*रोमच्या साम्राज्याची अखेर… – विज्ञानमार्ग.*संकलन - साहेबराव माने.पुणे. 9028261973.साभार - चारुशिला जुईकर. 28 मार्च 2022.
*रोमच्या साम्राज्याची अखेर… – विज्ञानमार्ग.*
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
साभार - चारुशिला जुईकर.
28 मार्च 2022.
एखाद्या साम्राज्याची अखेर होण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. इतिहासकार ही कारणे शोधण्याचा प्रयत्न करतातच; परंतु काही वेळा हा विषय इतिहासकारांचा वा पुरातत्त्वतज्ज्ञांचा न राहता, तो विज्ञानाच्या अखत्यारीतही येऊ शकतो. असाच प्रकार घडला आहे, तो रोमच्या साम्राज्याच्या बाततीत…
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी एस. कोलोम गिल्फिलॅन या अमेरिकन संशोधकानं ‘जर्नल ऑफ ऑक्युपेशनल ॲण्ड एन्व्हायर्नमेन्टल मेडिसिन’ या नियतकालिकात आपला एक शोधनिबंध प्रकाशित केला. हा शोधनिबंध त्यानं केलेल्या रोमच्या साम्राज्यातील लोकांसंबंधीच्या वैद्यकविषयक अभ्यासावर आधारलेला होता. रोमच्या साम्राज्यासंबंधीच्या तत्कालीन लेखकांनी केलेल्या लिखाणातून गिल्फिलॅन याला तिथल्या लोकांत काही विशिष्ट लक्षणं मोठ्या प्रमाणात दिसून आली. सांधेदुखी, तीव्र पोटदुखी, बद्धकोष्ठ, डोकेदुखी, स्नायूंतील अशक्तपणा, मानसिक संतुलनातील बिघाड, यांसारख्या अनेक लक्षणांचा त्यांत समावेश होता. अल्पायुषी ठरलेल्या उमरावांची संख्याही तिथं लक्षणीय असल्याचं या पुरातन लिखाणातून दिसून आलं. त्याचबरोबर, अपत्यसंख्येवर प्रतिकूल परिणाम होऊन तिथल्या उमरावांची लोकसंख्या झपाट्यानं कमी होत असल्याचंही या लिखाणातून स्पष्ट होत होतं. गिल्फिलॅनला आढळलेली ही सर्व लक्षणं होती ती शिशामुळं होणाऱ्या विषबाधेची. गिल्फिलॅन यानं उत्खननात सापडलेल्या, रोमच्या साम्राज्याच्या काळातल्या चाळीस व्यक्तींच्या हाडांच्या अवशेषांचं रासायनिक पृथक्करणही करून घेतलं. या पृथक्करणातून त्याला रोमच्या लोकांच्या हाडांतही मोठ्या प्रमाणात शिसं असल्याचं आढळलं.
गिल्फिलॅनच्या शाोधनिबंधाच्या कित्येक दशकं अगोदर, रोमच्या साम्राज्यातील लोकांतील या विषबाधेची शक्यता रूडॉल्फ कोबर्ट आणि इतर काही संशोधकांनीही व्यक्त केली होती. मात्र, गिल्फिलॅनच्या १९६५ सालच्या संशाोधनातून एक नवा मुद्दा उपस्थित झाला होता. शिशामुळं झालेल्या या विषबाधेचा परिणाम हा मुख्यतः राज्यकर्त्यांच्या आणि उमरावांच्या बाबतीतच अधिक प्रमाणात घडून आल्याचं दिसून येत होतं. रोमच्या सर्वसामान्य जनतेत मात्र या लक्षणांचं प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या खूपच कमी होतं. रोममधील सामान्य जनतेपेक्षा उच्च वर्तुळातील लोकांच्या आहारात शिशाला खूपच महत्त्व होतं. यामुळं गिल्फिलॅननं उपस्थित केलेला प्रश्न योग्यच होता – इसवी सनानंतरच्या पाचव्या शतकात झालेल्या रोमच्या साम्राज्याच्या शेवटास हे शिसंच तर कारणीभूत नव्हतं?
