कारण म्हणजे भारतीय संस्कृतीत हुंडा पद्धत इतकी खोलवर रुजलेली आहे की ती सामान्य आणि अपरिवर्तनीय म्हणून पाहिली जाते. आजही जर लोकांना हुंडा हा गुन्हा आहे याची आठवण करून दिली तर ते एक पर्यायी वास्तव म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात जे जुन्या चालीरीती बदलू शकत नाहीत. अनेक सुशिक्षित कुटुंबे स्वेच्छेने किंवा अनिच्छेने रीतिरिवाजांचे पालन न केल्याबद्दल टीका होऊ नये म्हणून ते पाळतात. शेवटी परंपरा बदलण्याचे धाडस कोण करेल ? तिसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे विवाहसंस्थेचे वर्चस्व. भारतीय कुटुंबात स्त्रीच्या लग्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर एखाद्या स्त्रीच्या लग्नाला तिच्या सुरक्षित वैवाहिक जीवनाच्या बदल्यात हुंडा द्यावा लागतो, जे जगातील एक आव्हान आहे जे स्त्रियांसाठी असुरक्षित आणि भेदभावपूर्ण आहे, तर तो कधीही गुन्हा म्हणून पाहिला जात नाही.
आजच्या शिक्षित मुली मुलांनी हुंडा विषयी जनजागृती मोठ्या प्रमाणात करावी. आज काही तरुण यात सक्रिय आहेत मात्र या लढ्यात तरुणांची संख्या आणि त्यांची सक्रियता आणखी व्यापक होत जावी आणि ती तरुणांनी करावी.आणि भारतीय संस्कृतीला लागलेला काळा डाग आजच्या या नवपिढीने पुसावा आणि येत्या काळात हुंडाबळी सारख्या जाचक प्रथेला समूळ नष्ट करावे. हुंडामुक्त चा नारा देऊन हुंडा विरोधी जबाबदारी सामाजिक जाणिवेतू प्रत्येक तरुणाने यशस्वीपणे पूर्ण करावी. तरच उद्याचा भारत हा “हुंडामुक्त” भारत होऊ शकतो …..
संसाररूपी रथाचा गाडा चालवण्याकरीता स्री आणि पुरुष हे दोन्ही चाके महत्त्वाचे आहेत. त्यांना समानता असायला हवी तरच देश यशाचे शिखर गाठेल. आणि त्याकरिता आपण या आंतरराष्ट्रीय महिला दिनी संकल्प करुया की या संसाराच्या जननीला वाईट प्रथा परंपरातून मुक्त करुया….
माणुस म्हणून आदर पाहिजे
सामान नको, सन्मान पाहिजे
हुंड्याची मनमानी
म्हणजे बाईची मानहानी
हुंडा प्रथा अपराध आहे
मानवी मुल्यांचा ह्रास आहे.
– लेखन : रितिक अनिल बलविर
2nd year in IT इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
नागपूर
२) समाज काय म्हणेल ?
माझ्या मतानुसार आजच्या घडामोडी पाहता आज ही काही ठिकाणी महिलांवर अत्याचार होतात. मग ते मानसिक असो त्रासदायक किंवा शारीरिक. काही ठिकाणी तिच्या उदरी मुलगी जन्माला आली म्हणून तर …काही ठिकाणी माहेरून पैसे, ऐवज आणला नाही म्हणून. हुंडा देणे अन् घेणे हा गुन्हा आहे हे ठाऊक असूनही काही ठिकाणी हुंडा देणे घेणे हे गैर प्रकार सुरूच आहेत. हुंडा प्रतिबंधक कायदा लागू असला तरी हुंडा देणे घेणे ही दृष्ट प्रथा आजही सुरूच आहे .आणि त्याचा त्रास महिलांना सोसावा लागतो हिच सत्य परिस्थिती आहे. समाज काय म्हणेल ह्या भितीने कुणीही तक्रार करत नाही. सारं काही निमूट पणे सोसत आयुष्य जगत असतात. अथवा मनाचे मानसिक खच्चीकरण होऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. स्वताच अस्तित्व संपवून टाकतात किंवा छळ, कपटाने त्यांचा मृत्यू होतो. म्हणून मला असे वाटते महिला आज ही हुंड्यातून मुक्त झाली नाही.