गिल्फिलॅनच्या शोधनिबंधानंतर १९८३ साली जेरोम निरिआगू या कॅनडातील संशोधकानं ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ या नियतकालिकात याच विषयावरील एक शोधनिबंध प्रकाशित केला. निरिआगूनंही गिल्फिलॅनसारखीच मतं या शोधनिबंधातून व्यक्त केली होती. निरिआगूनं इ.स.पूर्व ३० सालापासून त्यानंतरच्या अडीचशे वर्षांतील रोमच्या सम्राटांचा इतिहास तपासला होता. निरिआगूला या काळात होऊन गेलेल्या रोमच्या सम्राटांपैकी सुमारे दोन-तृतीयांश सम्राटांत शिशामुळं होणाऱ्या विषबाधेची लक्षणं स्पष्टपणे दिसून आली.
* * * * *
जगात शिशाचा उपयोग फार पुरातन काळापासूनचा. किमान सहा हजार वर्षांपूर्वीपासूनचा. गॅलीना (लेड सल्फाइड) या चकचकीत दिसणाऱ्या खनिजापासून सहजपणे वेगळा करता येऊ शकणारा हा धातू, अवघ्या ३२७ अंश सेल्सियस इतक्या कमी तापमानाला वितळतो. चांदीच्या उत्पादन प्रक्रियेतही मोठ्या प्रमाणात त्याचं उप-उत्पादन होऊ शकतं. अल्प तापमानाला वितळू शकत असल्यानं या धातूचा वापर भांडी, जलवाहिन्या अशा अनेक वस्तूंच्या निर्मितीसाठी केला जायचा. शिशाच्या क्षारांचा वापर खाद्यपदार्थांत, सौंदर्यप्रसाधनांत, रंगांत, तसंच औषधांतही होत असे. पुरातन काळात शिशाच्या उत्पादनात रोमचं साम्राज्य आघाडीवर होतं. एका अंदाजानुसार, जगातील जवळजवळ ४० टक्के शिशाचं उत्पादन हे त्यावेळच्या रोमच्या अधिपत्याखालील प्रदेशांत व्हायचं. हे उत्पादन वर्षाला ६०,००० ते ८०,००० टन इतकं असावं.
प्राचीन रोममधल्या शिशाच्या जलवाहिन्या
(Zureks/Wikimedia)
शिसं हे रोमच्या साम्राज्यातील आहारपद्धतीचंही एक अविभाज्य घटक झालं होतं… मुख्यत: रोमच्या राजवटीतील उच्च वर्तुळातील लोकांत! रोमच्या उमरावांत लोकप्रिय असलेली अनेक पेयं ही मुद्दामच शिशाच्या भांड्यातून तयार केली जायची. पदार्थांना गोडी आणण्यासाठी वापरले जाणारे सापा, डेफ्रुटम, करोनम यांसारखे अनेक द्रवपदार्थही द्राक्षाचा रस शिशाच्या भांड्यात उकळवून तयार केले जायचे. या द्रवपदार्थांत ‘शिशाची साखर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, ‘लेड ॲसिटेट’ या शिशाच्या क्षाराचं प्रमाण मोठं असायचं. या पदार्थांचा वापर मद्यामध्ये अतिरिक्त घटक म्हणूनही केला जायचा, तसंच हे द्रवपदार्थ फळं व इतर खाद्यपदार्थ टिकवण्यासाठीही वापरले जायचे.
रोमच्या साम्राज्यातील उच्चभ्रूंकडील पिण्याच्या पाण्याचं वितरण शिशाच्या जलवाहिन्यांतून होत असल्यानं, शिशाच्या गंजातले क्षार पाण्यात मिसळत असत. शिशाचे हे पाण्यात मिसळणारे क्षारसुद्धा विषबाधेस कारणीभूत ठरत होते. याचबरोबर, मोठ्या प्रमाणात शिशाच्या उत्पादनावर अवलंबून असल्यानं, रोमच्या साम्राज्यात शिशाच्या खाणींची आणि शिशावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांची संख्या अर्थातच मुबलक प्रमाणात होती. शिशाच्या उत्पादनाशी निगडित असणाऱ्या अशा ठिकाणांजवळच्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांतूनही मोठ्या प्रमाणात शिसं येत असण्याची शक्यता होती.