माझ्या विचारा नुसार प्रत्येक मुलीने शिक्षण घेतले पाहिजे. आणि स्वावलंबी बनले पाहीजे. मी प्रत्येक पालक वर्गाला सांगू इच्छिते मुलींना शिकवून सक्षम बनवले पाहिजे जेणे करून त्यांना हि आपल्या अधिकाराची जाणीव होईल त्यांनाही बोलता येईल, आलेल्या संकटाला प्रतिउत्तर देण्याची उर्जा त्यांच्यात ही जागृत होईल. शिक्षणामुळे तिच्याही विचारांना चालना मिळेल. तिच्या इच्छा ,आकांक्षा तिला ही पूर्ण करता येतील. प्रत्येक स्त्री ला मुक्तपणे जगण्याचा अधिकार आहे .म्हणून प्रत्येक मुलीला शिकवा अन् शिकू द्या.
माझ्या अनुभवाप्रमाणे आज ही काही ठिकाणी महिला चार भिंतीत तिची इच्छा नसताना ही मन मारून जगते. तीच्या भावनांची घुसमट तीच्या मनात जीवाच्या आकांताने टाहो फोडत असते. माझ्या स्वरचित मुक्तता ह्या कवितेमध्ये मी तीच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
मुक्तता
पिंजर्यात अडकले मी
मुक्त कधी होईन का ?
त्या पक्षासारखे नभात
कधी उडू शकेन का ?
कधी वाटतं मनातलं
सारं काही सांगाव
पण.. या धावपळीच्या जीवनात
कुणीतरी ऐकावं
अश्रुंनी तुडूंब भरले
डोळे माझे …….
ओठांवर हसू
कधी येईल का ?
स्वप्नात पाहिलेलं घरकुल
मला कधी मिळेल का ?
पिंजर्यात अडकले मी
मुक्त कधी होईन का ?
मुक्त कधी होईन का ?
हुंड्यातून तर महिला मुक्त झाली च पाहीजे. शिवाय तिच्यातली प्रतिभा ही समाजापुढे आली पाहीजे तिचा आदर सन्मान तिला मिळायला हवा म्हणून प्रत्येक नागरिकाने ही सुर्वात आपल्या घरातून केली पाहिजे असे मला वाटते 🙏🏻
✍🏻लेखन : सौ निलम सदानंद पाटील वसई, पालघर
३) नव्याचे नऊ दिवस !
“आम्हाला मुलगी पसंत आहे. लाखात एक आहे मुलगी. सुशिक्षित, मनमिळाऊ स्वभावाची, हसरा चेहरा असणारी. जशी हवी होती न तशीच आहे बघा. आमच्या घराला घरपण आणणारी आहे. आमच्या घरात देवाच्या कृपेने सर्व काही आहे. कमी होती ती मुलीचीच. आता ती पण पूर्ण झाली. सूनेच्या रुपात मुलगी मिळाली आम्हाला.”
“बरं आता द्याय घ्यायचे बोला भाऊ. म्हणजे मी स्पष्टच बोलतो. हुंडा किती आणि कसा द्यायचा हे जरा समजले तर बरे होईल.”
“छे…छे….! हुंडा बिंडा आम्ही काही घेणार नाही. नारळ आणि मुलगी बस.”
हा संवाद आजकाल जवळजवळ सर्व लग्न जमलेल्या वधू मुलीच्या घरी ऐकायला मिळतो.
वर पक्षाकडून कशाचीही मागणी नाही झाली म्हणून वधूच्या घरात आनंद होतो. पण तरीदेखील ते आपल्या ऐपतीप्रमाणे लग्नात खर्च करुन दागदागिने घालून मुलांकडच्यांना मानसन्मान देऊन मुलीचे लग्न थाटामाटात करुन देतात.
मुलगी माहेर सोडून सासरचा उंबरठा ओलांडून येते. तिने आधीच आपल्या भावी संसाराची स्वप्ने रंगवलेली असतात. तिला आपल्या मनासारखा जोडीदार मिळाला म्हणून ती खूप आनंदात असते. पण म्हणतात ना नव्याचे नऊ दिवस. भांड्याला भांडं लागतेच. मग ती लुटुपुटुची भांडणे कधी धगधगत्या आगीमध्ये बदलून जाईल याची शाश्वती नसते.
तेव्हा उध्दार होतो तिच्या माहेरच्यांचा. तुझ्या पेक्षा चांगल्या पैसेवाल्यांची मुलगीचे स्थळ आले होते लेकाला पण त्याला तुझ्यात कोणती अप्सरा दिसली कोणास ठाऊक. काय जादू केलीस तू. आणि तुला इथे घेऊन आलो आम्ही. ही टोचणारी वाक्ये तिला ऐकावी लागतात.
जर ती मुलगी नोकरी करणारी असेल तर वेगळीच तिची दशा होते. घर आणि नोकरी यामध्ये तिची दमणूक होते. तिच्या पगाराची वाटणी. समजा तिने आपल्या पगारातील थोडी रक्कम तिच्या आईबाबांना दिली तर काय होईल. पण ते कोणाला आवडणार नाही. यावरून घरात भांडणे.
माझ्या मते जर मुलगा आपला पगार आपल्या आईबाबांना देतो तसेच लग्न झालेल्या कमावत्या मुलीने आपल्या पगारातील थोडी रक्कम आपल्या आईबाबांना दिली तर काही बिघडत नाही.
हुंड्यातून महिला मुक्ती अजूनही झालेली नाही. हुंडा फक्त पैसाच नाही. आता हुंड्याचे स्वरूप बदललेले आहे. मुलगी शिकलेली असली पाहिजे त्याचबरोबर ती नोकरी करणारी असावी. तिच्या कमाईवर हक्क सासरच्या लोकांचाच असावा. हा ही एकप्रकारे हुंडाच आहे न.
महिला मुक्ती झाली असे मला वाटत नाही. कारण गोड बोलून पाठीवर वार करणारे खूप आहेत. पण ते वार सहन करणारी शक्ती फक्त महिलेला ईश्वराने दिलेली आहे. ती माता, बहिण पत्नी आणि आजी या रुपात सदैव हसऱ्या चेहऱ्याने सर्व मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जात होती, जात आहे आणि जात राहणार.
– लेखन : परवीन कौसर. बेंगलोर
४) हुंड्याची नवंनवीन रूपे
हुंड्यातून आजची स्त्री मुक्त झाली का ? हा प्रश्न अत्यंत विचार करायला लावणारा आहे. कारण आपण वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल मीडिया वर अनेक उदाहरणे पाहत असतो वाचत असतो ; कि माहेरहून अमुक एका कामासाठी पैसे मागावं ! वगैरे वगैरे. आणि त्याची पूर्तता न झाल्यास त्या सुनेचा मानसिक छळ, मारहाण इतकेच नव्हे तर प्राणही घेतला जातो, किंवा ती स्वतः जाचाला कंटाळून स्वतःच आत्महत्या करते.
जी लग्ने योगायोगाने सहज जमतात तिथे वीस तीस तोळे सोने ठराविक रक्कम मानपान देऊन लग्ने होताना दिसतात, ज्यांची ऐपत हौस आहे ते खुशीखुशीने हुंडा देताना दिसतात. मध्यम वर्गीयांची लेक मोठ्या श्रीमंतांच्या घरात आता सून म्हणून सहज जाऊ शकते, कारण मुलींची संख्याच कमी झाल्याने साधन लोक पूर्वी सारखे तोलामोलाचे पाहुणे पाहत नाही.