गिल्फिलॅन आणि निरिआगूसारख्या संशाोधकांच्या मते, शिशाचा मोठा सहभाग असलेली रोमच्या राज्यकर्त्यांची आणि इतर उच्चभ्रूंची ही जीवनपद्धतीच रोमच्या साम्राज्याला मारक ठरली होती!
* * * * *
रोमच्या राजघराण्यांत आणि उमरावांत किती प्रमाणात शिशाचं सेवन होत असे, याचा अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न रसायनशास्त्राच्या आधारे झाला आहे. रोमच्या लोकांच्या आहाराबद्दल ॲपिशियससारख्या तत्कालीन लेखकांचं लिखाण उपलब्ध आहे. त्यांत, त्या काळातल्या विविध पाकक्रियांचं वर्णन आहे. अशच पाकक्रिया पुनः करून आजच्या संशोधकांनी त्या पदार्थांचं रासायनिक विश्लेषण केलं आणि त्याद्वारे रोमच्या उमरावांच्या शरीरांत किती प्रमाणात शिशाचा शिरकाव होत असावा याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला. अशाच पद्धतीनं काढलेलं ‘सापा’ या द्रवपदार्थातील शिशाचं प्रमाण हे जवळजवळ १ ग्रॅम/लिटर इतकं भरलं.
पिण्याच्या पाण्यातील शिशाच्या प्रमाणाचा अंदाज बांधण्याचाही एक प्रयत्न अलीकडेच फ्रान्सिस अल्बारेदे यांच्या नेतृत्वाखालील फ्रेंच, अमेरिकन आणि इंग्लिश संशोधकांनी एकत्रितपणे केला. नदीच्या मुखाजवळची किंवा खाडीतली रेती ही वर्षानुवर्षं जमा होत असते. यातील खालचे थर हे अधिक जुन्या काळचे असतात. जुन्या काळी जमा झालेल्या अशा रेतीचं विश्लेषण केलं, तर ही रेती ज्या काळात जमा झाली आहे, त्या काळी या नदीत सोडल्या गेलेल्या पाण्याच्या स्वरूपाचा अंदाज बांधणं शक्य असतं. अल्बारेदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोर्टुस या टिबेर नदीच्या मुखाजवळील पुरातन काळच्या बंदराजवळ जमा झालेल्या रेतीच्या थरातले नऊ आणि तेरा मीटर खोलीपर्यंतचे नमुने गोळा केले. रोममधील जुन्या जलवाहिन्यांत सापडलेल्या पाण्यातील शिशाच्या समस्थानिकांच्या प्रमाणाशी तुलना करून, या नमुन्यांतील कोणते नमुने हे रोमच्या साम्राज्याच्या काळात जमा झालेल्या रेतीचे आहेत हे नक्की केले. त्यानंतर या रोमच्या साम्राज्याच्या काळात जमा झालेल्या रेतीचं पृथक्करण केलं. या पृथक्करणावरून रोमच्या साम्राज्याच्या काळातील पाण्यात शिशाचं प्रमाण खूप मोठं असल्याचं स्पष्ट झालं. रोमच्या साम्राज्याच्या काळातील नळांच्या पाण्यात, आसपासच्या नैसर्गिक झऱ्याद्वारे येणाऱ्या पाण्याच्या तुलनेत शंभरपेक्षा अधिक पट शिसं असल्याचं या संशोधनानं दाखवून दिलं.