शिक्षणामुळे, अवती भवतीच्या वातावरणामुळे एखादी मुलगी सासरी “हम भी कुछ कम नही” हे दाखवण्याच्या प्रयत्नांत असते. करोनाचे जसे नवनवीन प्रकार गोंडस नावे अवतरले अवतरत आहेत तसे हुंड्याचेही नवं नवीन रूपे आपल्या समोर येत आहेत. उदाहरणार्थ मुलीचे डोहाळजेवेन बाळंतपण (कि जे सीझर सारखे प्रॉब्लेम आल्यास त्याचा खर्च लाख पर्यंत येऊ शकतो) बाळाचा प्रॉब्लेम काही कारणाने बाळास विशेष ट्रीटमेंट द्यावी लागली त्याचा खर्च अफाट येऊ शकतो. त्या नंतरचे बारसे त्याचे मानपान याचा खर्च किती येईल याचा विचार केला जातो का ? हे सर्व सुनेच्या माहेरच्यांनी करावे हे गृहीत धरले जाते. या वेळी मुलीच्या बापाचा आर्थिक अंदाज कोणी करत नाहि पापं हुंड्याचाच प्रकार नाहि का ?
आणखी एक दुसरी बाजू म्हणजे आता मुली शिकल्या विविध क्षेत्रात त्या चमकतात मिळवत्या आहेत स्वतः च्या पायावर उभ्या आहेत हि आनंदाची गोष्ट आहे . प्रत्येक समाजात मुलीची संख्या कमी झाल्याने लग्न जमवतो वेळी हुंड्याची प्रथा गौण मनाली जाते. हुंड्यासाठी सहसा लग्न मोडली जात नाहीत. पण लग्नानंतरच्या कार्यक्रमांची प्रथा परंपरा, हौसेचे विविध प्रसंगी हा हुंड्याचा नाग काही ठिकाणी फणा काढताना फुत्कारताना दिसतोच !
कोरोनाने आता प्रत्येक आर्थिक क्षेत्र आर्थिक संकटात दिसत आहे. सर्वात जास्त फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. कोरोनाचे लॉक डाउन माल परगावी नेता येत नाही म्हणून शेतमालाची नास धूस योग्य भाव नाही. त्यात निसर्गाची अवकृपा अतिवृष्टी, बर्फवृष्टी, वादळे, खराब हवामानामुळे पिकांवर रोग यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. आर्थिक संकटाच्या दरीत पडल्याने जवळ असेल ती पुंजी वापरावी लागतेय ! छोटया छोट्या व्यापाऱ्यांची हि तीच गत ! हे वरपिते काकुळतीने म्हणताहेत कुणी लेक देत का लेक ! मी तुमच्या लेकीला तळहाताच्या फोडागत संभाळील. मी स्वतः दोन्ही अंगाने खर्च करून लग्न करून घेतो मला हुंडा नको ! हुंडा नको ! हुंडा नको लेक द्या !
तर हुंड्याच्या बाबतीत असे परस्पर विरोधीचीत्र दिसतंय ते बदलले पाहिजे . आपल्या रूढी, मान सन्मान याची अपेक्षा करताना समोरच्याची, वधुपित्याची आर्थिक क्षमता हि लक्षात घेऊन त्याचा माणुसकीने सहानुभूतीपूर्वक विचार केला तर या हुंड्याच्या नवीन रूपास आपोआप आळा बसून प्रत्येक क्षण फुलतील प्रत्येकक्षण हसतील !! आणि संसारात नव्याने पडलेली, आईपणाची सुखद अनुभव घेणारी नववधू, नवमात निश्चितच म्हणेल फुलले रे क्षण माझे फुलले रे !!
हसले रे क्षण माझे हसले !!!
– लेखिका : अलका रामचंद्र मोहोळकर.
क्रमशः उत्तरार्ध उद्या.
*विचारवेध - 9028261973.*
12 मार्च 2022.
Comments
Post a Comment