प्रौढ व्यक्तीनं तोंडावाटे घेतलेल्या शिशापैकी सुमारे आठ टक्के शिसं हे त्या व्यक्तीच्या शरीरात शाोषलं जातं. शिसं शाोषलं जाण्याचं हे प्रमाण लक्षात घेता, रोमच्या साम्राज्याच्या काळात तिथल्या राजघराण्यांतील लोकांकडून प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या मार्गांनी शरीरात शाोषल्या जात असलेल्या शिशाचं प्रमाण हे एक मिलिग्रॅम इतकं असण्याची शक्यता काही संशाोधक वर्तवतात. निरिआगूच्या मते, काही वेळा तर हे प्रमाण दिवसाला १.५ मिलिग्रॅम इतकं मोठंही असे. सामान्य जनतेत मात्र हेच प्रमाण फक्त ०.०३५ मिलिग्रॅमच्या आसपास, तर उमरावांनी बाळगलेल्या गुलामांत हे प्रमाण अवघं ०.०१५ मिलिग्रॅम इतकंच होतं. यावरून रोमच्या साम्राज्यातील राजघराण्यांतील लोकांनाच प्रामुख्यानं या विषबाधेच्या परिणामांना सामोरं जावं लागल्याचं यावरून दिसून येतं. परंतु…
* * * * *
गिल्फिलॅन आणि निरिआगू यांनी मांडलेल्या या रोमन साम्राज्याच्या पाडावाच्या, शिशावर आधारलेल्या सिद्धान्ताला मोठा विरोधही झाला. त्याला सयुक्तिक कारणंही आहेत. रोमच्या राज्यकर्त्यांच्या आहारातील विविध पदार्थांतील शिशाच्या प्रमाणाचा अंदाज त्या-त्या पाककृती पुनः करून बांधला गेला असला, तरी रोजच्या आहारात यांतले कोणते पदार्थ किती प्रमाणात घेतले जायचे, शिसंयुक्त मद्याचं प्राशन किती प्रमाणात केलं जायचं, या गोष्टींत संदिग्धता आहे. इतकंच नव्हे, तर हे मद्य जसंच्या तसं तीव्र स्वरूपात न घेता, काही प्रमाणात सौम्य (पातळ) करून घेतलं जात असल्याचाही उल्लेख जुन्या लिखाणात आढळतो. तसं असल्यास पोटात जाणाऱ्या शिशाचं प्रमाण घटू शकतं.
काही संशोधकांना रोममधील जलवाहिन्यांतून वाहणाऱ्या पाण्यात फार मोठ्या प्रमाणात शिसं असण्याची शक्यता कमी वाटते. कारण, रोममधील त्या काळचे पाण्याचे स्रोत पाहता, तिथलं पाणी हे ‘कठीण पाणी’ असण्याची शक्यता होती. त्यामुळं त्यात कॅल्शिअमसारख्या मूलद्रव्यांच्या क्षारांचं प्रमाणही लक्षणीय असावं. या कॅल्शियमच्या क्षारांचे जलवाहिन्यांच्या आतल्या भागांवर थर जमा होत असण्याची खूप शक्यता आहे. हे थर जलवाहिन्यांतून क्षारांच्या स्वरूपात बाहेर पडणाऱ्या शिशाला काही प्रमाणात अटकाव करू शकतात. अल्बारेदे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशाोधनातून जरी तिथल्या पाण्यातील शिशाचं प्रमाण खूप मोठं असल्याचं सिद्ध झालं असलं, तरी त्यातून होणारी विषबाधा रोमच्या साम्राज्याचा अंत होण्यास पुरेशी आहे का, हाही मुद्दा उपस्थित केला गेला आहे. या सर्व शंकांमुळं रोमच्या साम्राज्याच्या शेवटाचा संबंध शिशाशी जोडण्याबाबत तीव्र स्वरूपाचे मतभेदही निर्माण झाले आहेत.
* * * * *
रोमच्या राजवटीच्या इतिहासाला जगाच्या इतिहासात एक वेगळंच महत्त्व आहे. अनेक शतकं सत्तेवर असलेल्या या राजवटीचा शेवट जरी इसवी सनानंतर पाचव्या शतकात झाला असला, तरी तिथल्या अनेक क्षेत्रांतल्या अधोगतीला इसवी सनानंतरच्या तिसऱ्या शतकापासूनच सुरुवात झाली होती. ही अधोगती घडून येण्यास फक्त शिसं कारणीभूत ठरलं नसेलही, तरीही एक गोष्ट मात्र निश्चित… ती म्हणजे रोमच्या लोकांच्या आहारातलं शिसं हे नक्कीच धोकादायक प्रमाणात होतं. संपूर्ण रोमच्या राजवटीवर परिणाम करण्याइतपत ते कदाचित पुरेसं नसेलही; परंतु रोमची राजवट लयाला जाण्याच्या अनेक कारणांपैकी ते एक कारण असूही शकतं. आणि या अशा आगळ्यावेगळ्या कारणाकडे इतिहासकारांचं लक्ष वेधण्याचं काम गिल्फिलॅन आणि निरिआगू यांनी आपल्या संशोधनाद्वारे नक्कीच केलं आहे!
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
28 मार्च 2022.
Comments
Post a Comment